१. विद्यार्थिदशा आणि मनाची घडण - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

श्रीधरचे वय मरण म्हणजे काय ते कळण्याचे नव्हते. पण आईच्या मनातील सहानुभूतीचा त्याच्या मनावर परिणाम मात्र झाला. श्रीधर तिसरी पास झाला आणि गोळपला पुढील शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे वडिलांनी त्याला जुन्नरला न्यायचे ठरविले. श्रीधरचे वय तेव्हा दहा वर्षांचे होते. आईला सोडून जायचे त्याच्या जीवावर आले होते. आईने जवळ घेऊन भरल्या डोळ्यांनी त्याची पाठवणी केली.

श्रीधरच्या वडिलांनी रत्नागिरीहून कार्गो बोटीने जायचे ठरविले. अशी एक कार्गो स्टीमर आली. बोट समुद्रात उभी. तिच्यापर्यंत जाऊन पोचण्यासाठी खपाट्याने जावे लागले. खपाटा बोटीला लागला. पण सामान ज्या खपाट्यात होते तो वाहावला त्यामुळे श्रीधर आणि त्याचे वडील निमूटपणे किनाऱ्यावर आले. मग स्टीमरचा नाद त्यांनी सोडला. बैलगाडीने तीन दिवस प्रवास करून मलकापुरला आले. तेथून पोस्टाच्या टांग्यातून कोल्हापूर; तेथून रेल्वेने दुसऱ्या दिवशी पुण्याला आले. पुण्याला श्रीधरचा थोरला भाऊ शिक्षणासाठी रहात होता. तेथे दादाने छोट्या श्रीधरला आर्यन थिएटरमध्ये एक आण्यात सिनेमा दाखवला. पुण्यात एक दिवस राहून वडिलांच्या बरोबर श्रीधर रेल्वेने तळेगावला आला आणि तेथून मोटारने जुन्नरला पोचला. जुन्नरला श्रीधर चौथ्या इयत्तेत बसला. त्याच्या वर्गात एक ढोराचा मुलगा होता. तो हुशार होता. त्याचा नेहमी पहिला नंबर यायचा. पण वर्गात बाकीची मुले बाकावर बसत असताना तो मात्र दरवाज्याजवळ गोणपाटावर बसे. श्रीधरची आणि त्याची दोस्ती झाली. खाऊसाठी त्याला घरातून थोडेसे पैसे मिळत. तो त्याचे पेरू घेई. अर्धे श्रोधरला देई. पण चोथीनंतर तो जुन्नरलाच राहिला आणि श्रीधर मात्र शिकण्यासाठी जुन्नर सोडून गेला.

श्रीधरचे वडील निवृत्त झाले होते. त्यांना पंचवीस रुपये पेन्शन मिळे. एका ट्रस्टचे कारभारी म्हणून त्यांनी नोकरी धरली. तिथे पंचवीस रुपये मिळत. इतक्या तुटपुंज्या पैशातही ते एकत्र कुटुंबाचा प्रपंच चालवीत. दुर्दैवाने ते अकस्मात निधन पावले. त्यांच्या निधनामुळे धर उद्‌ध्वस्तच झाले. वडिलांच्या निधनाची दाहक आठवण मनात घेऊन श्रीधर पुन्हा मुंबईमार्गे गोळपला आईकडे आला. वैधव्याच्या आघाताने ती धाय मोकलून रडली. गावात कोणत्याही घरी मृत्यू झाला को गावाची सहानुभूती असे. परंतु श्रीधरच्या वडिलांचे आणि गोळप गावातील ब्राह्मणांचे कशावरून तरी भांडण झाले होते आणि सनातनी ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले होते. ते जेव्हा वारले तेव्हा श्रीधरच्या थोरल्या भावाने जाऊन माफी मागितली. मगच त्यांच्या वडिलांचा अकरावा बारावा करायला ब्राह्मण मिळाले. जोशी कुटुंबावरील या दुर्धर प्रसंगात श्रीधरच्या थोरल्या भावाने धीराने कुटुंबाची जबाबदारी घेतली. तो हुशार विद्यार्थी होता. प्रिव्हिअसला फर्स्ट क्लासमध्ये आला होता. पण इंटरच्या वर्गात असताना त्याने शिक्षण सोडून कलेक्टर कचेरीत नोकरी धरली. त्या वेळी त्याला वीस रुपये पगार मिळे. ८ रुपयांत तो एकवेळ जेवून राही आणि बारा रुपये गोळपला आईला आणि
भावंडांना खर्चासाठी पाठवी. सगळा ओढयग्रस्तीचा संसार. इतकी तोंडं खाणारी आणि स्वस्ताई असली तरी बारा रुपयांत भागत नसे. अडीअडचणीत पुरशामामा
मदत करी. घरातले तांदूळ संपले की श्रीधरची आई सांगे, 'अरे पुरशा, काही तरी करून गोणभर तांदूळ दे आणून.' त्या वेळी रंगूनचे तांदूळ अडीच-तीन रुपयांत शंभर किलो मिळत. गोणभर तांदूळ पंधरा दिवस पुरत असे. आमटी-भातावर कशीतरी पोटाची खळगी भरायची. मधून मधून पुरशाची आजी कधी ताक, कधी लोणचे आणून देई.

