६. समाजवादी चळवळीची वाटचाल - ४
'समाजवाद म्हणजे काय याचे विस्ताराने तात्विक विवेचन मी येथे करणार नाही. मार्क्सने मांडलेल्या विचाराला त्याच्या कालाचा संदर्भ होता. बदलत्या परिस्थितोत काही गोष्टी बदलतात, परंतु जीवनमूल्ये मात्र चिरकालीन असतात. प्रत्येक स्त्री-पुरुषाला प्रमाणिकपणे शारीरिक वा बौद्धिक कष्ट करून त्याच्या जीवनावश्यक गरजा भागविता आल्या पाहिजेत आणि स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. प्रत्येक स्त्रीपुरुषाच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त शक्तींचा पूर्ण विकास करण्याची त्याला संधी मिळाली पाहिजे. सूत्ररूपाने हा समाजवादाचा आशय आहे. लोकशाही समाजवादाला नैतिक अधिष्ठान आहे. आणि समता हे नैतिक मुल्य चिरकालीन आहे. मला अभिमानपूर्वक नमूद करावेसे वाटते की नैतिक मूल्यांची समाजवाद्यांनी जेवढी जपणूक आणि जोपासना केली तेवढी अन्य कोणत्याही पक्षाने केलेली नाही.
समतेच्या मूल्याचे बियाणे समाजवाद्यांनी जपले ही त्यांची समाजवादी आंदोलनाला फार मोठी देणगी आहे असे माझे प्रांजळ मत आहे. आमच्या अपयशाचे कारण आमचे नेतृत्व कमी पडले हे आहे. अच्युतराव पटवर्धन यांनी राजकारणाचा संन्यास घेतला आणि समाजवादी पक्ष सोडून ते बाजूला झाले. भूदान हा विचार महान आहे; परंतु जयप्रकाशजींनी भावनाप्रधान होऊन समाजवादी पक्ष सोडून भूदानाला जीवनदान करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र व्यक्तिगत नैतिक आचरणाच्या दृष्टीने फार मोठे आदर्श जयप्रकाशजींनी घालून दिले. पुण्यात १९५३ मध्ये २१ दिवस प्रायश्चित्त म्हणून उपोषण करताना जयप्रकाशजींनी सांगितले, 'हिंदुस्थानातील परिस्थिती बघितल्या नंतर माझे असे स्पष्ट मत झाले आहे की मानवी जीवनाच्या म्हणून ज्या ऊर्मी आहेत, आकांक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने मार्क्सचा द्वंद्वात्मक विरोध विकासवाद पुरेसा नाही कारण माणसाने चांगले का व्हावे याचे उत्तर त्यात मिळत नाही. चांगला माणूस आपण का व्हावे याचे उत्तर गांधोजींच्याच शिकवणुकीतून आणि त्यांच्या चरित्रातून मिळते.'
एस्. एम्, यांनी १९८४ सालो एका भाषणात सांगितले, 'भारतातील समाजवादी चळवळीत आर्थिक समतेच्याच विचाराला प्राधान्य मिळाले. आणि तो विचारही संघटित कामगारांच्या संदर्भातच अधिक मांडला गेला. आपल्याकडे असंघटित कामगारांचा तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आणि भूमिहीन शेतमजुरांचा मोठा वर्ग आहे. त्यांची गरिबी दूर झाली पाहिजे. हा विचार समाजवादी चळवळीने मांडला. परंतु त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही व्यापक चळवळ करू शकलो नाही. याचा अर्थ हा की आपल्याकडे आर्थिक समतेचा शिवार अंशत:च रुजला आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील आर्थिक विषमतेचे मूळही मुख्यत: सामाजिक विषमतेमध्ये आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
आपल्याकडे जातींचो जी उतरंड आहे त्यामुळे आपण शूद्रातिशूद्रांना ज्ञानाचे दरवाजेही शतकानुशतके बंद ठेवले आणि त्यामुळे दलित हे. सर्वांत अधिक दरिद्री राहिले. आपल्या देशात आदिवासी, भटक्या विमुक्त जाती आणि जमाती यांची लोकसंख्या प्रचंड आहे. तळागाळांतील माणसांना वर आणण्यासाठी मागास समाजातील दलितांना, आदिवासींना शिक्षणामध्ये खास सवलती आणि नोकऱ्यांमध्ये राखीव प्रवेशांवाबत जागा द्याव्याच लागतील, सामाजिक समतेचा विचार अत्यंत प्रखरपणे महात्मा फुले, आगरकर आणि डॉं. आंबेडकर यांनी मांडला. परंतु तो समाजमानसात रुजला असे म्हणणे धार्ष्ट्याचे होईल. बाबा आढावांच्या 'एक गाव एक पाणवठा' या चळवळीत काम करताना सामाजिक विषमता अद्याप किती खोलवर गेली आहे ते मी पाहिले आहे. तसेच आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रियांच्यावरील अन्यायही चालू आहेत. सामाजिक समतेचा विचार रुजण्वासाठी आपल्याला अद्याप कितीतरी संघर्ष करावे लागतील.'
