४. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन -२

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

मुंबई पेटली

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या निर्णयामुळे मुंबईत असंतोषाचा पडका उडाला. मिरवणुका, मोर्चे निघाले. लाठीमार, अश्रुधूर यानेही लोक दबले नाहीत. त्या वेळी मोरारजी भाईंच्या आदेशाप्रपाणे पोलिसांनी निर्घृणपणे गोळीबार केला आणि नंतर जणू रस्त्यारस्त्यांतून लढाईंच सुरू झाली. सरकारने प्रबोधनकार ठाकरे, नाना पाटील आदी २९ नेत्यांना पकडले. १६ तारखेस रात्री ठाकुरद्वारजवळ दंगल उसळली. बंडू गोखले नावाचा विद्यार्थी आणि अन्य चारजण ठार झाले आणि मग मुंबई पेटलीच. हे अग्निकुंड विझवणे जरूर होते. एस्‌. एम्‌. रस्त्या-रस्त्यात फिरून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. २९ तारखेस ते दादरमधल्या त्यांच्या घरातून निघून दादर स्टेशनजवळ आले. तेथे मोठा जमाव प्रक्षुब्ध झाला होता. फुलांच्या करंड्या पेटवीत होता. तेवढ्यात पोलिस इन्स्पेक्टर अडवानी तेथे आले. पोलिसांची लॉरी पुढे होती.

एस्‌. एम्‌. यांच्या लक्षात आले की जमाव अडवानींना वेढू पाहतोय व तो त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही. एस्‌. एम्‌. एकदम पुढे झाले. दोन्ही हात पसरून त्यांनी इन्स्पेक्टर अडवानींना पाठीशी घातले आणि जमावाला उद्देशून ते म्हणाले, 'लोकहो, आधी मला ठार केल्यानंतरच तुम्ही त्यांच्या अंगाला स्पर्श करू शकाल. जमाव हे शब्द ऐकून थबकला. तेवढ्यात अडवानी पोलिसांच्या लॉरीत बसू शकले, एस्‌. एम्‌. होते म्हणूनच त्यांचे प्राण वाचले.

एस्‌. एम्‌.च्या जीवनातला हा विलक्षण समर प्रसंग. दुसर्‍या दिवशी देशभरच्या वर्तमानपत्रांनी 'एस्‌. एम्‌. जोशींनी इन्स्पेक्टर अडवानींना वाचवले ही बातमी ठळकपणे छापली. स्वत:चे प्राण धोक्यात घालायला तयार असलेला नेताच हिंसक जमावाला आवरू शकतो, हे एस्‌. एम्‌. यांनी दाखवून दिले. या दंगलीत एकूण १०५ हुतात्मे झाले.

संयुक्त महाराष्ट्र समिती

या नंतर काँग्रेसचे सर्व नेते चळवळीपासून दूर झाले. लोकांना चळवळ हवी होती आणि चळवळोबे नेतृत्व कोणी तरी करणे आवश्यक होते. ६ फेबुवारी १९५६ला एस्‌. एम्‌. जोशी यांनी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला, मेळाव्याचे अध्यक्षस्थान केशवराव जेधे यांनी स्वीकारले. तीनशे कार्यकर्ते मेळाव्यास हजर होते. धनंजवराव गाडगीळ आणि दा. वि. गोखले हेही मेळाव्यास मुद्दाम उपस्थित राहिले. याच मेळाव्यात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री शनिवारवाड्यापुढील प्रचंड सभेत संयुक्त महारष्ट्र समिती स्थापन झाल्याचे आणि एस्‌. एम्‌. जोशी हे समितीचे सरचिटणीस झाल्याचे जाहीर करण्यात आले. काँग्रेसच्या नेत्यांनी समितीत सामील न होण्याचा निर्णय घेतला. स्थानबद्धतेतून सुदून येताच कम्युनिस्ट नेते भाई डांगे आणि अत्रेही समितीत हिरिरीने भाग घेऊ लागले. संयुक्त महाराष्ट्र समितीने सत्याग्रह सुरू केला. ९ मार्च १९५६ ते ४ एप्रिल १९५६ पर्यंत मुंबई राज्यात तेरा हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून कारावास भोगला.

चिंतामणराव देशमुख हे त्या वेळी केंद्रात अर्थमंत्री होते. त्यांचा त्रिराज्य योजनेस विरोध होता. महाराष्ट्रावर अन्याय होत आहे, असे लोकसभेतील भाषणात सांगून त्यांनी अर्थपंत्रीपदाचा राजीनामा दिला. परंतु नंतर ज्या वेळी त्रिराज्य योजना बाजूस सारून विशाल द्वैभाषिकाचा ठराव पुढे आला तेव्हा त्याला देशमुखांनी पाठिंबा दिला. विशाल द्वैभाषिकाची योजना संसदेने संमत केली. मोरारजीभाईंना हा पर्याय मान्य होता. परंतु गुजरातचा त्याला विरोध होता. महागुजरात सपितीने सत्याग्रह सुरू केला. त्याला एस्‌. एम्‌. जोशींनी संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे पाठिंबा दिला. या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी समाजवादी कार्यकर्त्या अनुताई लिमये यांच्या नेतृत्वाखाली एक सत्याग्रही तुकडी पाठविण्यात आली,

एस्‌. एम्‌. जोशींना त्यांच्या प्रजा समाजवादीपक्षाच्या केद्रीय नेत्यांपैकी काही जणांचा विरोध होता. परंतु आचार्य नरेंद्र देव यांनी एस्‌. एम्‌.ना खंबीर पाठिंबा दिला. पक्षांतर्गत विरोधाचे वादळ शमले. २९ सप्टेंबरला द्वैभाषिक - विरोधी परिषद मुंबईत घेण्यात आली. ती खूप गाजली. परिषदेस महागुजरातचे प्रतिनिधीही आले होते. या परिषदेपुढे एस्‌. एम्‌. जोशी यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस म्हणून कामाचा आढावा सादर केला. महाराष्ट्र आणि गुजरात मिळून एकूण १२५ जण हुतात्मे झाले. मार्च ते सप्टेंबर अखेर ४५ हजार स्त्री-पुरुषांनी सत्याग्रह केला. ३२ आमदारांनी द्वैभाषिकाला विरोध म्हणून राजीनामे दिले. एस्‌. एम्‌. यांनी त्यांच्या भाषणात संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न नक्की साकार होईल, असा आत्मविश्वास प्रगट केला, तेव्हा श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर केला. आता निवडणुका जवळ येऊ लागल्या. १९५६च्या ऑक्टोबर महिन्यात यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले.

Hits: 101
X

Right Click

No right click