गोळप गावच्या खोतांचा भाऊ अर्धवट होता. पण घरच्या श्रीमंतीमुळे त्याचे एका सुंदर मुलीशी लग्न झाले. पुरशामामाचे त्या घरी येणेजाणे असे. पुरशा गावच्या नाटकात काम करी. तो दिसायलाही देखणा होता. खोतांच्या वेडसर भावाच्या बायकोशी दोस्ती जमली. या प्रकरणी मारामारीही झाली. मी तुझी सोय लावून देतो. एक दिवस संध्याकाळी बापू खोत आणि त्यांचे मित्र अंधारात बसून बोलत होते. श्रीधर जवळ उभा होता, हे त्यांच्या लक्षात आले नाही. खोत त्याच्या मित्राला म्हणाले,'या पुरशाला जर शेण खायचं होतं तर ते आमच्या घरी कशाला? कुळवाड्यांच्या बायका काय कमी होत्या?' अकरा-बारा वर्षांच्या श्रीधरला हे ऐकून धक्काच बसला. या घटनेबद्दल एस्‌. एम्‌. यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहिले आहे.

"ब्राह्मणांच्या बायका शुचिर्भूत राहिल्या पाहिजेत. कुळवाड्यांच्या न राहिल्या तर चालतील. असाच ना हा विचार? माझे मन ते उद्गार ऐकून अगदी बावरून गेले. त्या वयात माझ्या मनावर झालेला हा दुसर आघात. वडील वारल्यानंतरची परिस्थिती आणि मनावर झालेले हे आघात यातून नैतिक जीवनांसंबंधीचे विचारचक्र माझ्या मनात सुरू. झाले." पण शिक्षण घेणे महत्त्वाचे होते. जायचे कोठे, हा प्रश्न उभा राहिला. श्रीधरचा चुलतभाऊ नागपुरला गेला होता. त्याला छापखान्यात वीस रुपये पगार मिळे. त्याचे लग्न झाले होते. एक मुलगी होती. पण काकूवरचा भार कमी व्हावा म्हणून तो श्रीधरला नागपुरला घेऊन गेला.सुळे स्कूलला श्रीधर पाचवीत जाऊ लागला. परंतु त्याच वेळी तात्याची नोकरी सुटली. तीन महिने फी देता आली नाही. मुख्याध्यापकांनी शाळेतून नाव काढून टाकले. घरात तांदळाचा दाणा नव्हता. उपास पडत होते. शेजारच्या परदेशी बाईच्या हे लक्षात आले. तो श्रावणाचा महिना होता. त्या शेजारच्या बाईंनी श्रीधरला बोलावले. ब्राह्मणाच्या मुलाला जेवायला कसे घालायचे म्हणून वाटीभर दह्यात साखर घालून श्रीधरला ते खायला दिले. माणुसकोच्या या स्पर्शाने श्रीधरचे मन गलबलून आले.

X

Right Click

No right click

Hits: 105
X

Right Click

No right click