लेखक - प्रकाशक - अध्यक्ष निवेदन

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

एस्. एम्. जोशी
स्वातंत्रयसेनानी आणि समाजवादी नेते
ग. प्र, प्रधान
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

अध्यक्षांचे निवेदन
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची फेब्रुवारी २००० मध्ये पुनर्रचना झाली. त्या पुनर्रचित मंडळाने ज्या विविध योजना नव्याने हाती घेतल्या त्या योजनांपैकी "महाराष्ट्राचे शिल्पकार" ही एक योजना आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे, अशा ७५ महनीय व्यक्तींची जीवनचरित्रे लिहून ती मंडळातर्फे प्रकाशित करण्यात येणार आहेत.

कुमारवयीन विद्यार्थी, ज्यांचे फारसे शिक्षण झालेले नाही; असे ग्रामीण व नागरी भागातील वाचक हा या ग्रंथमालेचा वाचक धरण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा वाचकांना आकलन होईल अशी सुलभ भाषा व मांडणी या ग्रंथाची असावी तसेच प्रत्येक ग्रंथ शंभर ते सव्वाशे पृष्ठांचा व्हावा, अशी ही योजना आहे.

या योजनेअंतर्गत एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते हा पहिला चरित्र ग्रंथ प्रकाशित होत आहे. खरे तर तेराव्या शतकापासून आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीचे एक समग्र चित्र या ग्रंथमालेतून उमटावे हा बा योजनेचा हेतू असल्यामुळे कालानुक्रम निश्चित करून हे चरित्रग्रंथ प्रकाशित करण्याचा मंडळाचा मनोदय होता. परंतु त्यामुळे या योजनेतील पुस्तके प्रसिद्ध होण्यास खूप विलंब लागण्याची शक्‍यता होती. म्हणून जसजशी ही चरित्रे लिहून होतील तसतशी ती प्रसिद्ध करण्याचा निर्णय मंडळाने घेतला.

एस्. एम्. जोशी यांचे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण स्थान आहे. हा चरित्रग्रंथ आदरणीय प्रा. ग. प्र. प्रधान यांनी लिहून दिलेला असल्यामुळे व त्यांनी या चरित्रग्रंथाचे मन:पूर्वक लेखन केले असल्यामुळे या ग्रंथमालेचा स्तर निश्चित वाढलेला आहे, असे मला वाटते.

प्रधानसरांचा मी ऋणी आहे.

रा. रं. बोराडे
मुंबई अध्यक्ष
दि. १२ नोव्हेंबर, २००१ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई


-------

दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

महाराष्ट्राचे शिल्पकार या मंडळाच्या चरित्रग्रंथमालेतील एस्‌. एम्‌. जोशी या प्रा. ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथाची पहिली आवृत्ती नोव्हेंबर २००१ मध्ये प्रसिद्ध झाली. या ग्रंथाची दुसरी आवृत्ती आज दिनांक ६ डिसेंबर २००३ रोजी प्रसिद्ध होत आहे. एखाद्या ग्रंथाची दुसरी आवृत्ती एवढ्या लवकर प्रसिद्ध करण्याचा योग मंडळाला सहसा लाभत नाही. एस्‌. एम. जोशी यांचं मराठी जनमानसात असलेलं स्थान, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी व कार्याविषयी मराठी माणसांना असलेले आदरयुक्त कुतुहल, प्रा. ग. प्र. प्रधान यांनी या ग्रंथाचं मन:पूर्वक केलेलं लेखन, मंडळाने प्रसिद्ध केलेले ग्रंथ अधिकाधिक वाचकापर्यंत पोहोचावेत यासाठी मंडळाने गेल्या ३ वर्षांत केलेले पद्धतशीर प्रयत्न; यांमुळे या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्याचा आज हा योग येत आहे. धन्यवाद!

मुंबई | रा. रं. बोराडे
दिनांक : ६ डिसेंबर २००३ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

Hits: 93
X

Right Click

No right click