जर्मन भाषा
Following article is small part of language information article. Pleae refer to https://vishwakosh.marathi.gov.in for font images, complete article and info about literature in this language.
जर्मन भाषा ही इंडो-यूरोपीय कुटुंबाच्या जर्मानिक शाखेची मध्य यूरोपातील एक महत्त्वाची भाषा असून ती मुख्यतः ऑस्ट्रिया, जर्मनी व त्याच्या आसपासचा काही भाग यांत बोलली जाते. तिच्या भाषिकांची संख्या दहा कोटींच्या आसपास असावी.
जर्मनचे ‘हाय जर्मन’व ‘लो जर्मन’ असे दोन गट आहेत. हाय जर्मनचा सर्वांत जुना पुरावा आठव्या शतकातील ग्रंथटीपांचा असून तिचे बव्हेरियन, आलेमानिक व फ्रान्सिस्क असे तीन भाग पडतात. मध्ययुगात तिला राजमान्यता मिळाली आणि पुढे मार्टिन ल्यूथरने तिचा प्रचारभाषा म्हणून स्वीकार केला. तिच्यात समृद्ध साहित्य निर्माण झाले. मध्ययुगानंतरच्या काळात अनेक पूर्व-यूरोपीय देश जर्मन वर्चस्वाखाली आले आणि अनेक ठिकाणी मोठ्या जर्मन वसाहतीही स्थापन झाल्या. लो जर्मनमध्ये डच व फ्लेमिश यांचा समावेश होतो. पण जर्मन भाषा हा प्रयोग मात्र फक्त हाय जर्मनपुरता मर्यादित आहे.
जर्मनचे लिखित रूप सर्वत्र एकच असले, तरी उच्चार व शब्दसंग्रह यांच्या दृष्टीने तिच्यात महत्त्वाची प्रादेशिक वैशिष्ट्ये आहेत. प्रमाण भाषेतही तिची मूलभूत प्रादेशिक वैशिष्ट्ये दिसतात. एवढेच नव्हे, तर प्रादेशिक साहित्याच्या समृद्धतेमुळे काही प्रमाण प्रादेशिक भाषाही आहेत. कित्येकदा असे प्रादेशिक भेद इतके तीव्र असतात, की दोन भिन्न बोलींच्या लोकांचे म्हणणे एकमेकांना नीट कळू शकत नाही. व्हिएन्नाच्या सुशिक्षित माणसाचे बोलणेही बर्लिनच्या विद्वानाला विचित्र व दुर्बोध वाटते.
हाय जर्मनची एक महत्त्वाची बोली यिद्दिश ही असून ती ज्यू लोकांकडून बोलली जाते. तिचे दोन प्रकार आहेत : बाल्टिकपासून काळ्या समुद्रापर्यंत पसरलेला पूर्वेकडील प्रकार व ॲल्सेस-लॉरेनच्या भागात बोलला जाणारा पश्चिमेकडील प्रकार. यिद्दिश बोली हिब्रू लिपीत लिहिली जाते. जवळजवळ दहा लाख यिद्दिश भाषिक न्यूयॉर्क शहरात स्थायिक झालेले आहेत.
इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच इ. भाषांप्रमाणे जर्मनचा बाह्य जगात फारसा प्रसार झाला नाही पण पूर्व यूरोपात बरीच शतके ती प्रतिष्ठापूर्ण भाषा समजली जात होती आणि बहुतेक सुशिक्षितांना ती उत्तम प्रकारे लिहितावाचता येत असे.
जर्मनची शब्दनिर्मिती बरीच आत्मनिष्ठ व दीर्घ समासांची असल्यामुळे यूरोपातील इतर सांस्कृतिक भाषांच्या शब्दसंग्रहात असणारे साम्य तिच्या बाबतीत आढळत नाही. दीर्घ समासांमुळे ती बोजड वाटते तसेच आद्य अवयव जोराने उच्चारणे या व इतर उच्चारवैशिष्ट्यांमूळे ती खडबडीत वाटते.
जर्मनची अक्षरे लॅटिनइतकी असली, तरी त्यांचे वळण गॉथिक आहे. अलीकडच्या काळात मात्र रोमन लिपी तिच्या जागी येत चालली आहे.
ध्वनिविचार: जर्मनची ध्वनिव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे :
स्वर: आ, इ, ए, इॅ, ऍ, उ, ओ, ऑ, अ.
व्यंजने: स्फोटक – क, ट (त), प, ग, ड (द), ब.
घर्षक – ख, फ, व, श, झ, स, झ, ह.
अर्धस्फोटक – च (त्स)
अनुनासिक – ङ, न, म.
कंपक – र
पार्श्चिक – ल
अर्धस्वर – य, व.
उच्चारवलेखनवैशिष्ट्ये: उच्चारातील आघात शब्दांच्या आद्य अवयवावर येतो. शब्दांच्या शेवटी येणारे व्यंजन (लेखनात सघोष दिसले तरी) अघोष असते.
