सांगली

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: आमचा जिल्हा Written by सौ. शुभांगी रानडे

कृष्णाकाठचा घोटीव घाट, बाजूची रम्य वनश्री. संथ वाहणारी कृष्णामाई. असंच काठाकाठानं गेलं की दिसणारा तो बागेतील गणपती. ती घनदाट चिंचेची बनं, पेरूच्या बागा आणि थोडं चालल्यावर, हरिपूरची वेस ओलांडल्यावर दिसणारा कृष्णा वारणेचा सुरेख संगम. शेजारी पवित्र आणि गंभीर वातावरण निर्माण करणारं, श्री संगमेश्वराचं ऐतिहासिक मंदिर. नुसतं त्या संगमाच्या काठावर उभं राहिलं, नदीकाठाला बिलगलेली हिरवीगार झाडं बघितली, उभ्या पिकांची सळसळ ऐकली आणि नदीवरून येणारा गार गार वारा नाकातोंडात भरून घेतला की, पैशा-अडक्याच्या व्यावहारिक जगात अडकलेलं आपलं मन नकळत काव्यमय होतं.

सांगलीला असा सुंदर चेहरा मिळाला तो १८०१ साली. त्यापूर्वी गाव अस्तित्वातच नव्हतं असं नाही, परंतु ते अगदीच नगण्य होतं. पेशवाईत उदयास आलेल्या पटवर्धन सरदारांची मिरज ही जहागिरी होती. तिच्या २२ कर्यातींपैकी सांगली ही एक कर्यात होती. ( जवळ जवळ असणार्‍या तीन-चार गावात मिळून एक कर्यात म्हणत असत.) या पटवर्धन मंडळीत मालमत्तवरून कलह माजला, तेव्हा दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या संमतीने वाटण्या झाल्या. थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन आपला हिस्सा घेऊन बाहेर पडले. कृष्णातटाकी थोडं उंचवट्यावर असलेलं सांगली गाव त्यांना आवडलं. सांगली त्यांनी आपल्या संस्थानची राजधानी बनवली आणि इथून सांगलीचं भाग्य फळफळलं!

सांगली गावाच्या नावाविषयी अनेक समजुती आहेत. काहींच्या मते कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या संगमाजवळ वसलेलं गाव म्हणून गावाचं नाव र्संगमहल्ली ( हल्ली म्हणजे कानडीत गांव. कर्नाटकचा मुलुख जवळ असल्यानं) होतं. काहींच्या मते मूळ नांव संगळकी असं होतं. पुढं नद्यांच्या संगमावरील म्हणून र्संगमी नाव पडलं आणि अपभ्रंश होऊन र्सांगली झालं. तथापि कृष्णा नदीकाठी सहा गल्ली असलेलं गाव म्हणजे `सांगली' ही त्यातल्या त्यात सर्वमान्य असलेली समजूत.

१८०१ काली चिंतामणरावांनी सांगली संस्थान स्थापन केलं तरी सुरुवातीची त्यांची काही वर्षे, धोंडजी वाघाबरोबरची आणि करवीरकरांविरुद्ध चाललेल्या युद्धातच गेली. नंतर मात्र लागलीच त्यांनी सांगली गावाच्या संरक्षणासाठी सुप्रसिद्ध `गणेशदुर्ग' बांधला. चारी बाजूंनी खंदक असलेला हा भुईकोट किल्ला म्हरजे सांगलीचे एक वैशिष्ट्य होतं ! ( याच गणेशदुर्गाच्या तुरुंगातून खंदकात उड्या टाकून स्वातंत्र्यसंग्रामात वसंतदादा पाटील यांनी ऐतिहासिक पलायन केलं होतं.)

संरक्षणासाठी गणेशदुर्ग बांधल्यावर पूजेसाठी देऊळ हवंच. पटवर्धन मंडळी परम गणेशभक्त. म्हणून १८११ साली चिंतामणरावांनी सांगलीचं भूषण ठरणारं गणपती मंदिर बांधायला घेतलं. त्याचं काम तब्बल तीस वर्ष चालू होतं. सांगली गावाची भरभराट व्हावी म्हणून त्यांनी शास्त्री, पंडित, गवई, पैलवान, जनावरांची पारख कररारे, कारागीर अशी अनेक प्रकारची माणसं सांगलीत बोलावून त्यांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. त्यामुळेच सांगलीला मराठी नाटकांचे जन्मदाते विष्णुदास भावे गवसले. आबासाहेब गरवारे यांच्यासारखे धन्वंतरी लाभले आणि `कुमारी', मोताच्या घाटाची भांडी बनविणारे कुशल कारागीर मिळाले. तांब्या पितळेची भांडी बनविणार्‍या आणि सोन्या चांदीवर नाजूक कलाकुसर बनविणार्‍या सराफांच्या अनेक पिढ्या त्यामुळे सांगलीत निर्माण झाल्या.

