२. स्वातंत्र्य संप्रामातील समर्पण - १
१९३० साली म. गांधींनी स्वातंत्र्यलढ्याचे रणशिंग फुंकले आणि देशभर चैतन्याची लाट पसरली. 'सत्याग्रह करून निर्भयपणे लाठीमार, गोळीबार सहन करा आणि ब्रिटिश सरकारच्या मिठाच्या कायद्याचा भंग करून तुरुंगातही जा', हा गांधीचींचा संदेश असंख्य भारतीयांच्या अंत:करणाला जाऊन भिडला. गांधीजींनी ज्या वेळी मिठावरील कराविरुद्ध सत्याग्रह करण्याचे जाहीर केले त्या वेळी देशातील अनेक विचारवंत, पत्रकार इतकेच नव्हे तर काँग्रेसमधील काही नेत्यांनाही त्याचा अर्थ नीटसा समजला नाही. परंतु मीठ हे लोकांच्या जीवनाला आवश्यक आहे आणि त्यावरील कराला आव्हान देताना गांधीजी हे ब्रिटिश साप्राज्याच्या सत्तेलाच आव्हान देत होते, हे जनसामान्यांना मात्र तत्काळ उमगले. म. गांधींच्या दांडीयात्रेकडे सर्व जगाचे लक्ष वेधले आणि हा अभिनव कायदेभंग पाहण्यासाठी जगातील पत्रकार भारतात आले. एस्. एम्., गोरे आणि खाडिलकर या यूथ लीगच्या तीन तरुण नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेण्याचा तत्काळ निर्णय घेतला. एस्. एम्. यांनी त्यांच्या त्या वेळच्या मन:स्थितीचे वर्णन पुढील शब्दांमध्ये केले आहे , "राजकोय कृती करायला आमचे हात स्फुरण पावले होते. गांधीजींनी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आणि बेभान अंत:करणाने आम्ही त्यात स्वतःला झोकून दिले."
पहिला कारावास
महाराष्ट्रात शंकरराव देव यांच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू झाली. विलेपार्ले येथे सत्याग्रही आश्रम सुरू करण्यात आला. एस्. एम्.,गोरे, खाडिलकर आणि सतरा तरुण या आश्रमातील सत्याग्रह शिबिरात दाखल झाले. शिबिरानंतर कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आले. एस्. एम्, प्रथम रत्नागिरी जिल्ह्यात शिरोडा येथे गेले. नंतर त्यांना अलिबागला पाठविण्यात आले. १० मे १९३० ला जाहीर सभेत एस्. एम्. जोशी आणि वामन परांजपे या तरुण कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्याची मागणी करणारी ज्वलज्जहाल भाषणे केली. त्यांना त्या रात्री पकडण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावरील खटला चालला. सत्याग्रही असल्यामुळे वकील देणे वा खटला लढविणे, हा प्रश्नच नव्हता. एस्. एम्.ने जबानीत आपली स्वातंत्र्यवादी भूमिका तेजस्वीपणे मांडली. एस्. एम्. आणि मेहेंदळे यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली आणि ठाणा जेलमध्ये त्यांना पाठविण्यात आले. ना. ग. गोरे आणि र. के. खाडिलकर यांनी पुण्यात सत्याग्रह केल्यावर त्यांना अटक करून सहा महिन्यांची शिक्षा देण्यात आली. त्यांना 'क' वर्ग देण्यात आला आणि वॉर्डरने त्यांना खूप सर्व छळले. मारपीटही केली.
ठाणा जेलमध्ये असताना एस्. एम्. यांच्यासमवेत आचार्य भागवत, शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ आदी नेते होते. तेथे वाचावयास पुस्तके मिळत. रात्री बराक बंद झाल्यावर वाचन करता येई. एस्. एम्. जेलमध्ये अन्य राजबंद्यांचे केस कापण्याचे काम हौसेने करीत. शिक्षा भोगून हे तीन तरुण कार्यकर्ते आपला पहिला कारावास संपवून सहा महिन्यांनी सुटून आले, तुरुंगात त्यांच्या देशभक्तिपर विचारांना अधिक सुस्पष्टता आणि धार आली.
१९३१ साली एस्. एम्., गोरे आणि खाडिलकर या तिघांनी एम.ए.च्या वर्गात फर्ग्युसन कॉलेजमध्ये नावे घातली. कॉलेज सुरू झाल्यावर काही दिवसांनी त्या वेळचे मुंबई राज्याचे गव्हर्नर हॉटसन यांनी फर्ग्युसन कॉलेजला भ्रेट दिली. त्या वेळी लायब्ररीत ते जात असताना वासुदेव बळवंत गोगटे या विद्यार्थाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हॉटसन यांनी चिलखत घातले असल्यामुळे ते जखमीही झाले नाहीत. परंतु गोगटे यांना अटक झाली. या घटनेनंतर पुण्यात प्रचंड खळबळ उडाली. एस्. एम्., गोरे व खाडिलकर यांचा या घटनेशी काही संबंध नव्हता. तरीदेखील प्राचार्य महाजनींनी त्यांना कॉलेजमधून काढून टाकले. एस्. एम्. हे त्या वेळी फ्री प्रेसचे वार्ताहर म्हणून काम करीत होते आणि त्यांनी हॉटसनवर गोगटे यांनी गोळ्या झाडल्याची बातमी साद्यंत फ्री प्रेसमध्ये दिली. तीच देशभर छापली गेली.
गांधीजी राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी इंग्लंडला गेले. त्यांनी भारताची बाजू ठामपणे मांडली. परंतु कॉन्फरन्स अयशस्वी झाली. भारताला काहीच मिळाले नाही. भारतात चळवळ पुन्हा सुरू झाली. संयुक्त प्रांतामध्ये नेहरूंनी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. आचार्य नरेन्द्र देव आणि पुरुषोत्तमदास टंडन हे दोघे नेतेही या आंदोलनात सामील झाले.
Hits: 102