स्वर आघातयुक्त असल्यास, त्यानंतर h आल्यास किंवा तो दोनदा लिहिला गेलेला असल्यास दीर्घ असतो. ä, ö, ü यांवरील टिंबे हे स्वर तालव्य आहेत असे दर्शवितात. त्यांचे उच्चार अनुक्रमेए, ऍ (ओठ गोलाकृती करून उच्चारलेला ए) व इॅ (ओठ गोलाकृती करुन उच्चारलेली इ) असे आहेत. ä u व eu चा उच्चार ऑय आणि ei चा उच्चार आय होतो. ie या अक्षरक्रमातील e अनुच्चारित असते. स्वरानंतर दोन व्यंजने किंवा व्यंजनयुग्म आल्यास तो ऱ्हस्व असतो. शब्दारंभी h चा उच्चार ‘ह’ असा असतो. इतरत्र तो शून्य असतो. f, ph, व v यांचा उच्चार ‘फ’ असा होतो. s नंतर p किंवा t ही व्यंजने आल्यास त्यांचा उच्चार ‘श’ असा होतो इतर व्यंजने आल्यास किंवा शब्दान्ती स्वरानंतर तो ‘स ’ असतो. Sch चा उच्चार ‘श’ होतो. Ch चा उच्चार ‘ख’ वा ‘श’. z चा उच्चार ‘च’, sz चा ‘स’. c नंतर e, i, y आल्यास ‘च’, इतरत्र ‘क’.
नामाचे आद्याक्षर कॅपिटल लिहिण्याचा संकेत आहे.
व्याकरण: व्याकरणात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, उपसर्ग, उभयान्वयी अव्यय व उद्गारवाचक यांचा विचार होतो. जर्मन भाषा अजूनही बरीच विकारक्षम आहे पण तिचा शब्दक्रम निश्चित असल्यामुळे तिची विकारक्षमता हे एक लोढणे झाले आहे.
नाम: नामात तीन लिंगे, दोन वचने व चार विभक्त्या आहेत. नामाचे अनेकवचन मूळ नामाला प्रत्यय लावून, त्यातील स्वराला विकार करुन किंवा या देन्ही साधनांचा उपयोग करुन होते : der Manndie Männer die Haut-die H ä ute das Auge- die Augen.
नामांची अनेकवचने व विभक्त्या यांच्या अनुरोधाने त्यांचे गट पाडलेले असून नामांचा बिनचूक उपयोग करण्यासाठी ते लक्षात ठेवणे आवश्यक असते. सर्व नामांना लागू पडणारा एकमेव नियम म्हणजे त्या सर्वांचे चतुर्थीचे अनेकवचन (e) n हा प्रत्यय लागून होते, हा होय.
निश्चित निर्गुण विशेषण पु. der, स्त्री. die, न. das असून अनिश्चित विशेषण पु. ein, स्त्री. eine, न. ein हे आहे. त्यांची आणि इतर विशेषणांची विभक्तिरूपे होतात.
सर्वनाम: मुख्य सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत : ich- wir-‘मी-आम्ही’ du-ihr- ‘तू-तुम्ही’ er, sie, es-sie –‘तो, ती, ते-ते, त्या, ती’ wer- ‘कोण जो….तो’ was-‘काय, जे….ते’.
सर्वनामांपासून स्वामित्वदर्शक विशेषणेही बनतात:ich-mein-‘मी-माझा, माझी-माझे’ du-dein- ‘तू-तुझा’इत्यादी er, -sein इत्यादी ‘तो-त्याचा’इत्यादी sie-ihr- ‘ती-तिचा’इत्यादी es-sein ‘ते-त्याचा’इत्यादी wir-unser ‘आम्ही-आमचा’इत्यादी ihr-euer- ‘तुम्ही-तुमचा’इत्यादी sie-ihr‘त्यांचा’इत्यादी.
विशेषण: विशेषण नामापूर्वी आल्यास त्याची रूपे विकारयुक्त होतात. अशा विशेषणापूर्वी निश्चित किंवा अनिश्चित निर्गुण विशेषण आल्यास किंवा दोहोंपैकी काहीही न आल्यास विशेषणाचे रूप काही ठिकाणी भिन्नपणे विकारयुक्त होते. उदा., guter, der, gute, ein guter.
क्रियापद: जर्मन क्रियापदाच्या शेवटी en किंवा क्वचित n येतो. उदा., Lieben ‘प्रेम कर-’ kaufen- ‘विकत घे –’ thun-‘कर’ sein-‘अस’.
haben, sein, werden ही कालवाचक साहाय्यक क्रियापदे आहेत, तर k Ö nnen, wollen, sollen, m Ü ssen, m Ö gen, d Ü rfen ही ‘शक्यता, कर्तव्य, आवश्यकता इ. भावदर्शक सहायक क्रियापदे आहेत.
