१३. भाऊरावांचे कुटुंबीय - २
१३. भाऊरावांचे कुटुंबीय - २
८) भाऊरावांचे लग्न सन १९०९ साली कुंभोज मुक्कामी झाले होते. भाऊरावांच्या पत्नी सो. लक्ष्मीबाई (माहेरचे नाव आदक्का). भाऊरावांचे वडील कोरेगावला असतानाच नांदावयास आल्या होत्या. त्यावेळच्या रूढीनुसार त्यांना स्वयंपाक आदी घरकामे सासूच्या मार्गदर्शनानुसार करावी लागत. सन १९२७ साली सातारला धनिनीच्या बागेत राहावयास जाईपर्यंत त्या आपला स्पशस्पिर्शसंबंधीचा सनातन आचार बाळगून होत्या. कर्मवीरांची दुसरी मुलगी बेबी (सन १९२८ साली वारली) वसतिगृहातील मुलांच्या ताटातील अन्न खात असे किंवा वसतिगृहातील स्वयंपाकघरातील भाकरीचा तुकडा हातात धरून सो. लक्ष्मीबाईच्या चुलीजवळ नेत असे. सौ. लक्ष्मीबाईच्या ठिकाणी असलेल्या जात, पंथ, धर्म आणि स्पर्शास्पर्शाच्या कल्पना या बेबीमुळे नष्ट झाल्या. त्या भाऊरावांच्या जात-धर्मनिरपेक्ष मानवतेच्या विचाराशी पूर्ण समरस झाल्या. (या स्वत:च वसतिगृहाच्या मुलांना उत्तम स्वयंपाक करण्यास, कालवणास फोडणी देण्यास किंवा सणावारास गव्हाची खीर करण्यास शिकवू लागल्या. वसतिगृहातील मुलांचे आपल्या घरातील चुलीपर्यंत येण्यास, भांड्यास स्पर्श करण्यास त्या विरोध किंवा मज्जाव करीनाशा झाल्या.
९) या बदलास किर्लोस्करवाडीतील जातीनिरपेक्ष समारंभ व लग्नकार्यात, किर्लोस्कर पतीपत्नीची वागणूकही मार्गदर्शक ठरली होती. सौ. राधाबाई किर्लोस्कर यांच्यामुळेच त्या परधर्मीय पुरुषामार्फत स्वत:च्या पोटाचे ऑपरेशनही करून घेण्यास तयार झाल्या होत्या. त्या ता. २०-३-१९३० रोजी सातारच्या सिव्हिल रुग्णालयात बाळंतपणात वारल्या. वसतिगृहातील मुले सौ. लक्ष्मीबाईंना वहिनी म्हणत. वहिनी वारल्या त्याच्या दुसऱया दिवशी पाडवा होता. मृत्युशय्येवर त्या भाऊरावांस म्हणाल्या, “आता मी जगत नाही. माझ्या जाण्याने वसतिगृहातील पाडव्याचा सण थांबवू नका आणि मांझ्या अंत्ययात्रेस सर्व धर्माची मुले असू द्या आणि त्यांचेपेकीच चौघांनी माझी तिरडी आपल्या खांद्यावरून न्यावी.” या माऊलीने एके प्रसंगी वसतिगृहातील धान्य संपळे असताना आपले परम पवित्र मंगळसूत्र गहाण ठेवून त्यातून आलेल्या पैशातून, वसतिगृहाच्या मुलांच्या तोंडी घास घातला होता. आपल्या पतीच्या कार्यात त्यांनी सर्वस्व ओतले होते. या सौ. लक्ष्मीच्या पोटी भाऊरावांना दोन अपत्ये किर्लोस्करवाडीस असताना झाली. पहिले आप्पासाहेब पाटील १९१७ साली जन्मले. दुसरे अपत्य म्हणजे कुमारी शकुंतला. ही सन १९१९ साली झाली. कर्मवीरांनी आपल्या हयातीत या दोघांची लग्ने उरकली होती.
