आचार्य बाळशास्त्री जांभेकर

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

(संदर्भ सौजन्य - योगेश पवार व्हाट्सएप मेसेज)

स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटीमध्ये एका भारतीय व्यक्तीचा २०० वर्षांपूर्वी लिहिलेला अर्ज आदरपूर्वक जतन करून ठेवलेला आहे. नामवंत एल्फिन्स्टन कॉलेजच्या प्राध्यापक पदासाठी केलेला तो अर्ज होता . नोकरीचा किरकोळ अर्ज संग्रालयात ठेवण्या इतपत प्रभावीपणे मांडणाऱ्या एका मराठी बुद्धिवंताचा थोडक्यात परिचय .

ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या पारतंत्र्यात भारत सखोल बुडालेला असतानाच ६ जानेवारी १८१२ साली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला .कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वाघोटन खाडीच्या किनाऱ्यावर 'पोंभुर्ले ' गाव आहे . या गावात अतिशय गरीब कुटुंबात त्यांचे बालपण गेले .हालाकीची परिस्थिती असतानाही आई सगुणाबाई आणि वडील गंगाधरशास्त्री यांनी त्याना शाळेत घातले आणि पुढे इतिहास घडला .

जन्मजात अफाट बुद्धिमत्ता लाभलेले बाळशास्त्री शालेय जीवनात प्रचंड वेगाने विद्याभ्यास करू लागले .पाठांतर दांडगे असल्यामुळे स्वतःच्या इयत्तेतील पुस्तके समजून घेतल्यानंतर पुढच्या दोन दोन इयत्तामधील अभ्यास ते एकत्रितरित्या करू लागेल . त्यांची तल्लख बुद्धिमत्ता पाहून सर्वजण त्यांना 'बालबृहस्पती' म्हणू लागले .१८२६ साली त्यांनी मुंबई एजुकेशन सोसायटी या इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला . त्यांच्या सखोल अभ्यासामुळे वयाच्या १४ व्या वर्षी त्याच शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली आणि ती सुद्धा पगारी .परंतु फक्त गणितेय बुद्धिमत्तेपुरते आपले ज्ञान त्यांना मर्यादित ठेवायचे नव्हते आणि त्यामुळेच विविध भाषा शिकण्याचा त्यांनी सपाटा सुरु केला . जिज्ञासेमुळे अल्पावधीतच मराठी , संस्कृत , बंगाली , गुजराथी , कानडी, तेलगू , इंग्रजी ,पारशी ,फ़्रेंच , लॅटिन ,ग्रीक , उर्दू या सर्व भारतीय आणि परदेशी भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले . हे कमी पडले म्हणून कि काय त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास सुरु केला आणि त्यातही ते पारंगत झाले .ज्योतिष्य शास्त्रावर सुद्धा त्यांनी आपली पकड घट्ट केली . बॉंबे नेटिव्ह सोसायटीचे बापू छत्रे त्यांचे शिक्षक . १८३० साली वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी बाळशास्त्री बॉंबे नेटिव्ह सोसायटीचे ‘डेप्युटी सेक्रेटरी’ झाले .

१८३४ साली एल्फिन्स्टन महाविद्यालयाची स्थापना झाली .त्या महाविद्यालयात रुजू होणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले मराठी सहायक प्राध्यापक . गणित , भौतिक शास्त्र आणि खगोलशास्त्र हे अवघड विषय ते शिकवायचे . दादाभाई नवरोजी , भाऊ दाजी लाड हे आचार्य बाळशास्त्री यांच्या हाताखाली शिकून गेलेले काही महान विद्यार्थी .एल्फिन्स्टन महाविद्यालयात रुजू होण्यापूर्वी आपल्या जन्मदिनी ६ जानेवारी १८३२ साली त्यांनी 'दर्पण' हे द्विभाषिक वर्तमानपत्र मुंबईत काढले . महाराष्ट्रातील हे पहिले मराठी वर्तमानपत्र ! त्यापूर्वी १७७९ पासून 'बॉंबे हेरॉल्ड' हे महाराष्ट्रातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र उपलब्ध होते . परंतु मराठी भाषेमध्ये दर्पण हेच पहिले वर्तमानपत्र बनले. एका बाजूला इंग्रजी आणि दुसऱ्या बाजूला मराठी मजकूर अशा दोन भाषेत हे वर्तमानपत्र होते. जांभेकरां चे वर्गमित्र भाऊ महाजन त्यातील इंग्रजी भाग संपादित करत . सुरवातीला दर्पण हे पाक्षिक होते . ४ महिन्यांनंतर ते साप्ताहिक बनले .याचा आकार १९ इंच लांब आणि साडे एकोणीस इंच रुंद असा होता .एकूण आठ पानांच्या या साप्ताहिकाची वार्षिक वर्गणी ६ रुपये होती .दर्पणचा खप ३०० प्रति इतका अत्यल्प असला तरी त्या काळात इतर प्रतिथयश वृत्तपत्रांचा अधिकतम खप ४०० प्रति इतकाच होता .दर्पणमुळे मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रचली गेली . पहिले मराठी पत्रकार होण्याचा मान अर्थातच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या दूरदृष्टीमुळे मिळाला. ते 'दर्पणकार' या नावाने आजही ओळखले जातात आणि त्यांचा जन्मदिवस 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो .दुर्दैवाने १ जुलै १८४० रोजी 'लास्ट फेअरवेल' हा लेख लिहून दर्पणचा प्रसार थांबला . ' लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रोनिकल' या पत्रात अखेरीस दर्पण विलीन करण्यात आले .

