७. मातृशोकालापाष्टक

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता Written by सौ. शुभांगी रानडे

७. मातृशोकालापाष्टक

॥ आर्या ॥

माते सोडुनि झालीं आम्हाला येथ आज सहा वर्षे ॥
बरवें नांव वगळिले ? दु:खाग्निंत मेघ हा जसा वर्षे ॥ १ ॥

गेलीस नाइलाजचि आतां जातीस तूं जरी माते ॥
मी काय सोडितो तुज, शतगुण तप्ता जरी' माते ॥

वाटे असशील खरी नित्य सुखें आज तूं विटलि नाकीं ॥
ग्रंथश्रवणोत्पादक स्वर्गाची हौस तव फिटलि ना कीं? ॥३ ॥

पालट जाअुं कराया पुत्रालिंगन सुखें जरी माते ॥
माते इच्छा तरि बरि लधिमा परि येथ ना गरीमाते 1४ ॥

क्षण थांब अनुसरोनी सत्पथ, साधु, श्रुतित्रयाला हो ।
नवरी वरील कीर्ति सुजन म्हणो कीं सुपात्र याला हो ॥५ ॥

त्या त्रयगामिनिला मग पुरवाया कामनेसि आगमना ।
करण्या आज्ञापिन मी स्वर्गी द्यायासि तोष सांग मना ॥ ६ ॥

मच्छाया मानुनियां मम ठायां ती सुखे तिला भेटे ।
दाटेल तुझा कंठहि चुकशिल तव वृत्त कळविण्या वाटे ॥७ ॥

वंदन पदकमली तव नंदन करि गीत गात आर्यात ।
मंद न धी होउ, झिजो चंदनसा देह देशकार्यात ॥८ ॥

ह्या आर्या अत्यंत नम्नत्वें माझ्या परलोकवासी मातेला अर्पण केल्या आहेत.
३१-१-१८९९
वय १६.

Hits: 129
X

Right Click

No right click