कर्मवीरांच्या हयातीनंतर संस्थेने आप्पासाहेब पाटलांवर संघटक पदाची जबाबदारी सोपविली आहे. कोल्हापूरच्या आप्पासाहेब देसाई या तरुण वकिलाशी शकुंतलेचे लग्न झाले होते. आप्पासाहेब देसाईंनी १९४१-४४ सालात छत्रपती शाहू बोडिंग हाऊसचे मानसेवी अधिक्षक म्हणून वकिली करीत काम पाहिले होते.
१०) कर्मवीर भाऊरावांच्या दिनचर्येविषयी लिहिताना सन १९ २४ नंतरच्या आयुष्याचाच मी प्रामुख्याने इथे उल्लेख करीत आहे.सन १९०९ ते १९१५ पर्यंतच्या त्यांच्या भर तारुण्याचा काळ निश्चित चाकोरीचा नव्हता. कोल्हापुरत असताना किंवा तत्पूर्वीची एकदोन वर्षे भाऊरावांच्या वैचारिक घडणीचा व त्या विचारांच्या प्रयोगाचा काळ म्हणावा लागतो; त्यासोबत उपजीविकेसाठी धडपडण्याचा काळ म्हणावा लागतो.
११) किर्लोस्करवाडीस असताना एक उल्लोजकविक्रेता ही त्यांची भूमिका होती. त्या सोबत सत्यशोधक समाजाचा प्रभावी प्रचारक म्हणून हिंडत असल्याने सामाजिक विषमतेचे ते निरीक्षक होते. त्यांच्या भावी ध्येयाच्या चाचपणीचा हा काळ होता. येथेही सुनिश्चित अशी दिनचर्या ठरलेली नव्हती. परंतु सन १९२१ ते २३ ही तीन वर्षे भाऊरावांच्या आंतरिक तसेच बाह्य बदलाची वर्षे होती. महात्मा गांधींच्या प्रभावाखाली आल्यानंतर भाऊरावांनी पुर्णपणे स्वदेशीचे व्रत घेतले. खादीचा शर्ट, खादीचे धोतर, खांद्यावर महात्मा फुल्याप्रमाणे घोंगडे व काही काळ जाडीभरडी घोंगडीची टोपी ते वापरीत. थंडीपासून संरक्षण म्हणून थंडीच्या दिवसांत भाऊराव लोकरीचे नेहरू जाकीट वापरीत.
१२) सन १९२४ साली साताऱ्यास आल्यावर भाऊरावांनी बाह्य वेषात आणखी बदल केला. डोक्यावरील टोपीचा त्याग केला. पायात वहाणा वापरण्याचे बंद केळे व दाढी वाढविली. हा बाह्य साधेपणा त्यांच्या मानसिक शुचितेची व धारण केलेल्या व्रताची बाह्य चिन्हे होती. त्यांचे ध्येय व व्रत पुढील आयुष्यात १०० टक्के यशस्वी झाल्याचे दिसते. शरीराने ते आईप्रमाणे स्थूल व श्यामल रंगाचे होते. साताऱ्यात आल्यानंतर त्यांच्या दिनक्रमास विशिष्ट रूप प्राप्त झाठे ते असे :
भल्या पहाटे उठून वसतिगृहातील मुठे ज्या ज्या ठिकाणी भाड्याच्या परात राहत तेथे जाऊन त्यांना प्रार्थना व अभ्यासास बसवून त्यांवर देखरेख करणे ही पहिल्या क्रमाची बाब होती. सन १९२७ साली धनिनीच्या बागेत वसतिगृह गेल्यावर या देखरेखीत काटेकोरपणा आला. जिल्ह्यात किंवा इतरत वसतिगृहासाठी धान्य गोळा करताना किंवा देणग्या मिळविताना दिवसात कधी जेवण मिळेल याची निश्चिती नसल्याने ज्या कोणा हितचिंतकाच्या घरी थांबले असतील तेथे आंघोळीनंतर अर्धी ते एक शिळी भाकर, तेल व चटणी अशी न्याहारी करीत. सोबत दही किंवा ताक मिळाल्यास त्यांना अधिक आनंद होई. या न्याहारीनंतर कधी कधी उपासही घडे.
