६. स्वदेशी उद्योजकांच्या सहवासात - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

६. स्वदेशी उद्योजकांच्या सहवासात - २

५) हे जरी खरे असले तरी या प्रचारातून अस्पृश्यतेचे व जातीनिर्मूलनतेचे आणि शिक्षणप्रसाराचे काम होत नाही हे भाऊरावांच्या व्यवहारी दृष्टीस आढळून आले. सन १९१५ फेब्रुवारी ते १९२१ च्या नोव्हेंबरपर्यंत भाऊराव किर्लोस्करवाडीस असताना ते महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात विदर्भापासून ते कारवारपर्यंत, तसेच शहरी विभागातून उभेआडवे हिंडून सत्यशोधक समाजाचा तसेच किर्लोस्करांच्या अवजारांचा प्रचार करताना त्यांना दिसून आले की सारा समाज जातीपातीने विभागला आहे. अज्ञानाने राजकीय दृष्ट्या इंग्रजांच्या गुलामगिरीत, धार्मिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या पुढारलेल्या, मग ते कोणी ब्राह्मण असोत, पुरोहित असोत की जमीनदार असोत, त्यांच्या गुलामगिरीत तो अडकलेला आहे. यांवर त्यांना उपाय दिसला तो विद्येचाच. महात्मा फुल्यांनी म्हटल्याप्रमाणे 'पट्टीपुरती* तरी अडाणी जनतेस विद्या मिळालीच पाहिजे असे त्यांना वाटे. सन १९१७ साली व्हाईसरॉयने जाहीर केले होते को, पहिल्या युद्धाच्या शेवटी भारतीय जनतेस ब्रिटिशांकडून राजकीय सवलतीचा एक हप्ता दिला जाईल.

६) सत्यशोधक समाजातील श्रीमंत व उच्चवर्णीय मंडळी ब्राह्मणेतर पक्ष स्थापून राजकारणात शिरण्याच्या व सत्तेत भागीदारी मिळविण्याच्या तयारीत होती. सन १९२० साली पुण्यास जेधे मॅन्शनमध्ये १२-१२-१९२० रोजी श्री. जगदेवराव ऊर्फ भाऊसाहेब महाराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली ब्राह्मणेतर पक्ष स्थापण्यात आला. भाऊरावांच्या लक्षात आले की राजकारणाच्या पाठीमागे लागल्यास सत्यशोधक समाजाचे सामाजिक व शैक्षणिक सुधारणेचे काम होणार नाही. अशा वेळी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सत्यशोधक समाजाची परिषद ता. २५ सप्टेंबर १९१९ रोजी काले, ता. कराड या गावी भरली होती. कृ. भा. बाबरासारखे सत्यसमाजिस्ट लेख लिहून सांगत होते की, भारत सेवक समाजासारखी संत्था स्थापून आजन्म सत्यसमाजाचे काम करणारे कार्यकर्ते पाहिजेत. (हीरक महोत्सव ग्रंथ, १९३४, पू. २६)

भाऊरावांच्या दृष्टीपुढे खेड्यातील सामान्य शेतकरी येत असल्याने त्यांनी या सभेत 'रयत शिक्षण संस्था” स्थापण्याचा ठराव मांडला व तिच्याद्वारे सत्यशोधक समाजाचे 'सत्य आणि नित्य' असलेले शैक्षणिक कार्य करण्याचे ठरविले.

ठराव एकमताने पास झाला. मात्र तिच्यामार्फत शाळा वगैरे तात्काळ सुरून करता दुधगावच्या धर्तीवर विद्यार्थी वसतिगृह सुरू करण्याचा पूरक ठराव मांडला तोही पास झाला. काल्याच्या सत्यसमाजिस्टांनी विशेषतः दाजी पाटील, नारूकाका खोत, भाऊराव चौगुले व बंडोबा शेटे यांनी वसतिगृहाची जबाबदारी स्वीकारण्याचे कबूल केले. ४-१०-१९१९ रोजी दसर्‍याच्या दिवशी हे वसतिगृह सुरू झाले व रयत शिक्षण संस्थाही स्थापन झाली. या वसतिगृहाच्या व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षपदी सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष धनजीशा कूपर या पार्शी गृहस्थास निवडण्यात आले. सन १९२२ सालच्या र. शि. संस्थेच्या अहवालानुसार काल्याच्या वसतिगृहात २० मुले होती. त्यांची वर्गवारी अशी :- मराठे ९, जैन ३, मुसलमान ३, कोष्टी १, परीट १, लिंगायत १, न्हावी १, कुंभार १. सन १९२४ साली सातार्‍यात वसतिगृह सुरू झाल्याने हे वसतिगृह बंद झाले.

Hits: 97
X

Right Click

No right click