१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ४
१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ४
११) डी. ई. सोसायटीच्या शिक्षकांचा आदर्श संस्थेच्या आजीव सेवकांपुढे असल्याने शिक्षक स्वेच्छेने त्याग करीत. आज शिक्षकांना अनेक मोठ्या वेतनश्रेणीप्रमाणे शासनाकडून १००% पगार मिळतो व ज्या संस्थेमुळे आपले अस्तित्व आहे, तिच्यासाठी किरकोळ त्याग करावयास ते तयार होत नाहीत. अर्थात त्यास कारणही आहे. आजच्या अनेक संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थांना संस्थान बनविले आहे. सर्व सत्ता त्यांच्या हातात एकवटली आहे. शिक्षक केवळ वेतनाचे अधिकारी नोकर झालेत.
त्यांना संस्थेच्या कारभारात काडीचाही अधिकार नाही. मजूर व मालक असे शिक्षकांचे व संस्थाचालकांचे संबंध निर्माण झाले आहेत. 'जनसेवा ही ईश्वरसेवा' हा भाऊरावांचा आदर्श असल्याने ते संस्थापक असले तरी त्यांचे विद्यार्थी व शिक्षक तोच आदर्श स्वत: पुढे ठेवून संस्थेचा कारभार चालवीत. 'संस्था माझी आहे, मी तिच्यासाठी आहे,' (सेन्स ऑफ बिलाॉँगिग) ही भावनाच शिक्षकांत आज नष्ट झाली आहे. कारण उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे स्वार्थत्यागी संस्थापकही आज नाहीत. जे आहेत त्यांचा लोकसंग्रहही थिटा आहे, आणि संस्था स्थापणे म्हणजे स्वत:चे व स्वत:च्या गोतावळ्यांचे चरण्याचे कुरण तयार करणे व समाजसेवा म्हणजे स्वत:च्या सग्या-सोयर्यांची सेवा असे शिक्षण क्षेत्रास स्वरूप आले. त्यास प्रमुख कारण स्वार्थी, राजकीय अनुयायांच्या हाती त्या संस्था सत्तास्थानी असलेल्या राजकीय नेत्यांच्या चुकीच्या धोरणामुळे व कृपाप्रसादाने आल्या. हे घडले व घडत आहे. स्वातंत्र्य चळवळीतून राज्यशकटाची धुरा वाहण्यास आलेले पहिले नेते राजकारणी असले तरी प्रथम ते समाजसेवकच होते.
आज तशी स्थिती नाही. राजकीय सत्ता समाजसेवेसाठी, राष्ट्रोद्वारासाठी राबविण्यापेक्षा स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी राबविण्याकडे आजचे नेते तयार आहेत. म्हणून शिक्षण क्षेत्र हे इतर क्षेत्राप्रमाणे भ्रष्टाचाराने पोखरले आहे. सेवाभावी शिक्षक तयार केले ही भाऊरावांची सर्वात मोठी समाजसेवा आहे हे मान्य करावे लागते. या पार्श्वभूमीवर भाऊरावांचे समाजसेवकांतील स्थान जोखल्यास ते उत्तुंग व अद्वितीय असल्याचे जाणवते. भाऊरावांनी आपल्या शिक्षणसंस्थेतून समाजसेवेच्या अनेक अंगोपांगांनाही स्थान दिले होते, ते असे.
१२) भाऊराव स्वत: शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टीकडे लक्ष देत. १८ ऑगस्ट १९२९ रोजी पुण्यात जेधे मॅन्शनमध्ये मुंबई इलाखा शेतकरी संघाची स्थापना सातारच्या आर. जी. राणे वकिलांच्या अध्यक्षतेखाली झाली. भाऊराव तिचे सभासद होते. त्यांनी ठराव मांडला की सन १९२० नंतर ज्या ज्या तालुक्यांत सारावाढ झाली असेल तेथे फेरचौकशी होण्यासाठी चळवळ उभी करावी व तो ठराव पास झाला. या सभेत शेतकऱ्यांच्या को-ऑपरेटिव्ह सोसायट्या असाव्यात असे ठरले होते. भाऊरावांनी यापूर्वीच १९२० सालच्या नोव्हेंबर महिन्यांत इस्लामपूरला सहकारी पेढ्यांची परिषद भरविली होती व तिच्यापुढे प्रा. वा. गो. काळे यांचे 'सहकारिता व मागासलेले वर्ग' या विषयावर व्याख्यान करविले होते. (रा. अ. कडियाळकृत ना. भा. वि. जाधव यांचे चरित्र व कार्य, पु. १५१-१७६). रयत शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतर सन १९४० साली शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडावी म्हणून रयत सेवक को-ऑप. क्रेडिट सोसायटी स्थापन केली. तिचे आज विशाल सहकारी बँकेत रूपांतर झाले आहे.
सन १९१५ साली किर्लोस्करवाडीस काम करीत असताना तेथील कामगारांना पहिल्या महायुद्धामुळे जीवनावश्यक वस्तू मिळणे अवघड झाल्याने भाऊरावांनी त्यांच्यासाठी सहकारी स्टोअर्स सुस केले होते. त्याच धर्तीवर दुसर्या महायुद्धकाळी वसतिगृहाच्या मुलांना व संस्थेच्या सेवकांना जीवनावश्यक वस्तू व धान्य मिळावे म्हणून रयत सेवक को-ऑप. स्टोअर्सची स्थापना सन १९४२ साली केली. सन १९४०-४१ साली स्थापन केलेल्या सौ. लक्ष्मीबाई पाटील स्मारक फंडाचे शिक्षणोत्तेजक सहकारी पतपेढीत रूपांतर करून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कर्जाऊ रकमा शिक्षणासाठी देण्याची सोय सन १९५७ पासून करण्यात आली. माण तालुक्यात राजेवाडी तलावाशेजारची शेती करण्यासाठी सहकारी शेती संस्था व पिंगळीस मेंढ्यांचे पैदास केंद्र सुरू केले.
Hits: 124