गदिमांचे आत्मचरित्र इंग्रजीत
ज्येष्ठ दिवंगत साहित्यिक, कथा-पटकथाकार गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या ‘वाटेवरल्या सावल्या’ या आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद ‘द श्ॉडोज ऑफ सोलेस ऑन द पाथ’(The shadows of solace on the path) या नावाने प्रकाशित करण्यात आला आहे. ‘गदिमां’च्या १०१व्या जयंती वर्षांनिमित्त ‘गदिमा साहित्य कला अकादमी’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
गदिमांनी सुमारे १५७ मराठी चित्रपटांसाठी गाणी,२५ हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, नातसून प्राजक्ता आणि घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी गदिमांच्या आत्मचरित्र इंग्रजीत आणण्याचा प्रकल्प पूर्णत्वास नेला. प्रा. विनया बापट यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे.
गदिमांच्या जन्म शताब्दीनिमित्त दोन वर्षांपूर्वी त्यांच्या निवडक १४ कथांचे प्रा. बापट यांनी इंग्रजीत भाषांतर केले होते. त्याला अन्य भाषकांचाही आणि मराठी कमी जाणणाऱ्या नव्या पिढीचाही उदंड प्रतिसाद लाभला होता. आता गदिमांच्या आत्मचरित्राच्या अनुवादामुळे त्यांच्या आयुष्यातील संघर्षांची आणि तत्कालीन समाजजीवनाची माहिती अमराठी वाचकांना मिळणार आहे.
इंग्रजीतील हे आत्मचरित्र गदिमांचे ज्येष्ठ पुत्र दिवंगत श्रीधर माडगूळकर यांना अर्पण करण्यात आले आहे. जन्मापासून ते ‘वंदे मातरम’ चित्रपट प्रसिद्ध होईपर्यंत गदिमांचा प्रवास या आत्मचरित्रात आहे.
हे अपूर्ण आत्मचरित्र जेथे संपते तेथूनच गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांचे आत्मचरित्र ‘आकाशाशी जडले नाते’ सुरू होते आणि ते गदिमांच्या मृत्यूपर्यंत सहजीवनाची कथा पूर्ण करते.
‘वंदे मातरम’ चित्रपटानंतर गदिमांना मिळालेले चित्रपटसृष्टीतील आणि साहित्यातील अभूतपूर्व यश त्यांच्या लेखणीतून उतरू शकले नाही. त्यांचे १९७७ साली अकाली निधन झाले.
व्यक्तिचित्रे गदिमांच्या शब्दांत..
‘वाटेवरल्या सावल्या’ या आत्मचरित्रात निवेदनाच्या ओघामध्ये गदिमांनी स्वत:च्या मातोश्री बनुताई, विनायक, आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, वि. स. खांडेकर, बाबूराव पेंटर, सुधीर फडके आदी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दांत आणि सहज शैलीत रेखाटली आहेत. त्या-त्या परिस्थितीतील स्वत:च्या मन:स्थितीचेही अचूक वर्णन त्यांनी केले आहे.
संदर्भ - दै. लोकसत्ता लोकसत्ता टीम | December 6, 2020 12:31
Hits: 257