सुशिक्षितांचं गाव म्हणून पुण्याच्या खालोखाल नाव घेतल्या जाणार्‍या सांगलीत १८६१ मध्ये सार्वजनिक शिक्षणाची सुरुवात झाली. पण अत्याधुनिक सांगलीचा खरा पाया घातला गेला तो १९०३ साली सांगली संस्थानच्या गादीवर आलेल्या प्रागतिक आणि उदारमतवादी दुसर्‍या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कारकिर्दीत. १९०५ ते १९१० या पाच वर्षात दुसरे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या काळात संस्थानचे प्रशासक कॅप्टन बर्क यांच्या कल्पकतेतून. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालयाची इमारत, तसेच नगरपालिका आणि सांगली हायस्कूलची सध्याची इमारत अशा इमारतींची बांधकामे झाली आणि सांगलीच्या वैभवात ऐतिहासिक भर पडली.

सांगलीच्या शेतीउद्योग व्यापार जगतात जी अनेक स्थित्यंतरे घडत त्यामुळे सांगलीचे नाव संपूर्ण देशात आणि काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकत असे. याचे रहस्य सांगलीच्या पोटातंच दडलंय. काळया, कसदार, सुपीक जमिनीवर येणारी ऊस, जोंधळा, तंबाखू, अलीकडील द्राक्षे आणि यापेक्षाही हळदीनं सांगलीचं सोनं केलंय. पारंपारिक पिके पिकविणार्‍या सांगलीच्या शेतकर्‍यांमध्ये द्राक्ष, ऊस अशा `क्रॅश-क्रॉप'मुळे प्रचड आर्थिक स्थित्यंतर घडून आले आहे. कृष्णाकाठची मळीतील वांगी, मक्याची कणसं, लुसलुशीत काकड्यांनी सांगलीला नाव मिळवून दिलं, पण पैसा नाही, चिरमुरा हा तर अगदीच किरकोळ आणि गोरगरिबांचा पदार्थ, पण एके काळच्या या नगण्य पदार्थाने, सांगलीच्या अनेक कुटुंबांना आज मोठाच मदतीचा हात दिला आहे. या पदार्थापासून बनणारा, नावावरून भणंग वाटणारा `भडंग' हा खाद्यपदार्थ अतिशय लोकप्रिय झाला आहे. या खुसखुशीत, कुरकुरीत भडंगाला लोकप्रिय बनविण्याचं आणि बाजारपेठ मिळवून देण्याचं श्रेय मे. गोरे बंधू यांच्याकडे जातं.

सांगलीच्या लोकजीवनात सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात या सांगलीच्या सुपुत्रांनी कशी स्थित्यंतरे घडविली हे त्यांच्या कर्तृत्वाला `न्याय' देऊन सांगायचं, म्हणजे मोठा विषय आहे. थोरले चिंतामणराव आणि दुसरे चिंतामणराव पटवर्धन या दोघानंतर सांगलीवर अधिराज्य केले ते वसंतदादा पाटील या तिसर्‍या भाग्यविधात्याने. सांगलीला `नाट्य-पंढरी' हा सार्थ लौकिक मिळवून दिला तो आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी. तीच परंपरा कीर्तीशिखरावर नेली नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या सांगलीच्या सुपुत्रांनी. राम गरेश गडकर्‍यांचे पट्टशिष्य श्री. न. ग. कमतनूरकर, नटवर्य मामा पेंडसे, मा. अविनाश, मामा भट, बंडोपंत सोहनी, रघुनाथ इनामदार, बाबुराव नाईक, जगन्नाथ पाटणकर, आठवले, यशवंतराव केळकर, प्रा. दिलीप परदेशी, मधुसूदन करमरकर, मधू आपटे, उदयराज गोडबोले अशा अनेकांनी नाट्यसृष्टीत अनेक स्थत्यंतरे घडविली.