'विद्या हे बळ आहे ' असे मानणाऱ्या बाळशास्त्रींनी त्यानंतर 'दिग्दर्शन ' हे शैक्षणिक मार्गदर्शन करणारे मासिक काढले . हे सुद्धा दर्पण प्रमाणेच इंग्रजी व मराठी अशा दोन भाषेत विभागलेले होते .भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , व्याकरण , गणित , भूगोल , इतिहास या विविध शाखेतील विषयांवर बाळशास्त्री दिग्दर्शनमध्ये मार्गदर्शन करत . त्यांचे वर्गमित्र भाऊ महाजन यांनी त्याच वर्षी 'प्रभाकर 'नावाचे मराठी मासिक काढले . संपूर्ण मराठीत असलेले महाराष्ट्रातील हे पहिले मासिक . लोकहितवादींची गाजलेली १०८ शतपत्रे याच मासिकात छापली गेली .एकंदरीतच बाळशास्त्री यांच्या दूरदृष्टीमुळे मराठी वृत्तपत्र समूहाने आकार घेतला .
वर्तमानपत्रापुरते मर्यादित न राहता बाळशास्त्रींनी पुस्तके लिहिण्याचा उपक्रम हाती घेतला . महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळासाठी विविध भाषेतील शालेय पाठयपुस्तके निर्मिती करण्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे . इतिहास , भूगोल , गणित , छंदशास्त्र , नीतिशास्त्र या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली . बालव्याकरण सारखी मराठी पाठयपुस्तके सर्वप्रथम त्यांनी बनवली .फक्त शाळकरी अभ्यासक्रमापुरते न थांबता उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पुस्तके लिहिली . इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना फेफरे आणणाऱ्या गणितातील अवघड डिफरनसीएल कॅलक्यूलस सारख्या अवघड विषयावर आधारित 'शून्यलब्धी ' हे पहिले पुस्तक त्यांनी लिहिले .प्रतिष्टीत रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकांमध्ये बालशास्त्रींचे लेख प्रसारित होत . असा मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय होते .

शैक्षणिक क्षेत्रातून अध्यात्मिक क्षेत्रात पाऊल टाकत १८४५ साली बाळशात्री जांभेकर यांनी ज्ञानेश्वरीचे पाठभेदांसहित संपादन करून ज्ञानेश्वरीची पहिली छापील प्रत जगाला उपलब्ध करून दिली. त्याचमुळं त्यांना ज्ञानेश्वरीचे आद्यप्रकाशक म्हणून ओळखले जाते . कोकणात गावागावात जाऊन विविध भाषांमधील उपलब्ध ताम्रपटाचे वाचन करून इतिहास लेखन करण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले . या त्यांच्या कार्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे आद्य इतिहासकार म्हटले जाते . विधवा विवाहाचे ते समर्थक होते आणि त्यामुळेच राजा राम मोहन रॉय यांचे ते चाहते होते . रॉय यांचे बंगाली भाषेतील लिखाण वाचता यावे फक्त यासाठी ते बंगाली भाषा शिकले . हिंदू धर्माचे कट्टर पुरस्कर्ते असलेले बाळशास्त्री धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात होते . त्यांच्या काळात धर्मांतरावर गाजलेले शेषाद्री प्रकरण आजही चर्चेत आहे .

