३. फावडे, तुरुंग आणि मतपेटी - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

सानेगुरुजी सेवापथक

११ जून १९५०ला साने गुरुजींनी त्यांची जीवनयात्रा संपवली. एस्‌. एम्‌. आणि त्यांचे सर्व सहकारी यांना फार दु:ख झाले. साने. गुरुजींनी मृत्यूपूर्वी मे महिन्यात राष्ट्र सेवादलाच्या शिबिरात जे भाषण केले होते त्यामध्ये "श्रमदान पथक" ही कल्पना विस्ताराने मांडली होती. लोकांनी श्रम करून अनेक विधायक कामे केली पाहिजेत असा विचार साने गुरुजींनी मांडला होता. साने गुरुजींच्या निधनानंतर एस्‌. एम्‌. जोशी यांनी साने गुरुजींची स्मृती जागृत ठेवण्यासाठी त्यांच्या कल्पनेप्रमाणे साने गुरुजी सेवापथक सुरू केले. राष्ट्र सेवादलाचे ५० सर्ववेळ कार्यकर्ते एक वर्षभर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी साने गुरुजी सेवापथकाची केंद्रे चालवीत होते. एस्‌. एम्‌. स्वत: अनेक केन्द्रांवर गेले. ज्ञान आणि श्रम यांच्या साहाय्याने राष्ट्रनिर्मिती करणे, हीच साने गुरुजींना खरी श्रद्धांजली आहे, असे एस्‌. एम्‌. सतत सांगत. साने गुरुजी सेवापथकाच्या या प्रयोगास महाराष्ट्रातून उत्तम पाठिबा मिळाला. एस्‌. एम्‌. यांना राष्ट्र सेवादलात काम करताना साफल्य वाटे. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि तेजस्वी विचारांमुळे तरुण प्रभावित होत.

राष्ट्रसेवादलाच्या सैनिकांप्रमाणेच समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांनाही एस्‌. एम्‌. सतत मार्गदर्शन करीत. १९५२ सालो मध्या राज्यघटनेनुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा महाराष्ट्रात समाजवादी पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाबरोबर निवडणुकीत सहकार्य करण्याचे ठरविले. हा करार घडवून आणण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते म्हणून एस्‌. एम्‌. जोशी, हॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटले. या भेटीचा वृत्तांत एस्‌. एम्‌. यांनी त्यांच्या आत्मकथेत विस्ताराने लिहिला आहे.

एस्‌. एम्‌. यांनी लिहिले आहे,"बाबासाहेबांनी मला प्रश्‍न केला, 'काय रे, तू मार्क्सिस्ट आहेस का?' मी यावर मार्क्सचे कोणते सिद्धांत मला पटतात, ते सांगू लागलो. तेव्हा मला थांबवून ते म्हणाले, 'हे सैद्धान्तिक प्रतिपादन करण्यात काही तात्पर्य नाही. तुला एक प्रश्‍न विचारतो त्याचे उत्तर दे. समज तुझा पक्ष उद्या सत्तेवर आला तर दुसर्‍या पक्षांना काम करू देणार की नाही?" मी म्हणालो, ' देणार.' यावर ते चटकन म्हणाले, 'म्हणजे तू मार्क्सिस्ट नाहीस." डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले, "मावर्सला जी श्रमिकांची क्रांती अभिप्रेत आहे तशा प्रकारची क्रांती येथे होण्याची शक्‍यता मला मुळीच दिसत नाही. कारण येथील समाज आणि युरोपातील समाज यात फरक आहे. युरोपात केवळ वर्गीय समाज आहे. येथे वर्गाबरोबर वर्णही आहेत.''

'हे अगदी खरे आहे', मी म्हणालो. बाबासाहेब पुढे सांगू लागले. श्रमजीवींची रशियासारखी क्रांती घडून आणावयाची हे ध्येय असले, तर खरे श्रमिक आम्हीच आहोत. अनुसूचित जाती आणि जमाती याच खऱ्या श्रमिक आहेत. ''श्रमिकांना आपल्या शृंखलांव्यतिरिक्त काहीही गमवावे लागणार नाही; असे जे मार्क्स सांगतो ते अनुसूचित जातींच्या बाबतीत दुपटीने खरे आहे. अनुसूचित जातीना सामाजिक विषमतेची शृंखला आणि आर्थिक विषमतेची शृंखला अशा दोन शृंखलांचा जाच सहन कराषा लागतो. तेव्हा या लोकांना घेऊन मार्क्स म्हणतो तशी क्लासिकल क्रांती आपल्याला करता येणार नाही हे मी ओळखले आहे. दरडोई एक मत देण्याचा माझा हेतू हाच आहे. लोकांचे मतपरिवर्तन करीत रहाणे, त्यांचे शिक्षण करणे, याच मार्गाने आपल्याला जावे लागेल. हा रस्ता बराच दूरचा आहे. परंतु याशिवाय दुसरा रस्ता नाही." डॉ. आंबेडकरांचे हे शब्द मला नेहमी आठवतात, असे एस्‌.एम्‌. यांनी त्या विवेचनाच्या अखेरीस लिहिले आहे.

१९५२च्या सार्वविक निवडणुकीच्या वेळी अशोक मेहता हे समाजवादी पक्षाचे निवडणूक सूत्रधार होते. त्यांची समाजवादी पक्षाच्या लोकप्रियतेबद्दलची कल्पना भ्रामक आणि अवास्तव होती. त्यांच्या आग्रहामुळे देशात सर्व राज्यांमध्ये समाजवादी पक्षाने आपले उमेदवार उभे केले आणि त्यांचा प्रचंड पराभव झाला. एस्‌. एम्‌: जोशी यांना पुण्यातून लोकसभेसाठी उभे करण्यात आले. डिफेन्स वर्कर्सच्या ट्रेड युनियन्सचे नेतृत्व एस्‌. एम्‌. करीत होते. वा ट्रेड युनियन्समध्ये ५० हजार कामगार होते. अशोक मेहतांचे गणित असे होते की या कामगारांच्या घरातील मते व अन्य मते मिळून दोन लाख मते मिळतील. हे गणित साफ चुकले. एस्‌. एम्‌. यांना फक्त ३४ हजार मते मिळाली, काकासाहेब गाडगीळ हे कॉंग्रेसचे उमेदवार होते. ते १ लाख २६ हजार मते मिळवून विजयी झाले. केशवराव जेधे हे शेतकरी कामगार पक्षातर्फे उभे होते. त्यांचा दुसरा क्रमांक आला. त्यांना ४२ हजार मते मिळाली. पं. नेहरूंच्या तेजोवलयांकित व्यक्तिमत्वाचा काँग्रेसला फायदा झाला. कम्युनिस्ट पक्षाने जेथे त्या पक्षाचे काम होते अशा निवडक मतदार संघातून उमेदवार उभे केले. त्यांचे धोरण यशस्वी झाले. लोकसभेत काँग्रेसला प्रचंड बहुमत होते आणि कम्युनिस्ट पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. महाराष्ट्र विधानसभेतही काँग्रेसला मोठे बहुमत मिळाले. समाजवादी पक्षाला मुंबई प्रांतामध्ये फक्त ९ जागा मिळाल्या.

Hits: 123
X

Right Click

No right click