सांगली `कीर्तनपंढरी' म्हणूनही ओळखली जाते, ती `आधुनिक एकनाथ' म्हणून गौरविल्या गेलेल्या कोटणीस महाराजांमुळे, तसेच मामासाहेब केळकरांमुळे. भावगीत गायनातील जेष्ठ गायक जे. एल. रानडे सांगलीचे तर गजाननराव वाटवे सांगलीशी अनेक वर्षे संबंधित होते. बाळकृष्णबुवा मोहिते यांची हार्मोनियम साथ सर्वश्रेष्ठ शास्त्रोक्त गायकांना आवर्जून हवी असे. त्यांनी बनविलेली २२ श्रुतींची पेटी अनेकांना स्तिमित करून गेली. सांगलीच्या बाळ कारंजकरांनी भावगीत क्षेत्रात नाव कमावल. आजमितीला मंगला जोशी, मंजिरी असनारे आणि मंजुषा कुलकर्णी या तीन संगीत गायिका शास्त्रीय संगीतात सांगलीचं नाव उज्वल करीत आहेत. थोर लेखक वि. स. खांडेकर सांगलीचेच. शीघ्रकवी साधुदास, कथाकार श्री. दा. पानवलकर, सरोजिनी कमतनूकर, श्री. के. क्षीरसागर यांनी साहित्यक्षेत्र गाजवले. प्रा. म द. हातकणंगलेकर, प्रा. तारा भवाळकर यांना सारा महाराष्ट्र ओळखतो. कवी गिरीश, कवी यशवंत सांगलीकर म्हणावेत इतके सांगलीशी संबंधित होते. कमल देसाई, अशोक जी. परांजपे, डॉ. वि. रा. करंदीकर, प्रा. मालतीबाई किर्लोस्कर अशी ही यादी लांबविता येईल. श्रीपादशास्त्री देवधर आणि पाटीलशास्त्री तसेच के. जी. दीक्षित यांनी जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती विजेत्यांची एकेकाळी गौरवशाली परंपराच सांगलीत निर्माण केली होती.

प्राच्यविद्या संशोधक डॉ. ग. वा. तगारे सांगलीकरच. सुप्रसिद्ध क्रिकेटपटु विजय हजारे, विजय भोसले, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर ही मंडळी मूळची सांगलीचीच. व्यंकप्पा बुरूड, हरी नाना पवार हे सांगलीचे नामवंत कुस्तीगीर. बुद्धिबळक्षेत्रात भालचंद्र म्हैसकर, खाडिलकर बंधू, भाऊसाहेब पडसलगीकर यांनी सांगलीचे नाव गाजवले. भाग्यश्री साठे ( ठिपसे), स्वाती घाटे या सांगलीच्याच. आबासाहेब सांबारे हे एक विलक्षण थोर धन्वंतरी सांगलीचेच. सांगलीच्या माणसांची ख्याती, जुन्या काळी उत्तम खवय्ये आणि उत्तम पोहणारे अशी होती. जिलेबीची अख्खी ताटेच्या ताटे बसल्या बैठकीला फस्त करणारे खवय्ये आणि कृष्णा नदीच्या महापुरात आयर्विन ब्रिजवरून उड्या मारून पोहत जाणारे अनेक वीर सांगलीत होते.

जुन्या काळात लोकांना आपल्या जातीची कणभरही जाणीव नसायची.ब्राह्मण, मराठा, जैन, लिंगायत, मुसलमान, सोनार वगैरे मंडळी गुण्यागोविंदाने राहत असत. सांगलीत जातीय तर सोडाच पण प्रचंड जीवघेण्या दंगली कधी माजल्या नाहीत.५०-६० वषांपूर्वी नाना देवधर नावाच्या हरहुन्नरी ब्राह्मणाने सांगलीत `सामिष' भोजनाचे हॉटेल काढले होते. ते नाना स्वत:ला `ब्राह्मणातला मुसलमान ' असे म्हणवून घेत. आणि राष्ट्रीय वृत्तीच्या सय्यद अमीन या सांगलीच्या लेखकाला `मुसलमानातला ब्राह्मण ' असं चिडवत असत. ( त्यानी शिवचरित्र तसेच भारतीय संस्कृतीवर पुस्तक लिहिले होते.)

१९१९ ला विलिंग्डन कॉलेज हे आर्टस् आणि सायन्स कॉलेज सुरू झाले. १९४७ मध्ये वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले आणि १९६० मध्ये चिंतामणराव कॉमर्स कॉलेज सुरू झाले. आज ती चिंचेची घनदाट बनं नाहीत. पेरूच्या बागा नाहीत. संकष्टीला `धुडडुम' आवाज करून सगळया गावाला चंद्रोदय झाल्याचं सांगणार्‍या तोफा नाहीत. पण आता सांगली नव्या `सांगली-मिरज-कुपवाड' महानगरपालिकेचा एक भाग बनलीय. या तीन पायांच्या शर्यतीत, सांगलीची स्वत:ची अशी जी एकजिनसी ओळख उभ्या महाराष्ट्रात बनली होती. तिला बाधा आल्याची भावना सांगलीकरांच्या मनात निर्माण होणार की काय, अशी भीती वाटत आहे.

Hits: 1029
X

Right Click

No right click