एस्. एम्. पुढे म्हणाले, 'रचना आणि संघर्ष यांची फारकत होऊ नये अशी माझी भूमिका आहे. संघर्षवादी कार्यकर्त्यांईतकीच मला विधायक कार्यकर्त्यांबद्दलही आत्मीयता वाटते. स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींनी संघर्ष आणि रचना यांची फारकत होऊ दिली नाही. राजकीय आंदोलन संपल्यावर गांधीजींचे निष्ठावान अनुयायी खेड्यांमध्ये जात. ग्रामसफाई, खादीप्रचार, दारुबंदी आदी विधायक कार्वक्रम हाती घेत. या कामांतूनच संघटना टिके आणि पुढे दहा वर्षांनी पुन्हा स्वातंत्र्य आंदोलन सुरू होई तेव्हा हे कार्यकर्ते त्यात धडाडीने भाग घेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रचना आणि संघर्ष हे दोन प्रवाह एकमेकांपासून अलग झाले. सर्वोदयातील कार्यकर्ते केवळ विधायक काम करीत राहिले. समाजवादी पक्षातील काही कार्यकर्त्यांनी 'अपना बाजार' सारखी ग्राहक सहकारी चळवळ उभी केली. देवरुखला मातृमंदिरचे काम चालते. पण समाजवादी कार्यकर्ते मुख्यत: संघर्षातच सामील झाले. विधायक काम करणारे अनेक जण राजकारणापासून दूर झाले, हे बरोबर नव्हते.' एस्. एम्. भाषणाच्या शेवटी म्हणाले, 'संघर्षामुळेच विचारांना धार येते आणि जेव्हा तत्त्वासाठी माणसे सर्वस्व देतात. त्याच वेळी परिवर्तनाच्या प्रक्रियेला सुरुवात होते.
समाजवादी पक्ष आणि त्यांनी केलेल्या चळवळीच्या यशापयशाचा ज्या वेळी मी विचार करतो त्या वेळी मो स्वतःलाच प्रश्न विचारतो की समाजवादासाठी आमचा पक्ष प्राण पणाला लावून लढला का? जो विचार आम्ही जीवननिष्ठा म्हणून स्वीकारला त्याचे आचरण करताना आम्ही अग्निदिव्य केले का? आणि 'मी शरमिंदा होऊन स्वत:ला उत्तर देतो की आमच्यातील काही थोर नेते आणि काही निष्ठावान कार्यकर्ते हे समाजवादी समाज निर्माण करण्यासाठी आयुष्यभर जीव ओतून प्रयत्न करीत होते. परंतु आमच्या चळवळीचा साकल्याने विचार केला तर आम्ही स्वातंत्रय चळवळीत जसे लढलो तसे समाजवादी चळवळीत लढलो नाही. काही वेळा आमचे आपापसांत मतभ्रेद झाले. काही वेळा थोडा काळ तरी सत्ता मिळावी म्हणून आम्ही तत्त्वे गुंडाळून ठेवून तडजोडी केल्या. आम्ही असे वागल्यामुळे समाजवादी चळवळ यशस्वी होण्याची शक्यताच मावळली. परिस्थिती बिकट आहे, काम सोपे नाही हे खरे असले तरी आमच्या चळवळीने समाजातील प्रस्थापितांपुढे जबरदस्त आव्हान उभे केले का, की क्षणिक क्षोभ निर्माण करण्यातच स्वत:ला धन्य मानले, या प्रश्नाचे स्पष्ट आणि प्रामाणिक उत्तर आम्हांला दिलेच पाहिजे. समतेवर आधारलेला समाज निर्माण करण्यासाठी आवश्यक ती संघटना उभी करून आम्ही आपले सर्वस्व जेव्हा समाजवादी चळवळीला अर्पण करू त्याचवेळी समाजवादाचा विचार वशस्वी होण्याची शक्यता निर्माण होईल.'
Hits: 108