१३) सातार्यात असताना सन १९३५ ते १९४५ या दरम्यान त्यांनी काढलेल्या शाखांना व वसतिगृहांना भेटी देणे व तेथील अडीअडचणी जाणून घेणे हा भाऊरावांचा नित्यक्रम असे. प्रथम पहाटेच छत्रपती शाहू बो्डिंगच्या शाखा नं. १ व २ यांना पायी किंवा वसतिगृहाच्या छकड्यातून भेट देत असत. मुले कंदिलाभोवती बसून अभ्यास करतात ना, कोणी झोपी जात नाहीना, हे पाहत. सोमवार पेठेतील संस्थेच्या कार्यालयात बसण्यापूर्वी त्यांची शिळ्या भाकरीची न्याहारी होत असे. दुपारच्या जेवणात त्यांना ताक फार आवडे. त्यासोबत ज्वारीच्या कण्यांची आंबील असल्यास ते अति खूष असत.
१४) सयाजीराव विद्यालय सुरू झाल्यानंतर सकाळी ९ ते १०च्या दरम्यान ते चार भिंती या संस्थेच्या डोंगरावर मुले शारीरीक श्रम करताना, डबर फोडून खडी तयार करताना किंवा जमिनीचे सपाटीकरण करताना पाहत थांबण्यात त्यांना धन्यता वाटे. कारण सपाटीकरण म्हणजे लाक्षणिक अर्थाने विद्यार्थीवर्गात असलेल्या भेदभावाचे समानीकरण वाटे, टेकाडावरील एकाद्या झाडाखाली थांबून राहात. येथील खडी, कच, तोडी, डबर शिवाजी महाविद्यालयाच्या, सयाजीराव हायस्कूलच्या इमारतीच्या कामी लावण्यात येत असे.
१५) रयत शिक्षण संस्थेच्या कामाची जसजशी लोकांत आणि शासनात जाण निर्माण होई तसतसे लोक, मंत्री व शासकीय अधिकारी भेटीस येत. त्यांना संस्थेच्या शाखेतील काम दाखविणे हेही त्यांच्या दिनचर्येचा भाग असे. सन १९३८ नंतर खेड्यापाड्यात साक्षरताप्रसारासाठी स्वयंसेवी प्राथमिक शाळा काढणे हाही त्यांच्या कामाचा भाग झाल्याने सातार्यातील संस्थांची जबाबदारी पदवीधर झालेल्या आपल्या अनुयायांवर सोपवून ते जिल्हाभर हिंडत, स्नेह्यांना मदतीसाठी भेटत, कोणी व्याख्यानास बोलाविल्यास जात. स्नेह्यांच्या मुलामुलींच्या ठग्नास व इतर् समारंभप्रसंगी प्रवासाची दगदग सोसूनही हजर राहात. हेतू दोन असत. एक, संस्थेस देणगी मिळविणे आणि जमल्यास आपल्या उपवधू झालेल्या तरुण सेवकांसाठी वधू शोधण्याचे काम करणे. साताऱ्यास परत आल्यावर या स्नेह्यांना, किंवा शासकीय अधिकाऱ्यांना वा मंत्र्यांना स्वत:च्या सहीने किंवा सचिवांच्या सहीने पत्रे लिहिणे हा आपल्या दिनचर्येचा आवश्यक भाग मानीत. उतारवयात तर ते “चार भिंती'वर बांधलेल्या संस्थेच्या पत्र्यांच्या छोट्या शेडमध्ये राहत व संस्थेचे काम, विशेषत: तेथे असलेल्या वसतिगृहाकडे आणि तेथे लावलेल्या केळी-नारळीच्या बागेकडे पाहत वेळ व्यतीत करीत. याच चार भिंतीवर शेवटी त्यांनी चिरनिद्रा घेतली. आज तेथेच त्याची समाधी आहे.
Hits: 171