अंबाजोगाई येथील गोविंद शेषाद्री यांना दोन मुले होती . त्यापैकी मोठा मुलगा नारायण याला ख्रिस्ती मिशनरीजनी धर्मांतर करून ख्रिश्चन धर्मात सामील केले . त्याचा धाकटा भाऊ श्रीपती पुढे त्याच मार्गावर निघाला होता .बाळशात्रीना याची माहिती मिळताच त्यांनी श्रीपतीला गाठले. जस्टीस पेरी यांच्यामार्फत त्याचा ताबा घेतला आणि त्याचे मनपरिवर्तन घडवले .त्याची मंजुरी मिळताच काशी येथे नेऊन त्याची शुद्धी करून त्याला पूर्ववत हिंदू धर्मात प्रवेश करवून घेतला. परंतु त्यानंतर त्यांच्यावर या कृत्याबद्दल कडाडून टीका झाली .५७ दिवस यवनांकडे राहिलेल्या हिंदू व्यक्तीला पुन्हा धर्मात आणल्याबद्दल अखेरीस पुण्यात त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला .

बाळशास्त्री तत्वाचे पक्के होते .मुंबई विभागाचे शाळा इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती झाली असताना एकदा पगारात १ रुपया जास्त दिला गेला . ही बाब त्यांनी संबंधित ब्रिटिश खात्याकडे कळवली व पुढील महिन्यात तो एक रुपया कमी देण्याची विनंती केली . परंतु पुढील महिन्यात तो वाढीव रुपया वळता केला गेला नाही . असे चार महिने गेल्यानंतर बाळशास्त्री यांनी अधिकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहून 'जोपर्यंत तुम्ही मला दिलेला अधिकचा रुपया जमा करत नाही तोपर्यंत मी पगार घेणार नाही ' अशी धमकीच दिली .या त्यांच्या पत्रामुळे अधिकारी हबकलेच .

बाळशास्त्री यांनी अनेक पदे भूषवली . शिक्षक ट्रेनींग स्कुलचे ते संचालक होते . कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. १८४० साली त्यांना जस्टीस ऑफ पीस बहाल करण्यात आले . याद्वारे तंटे सोडवण्याची कायदेशीर जबाबदारी त्यांना मिळाली .विद्यमुकुटमणी ,पश्चिम भारतातील आद्यकृषी अशा विविध पदव्या लोकांनी त्यांना दिल्या. बाळशास्त्री यांनी विविध विषयांवर वैविध्यपूर्ण पुस्तके लिहिली .इंग्लंड देशाची बखर (१८३२),ज्योतिषशास्त्र(१८३५) ,बाल व्याकरण (१८३६),भूगोल विद्या (१८३६),सार संग्रह (१८३७),नीती कथा (१८३८),हिंदुस्थानचा इतिहास (१८४६), हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास (१८४९),हिंदुस्थानातील इंग्रज राज्याचा इतिहास , शून्यलब्धि , शब्दसिद्धी निबंध ,मानस शक्ती विषयक शोध इत्यादी .

दुर्दैवाने आचार्य बाळशास्त्री अल्पायुषी ठरले .१८ मे १८४६ रोजी वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले . कोकणातील वनवेश्वर येथे इतिहासलेखन करत असताना ताप येऊन त्यांचा मृत्यू झाला . त्यांच्या निधनाची बातमी येताच मुंबई उच्च न्यायाधीशाने कोर्टाचे कामकाज स्थगित करून त्यांना मानवंदना दिल्याची नोंद आहे . जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही ! ही म्हण आपल्या अल्पायुषी कारकिर्दीत कामाचा प्रचंड डोंगर उभारून बाळशास्त्री यांनी खरी केली . बाळशास्त्री यांचे कार्य अफाट आहे परंतु ते पुढे दुर्लक्षितच राहिले . 'दर्पण' मुळे ते थोडेफार चर्चेत आले अन्यथा त्यांच्या विविधांगी कार्याची दखल भारतीय जनतेने फारशी घेतलेली दिसत नाही . आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना भावपूर्ण आदरांजली !!

योगेश पवार
०५/०१/२०२१

Hits: 702
X

Right Click

No right click