क्रियापदांचे सौम्य व तीव्र असे दोन प्रकार आहेत. सौम्य क्रियापदांना भूतकाळात (e) te हा प्रत्यय लागतो. त्यांचे भूतकालवाचक धातुसाधित, धातूला ge हा उपसर्ग व -(e)t हा प्रत्यय लागून होते. तीव्र क्रियापदांचा भूतकाळ धातूतील स्वराला विकार करून होतो. भूतकालवाचक धातुसाधितातील स्वर धातूतील, भूतकाळातील किंवा या दोहोंतीलही स्वरापेक्षा भिन्न असतो व धातुसाधितापूर्वी ge- हा उपसर्ग येतो.
वर्तमानकालवाचक धातुसाधिताचा प्रत्यय end हा आहे.
पूर्णभूत haben ह्या कालवाचक साहाय्यक क्रियापदाचा वर्तमानकाळ व इष्ट धातूचे भूतकालवाचक धातुसाधित वापरून होतो. उदा., ich habe gesagt, ich habe gesprochen. अतिपूर्णभूत, haben चा भूतकाळ व इष्ट धातूचे भूतकालवाचक धातुसाधित वापरून होतो. उदा., ich hatte gesagt, ich hatte gesprochen. भविष्यकाळ werden ह्या कालवाचक सहायक क्रियापदाचा वर्तमानकाळ व इष्ट धातूचे मूळ क्रियापद वापरून होतो. उदा., ich werde sagen, ich werde sprechen. इतर साहाय्यक क्रियापदेही वर्तमानकाळात व इतर काळांत वापरली जातात व त्यानंतर क्रियापदांचे मूळ रूप येते.
क्रियाविशेषण: काही क्रियाविशेषणे स्वतःसिद्ध आहेत उदा., wo, oben hinten. जवळजवळ सर्व विशेषणांचा क्रियाविशेषणासारखा उपयोग करता येतो. कित्येकदा नामाला किंवा विशेषणाला weise हा प्रत्यय लावूनही क्रियाविशेषण साधता येते.
उपसर्ग: काही नामे, विशेषणे किंवा यांच्या बरोबर त्यांचे अर्थ निश्चित करणारे, अधिक स्पष्ट करणारे किंवा परंपरेने आवश्यक असे शब्द येतात. त्यांना उपसर्ग हे नाव आहे. काही उपसर्ग नामाच्या विशिष्ट विभक्तीबरोबर येतात. काहींची विभक्ती संदर्भानुसार नक्की होते. काही उपसर्ग क्रियापदांना जोडून येतात. त्यांतील काही अविभाज्य, म्हणजे नेहमी क्रियापदाला जोडलेले, तर काही विभाज्य, म्हणजे क्रियापदापासून वेगळे, काही कित्येकदा अविभाज्य, तर कित्येकदा विभाज्य असतात. उदा. अविभाज्य -ich besuche die schule- ‘मी शाळेत जातो’. विभाज्य – ich mache die Tur auf – ‘मी दरवाजा उघडतो’. be, emp, ent, er, ge, misz, ver, hinter, wider हे उपसर्ग अविभाज्य आणि durch, uber, un, unter, voll, wieder कधी विभाज्य तर कधी अविभाज्य असतात. बाकीचे विभाज्य आहेत.
वाक्यरचना : वाक्यातील शब्दांचा क्रम सामान्यपणे कर्ता + क्रियापद + अप्रत्यक्ष कर्म + प्रत्यक्ष कर्म असा आहे : Der Vater Schenkt Seinem Sohn ein Buch ‘बाप मुलाला एक पुस्तक भेट देतो’. पण धातुसाधित किंवा क्रियापदाचे मूळ रूप शेवटी येते : Der Vater hat seinem Sohn ein Buch geschenkt- ‘बापानेमुलाला एक पुस्तक भेट दिले’. Der Vater wird seinem Sohn ein Buch schenken ‘बाप मुलाला एक पुस्तक भेट देईल’.
प्रश्नार्थक वाक्यात क्रियापद कर्त्यापूर्वी येते. त्याचप्रमाणे वाक्याची सुरुवात विशेषण, क्रियाविशेषण, कर्म इत्यादींनी झाल्यासही ही रचना येते : ist der Knabe Krank ? -‘मुलगा आजारी आहे का?’ Angenehm ist der Fruling -‘वसंत ऋतू आल्हाददायक असतो’. Auf einem Baum sasz eine Taube -‘एका झाडावर कबूतर बसलेहोते’.
संदर्भ : 1. Cohen, Marcel Meillet, Antoine, Les Langues du monde, Paris, 1952.
2. Meillet, Antoine, Les Langues dans I’ Europe nouvelle, Paris, 1928.
3. Otto, Emil, German Conversation-Grammar, Heidelberg, 1930.
कालेलकर, ना. गो.
Hits: 172