१७. श्रीटिळकस्तवन

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता Written by सौ. शुभांगी रानडे

१७. श्रीटिळकस्तवन
(आर्या-गीति)

लाजविलेंसि निज यशें धवलें त्वां सत्य हिमनगा तिलका ।
संतत जनपदसेवार्पित तूं तुज कविन गान गातिल कां? ॥ १

अनलस जनकार्यातें आर्यातें रक्षि शंभु टिळकातें ।
शुक्‍लेंदुयशें लज़ित तेथें होतील ना कुटिळकांते?॥ २

स्वार्थास्तव ना केलें दुष्कृतिमंडन कदापि तिलकानें ।
यत्कीर्तिश्रवणामृत दुर्लभ सज्ञन सदा पितिल कानें ॥ ३

जनसेवेस्तव झटतां झट कारी नेति बाल तिलकाला ।
दुःसह छल सोसावा लागे या आर्यभालतिलकाला ॥ ४

परि धीर धरी केसरि, सरि पार्था ना शरासनचि टाकी ।
कीं “'केसरी'"' सरी जें पात्रत्व न तें '"सरांस'' नचि टांकी? ॥ ५

दृढ स्नेह असे जो जो राष्ट्रहितोद्युक्त त्यांशि तिलकांचा ।
राष्ट्रविघातक अरिच्या होती केसरिपुढें शिथिल कांचा ॥ ६

प्रेमा ठेविति साधू अिहलोकीं, देवता नभीं, तिलकीं ।
यमदूत स्पर्शाया राष्ट्रहितेच्छू सतां न भीतिल कीं ॥ ७

देवा तुझ्या हवालीं केला हा कीर्तिनीतिचा ठेवा ।
व्हा वाली, स्तेनभयापासुनि ह्या रक्षुनी सुखें ठेवा ॥ ८

गातो आर्यांतें श्रीमयुरेशस्फूर्तिने '“*विनायक"' तो ।
नायक तो जगताचा तिलकस्तवास मुदित आयकतो ॥ ९

- नाशिक, १९००

* केसरी म्हणजे टिळकांस जी योग्यता होती ती सरांस म्हणजे 'सर' ही पदवी धारण करण्यारांस नव्हती. जसें
(सरीं) सरोवरास जी पात्रता आहे ती टाक्‍यास नसते.

Hits: 176
X

Right Click

No right click