ग.दि.माडगूळकर
ग.दि.माडगूळकर हे कवी, गीतकार, चित्रपट कथालेखक या नात्यांनी महाराष्ट्रीय जनतेला परिचित आहेत. त्यांचे संपूर्ण नाव गजानन दिंगबर माडगूळकर असे होते. ग.दि.माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्यातील शेटफ़ळ या गावी इ.स. १९१९ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल, औंध या गावी झाले. ग.दि.माडगूळकर हे एक कवी म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत. ‘आधुनिक वाल्मिकी ’अशा शब्दात त्याचा गौरव केला जातो .ग.दि.माडगूळकरांनी मराठीतील व हिंदीतील अनेक चित्रपटांच्या कथा, संवाद, व गाणी लिहिली आहेत. त्यापैकी काही गाजलेले चित्रपट - पुढचं पाऊल, बाळा जो जो रे, लाखाची गोष्ट, ऊन पाऊस, सांगत्ये ऎका, जगाच्या पाटीवर, इत्यादी.
माडगूळकरांच्या चैत्रबन व जोगिया या काव्यसंग्रहाना आणि मंतरलेले दिवस या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. भारत सरकारने ‘पद्मश्री’हा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता.
ग्रंथसंपदा : चैत्रबन, जोगिया, गीतारामायण, गीतगोपाल, गीतसौभद्र, चंदनी उदबत्ती, कृष्णाची करंगळी, आकाशाची फ़ळे, वाटेवरच्या सावल्या, बांधावरच्या बाभळी, तीळ आणि तांदूळ, मंतरलेले दिवस इत्यादी.