मुरुड- जंजिरा
Image Source : Google |
रायगड जिल्ह्यातील हा आणखी एक इतिहासप्रसिद्ध किल्ला होय. पण हा किल्ला भर समुद्रात बांधण्यात आला असून मराठी दौलतीच्या इतिहासात या किल्ल्याचा उल्लेख अनेकवार केलेला दिसतो. कोकण किनाऱ्याला लागूनच अलिबागच्या दक्षिणेकडे, अलिबागपासून जवळपास ५० कि.मी. अंतरावर मुरूड हे एक तालुक्याचे गाव असून ते इतिहास प्रसिद्ध आहे. या गावाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. नारळी-पोफळीच्या बागांनी या गावाचा आसमंत हिरवागार आहे. मुरूडच्या परिसरात काही इतिहासकालीन वास्तूंचे अवशेष अजूनही पहायला मिळतात. या गावात असलेला इतिहासकालीन राजवाडा `नबावाचा राजवाडा' म्हणून प्रसिद्ध आहे. हा वाडा तसा जुनाट असला तरी भग्नावस्थेतही त्याची भव्यता, बांधकामातील सौंदर्य आजही आपल्याला थक्क करते. मुरूड पासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर भर समुद्रातील बेटावर जंजिरा किल्ला उभा आहे. मुळातच मुरूडचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. किनाऱ्यावरून दिसणारा हा भव्य किल्ला तर सौंदर्यात आणखीनच भर टाकतो. मुरूडचा जंजिरा किल्ला चहू बांजूनी पाण्याने वेढला आहे. या किल्ल्यात जाण्यासाठी नावेने प्रवास करावा लागतो. किल्ल्यातील अंतर्भाग अजूनही चांगल्या स्थितीत आहे. पीर पंचायतन, सुरूलखानाचा वाडा, किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि या तटबंदीवर उभारण्यात आलेले अनेक भक्कम बुरूज आजही काळाशी टक्कर देत आहेत. किल्ल्यातील या बुरूजावरून बसविलेल्या काही तोफा आजही इतिहासाची साक्ष देत आहेत. ३५० वर्षापूर्वी अहमदनगरचा राजा मलिक अंबरने या अभेद्य जलदुर्गाची उभारणी केली, असा इतिहासाचा दाखला आहे. कोकण किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्व जलदुर्गात हा किल्ला अतिशय भक्कम आणि अभेद्य असल्याने तो सदैव अजिंक्य राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तसेच त्यानंतरही मराठ्यांनी हा किल्ला सर करण्याचे अनेकदा प्रयत्न केले, पण ते असफल झाले. या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी य किल्ल्यानजिक पाच सहा कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही जंजिरा जिंकणं महाराजांना शक्य होऊ शकलं नाही. |