आचार्य प्र. के. अत्रे

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

आचार्य प्र. के. अत्रे (१८९८-१९६९)

आचार्य अत्रे हे उभ्या महाराष्ट्राचे लाडके व अष्टपैलू व्यक्तिमत्व होय. एक प्रभावी व विनोदी वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध होते. आचार्य अत्रे यांचे संपूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे असे होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील कोठीत या गावी इ.स.१८९८ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण सासवड, पुणे व मुंबई येथे झाले. महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ञ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

सांष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, जग काय म्हणेल?, भ्रमाचा भोपळा, मोरूची मावशी, उद्याचा संसार, तो मी नव्हेच, डॉक्टर लागू ही त्यांची रंगभूमीवर गाजलेली काही नाटके होत. त्यांनी ‘केशवकुमार’ या नावाने विडंबनात्मक कविता लिहिल्या.‘झेंडूची फ़ुले’हा त्यांचा विडंबनात्मक कवितांचा संग्रह अतिशय गाजला. त्यांनी ‘नवयुग’हे साप्ताहिक व ‘मराठा’हे दैनिक चालविले होते. त्यांच्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळाले होते. ‘महात्मा फ़ुले’ हा त्यांचा आणखी एक चित्रपट राष्ट्रीय पारितोषिकाचा मानकरी ठरला होता.

संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक प्रमुख नेते होते. आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातही महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. यांशिवाय अनेक जनआंदोलनात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. इ.स. १९४२ मध्ये नासिक येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

ग्रंथसंपदा : सांष्टांग नमस्कार, पराचा कावळा, पाणिग्रहण, गुरुदक्षिणा, कवडीचुंबक, वंदे मातरम्‌, जग काय म्हणेल, घराबाहेर, उद्याचा संसार, मोरुची मावशी, ब्रम्हचारी, भ्रमाचा भोपळा, प्रीतिसंगम, मी मंत्री झालो, मी उभा आहे, बुवा येथे बाया, डॉक्टर लागू, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच इत्यादी नाटके. कर्‍हेचे पाणी व मी कसा झालो? हे आत्मचरित्रपर ग्रंथ यांशिवाय आषाढस्य प्रथम दिवसे, केल्याने देशाटन, मराठी माणसे मराठी मने, सिंहगर्जना, हास्यकथा, हंशा आणि टाळ्या, अत्रे उवाच, विनोदगाथा, सूर्यास्त, मुद्दे आणि गुद्दे, समाधीवरील अश्रु, हुंदके, दुर्वा आणि फ़ुले, साहित्ययात्रा इत्यादी अनेक ग्रंथ.

Hits: 476
X

Right Click

No right click