चिनी भाषा
Following article is small part of language information article. Pleae refer to https://vishwakosh.marathi.gov.in for font images, complete article and info about literature in this language.
चिनीभाषा : चिनीभाषा ही ⇨सिनो-तिबेटी भाषासमूहाची एक शाखा आहे. या समूहाची दुसरी शाखा तिबेटो-ब्रह्मी ही आहे.
चिनी ही बहुतांश चीनची भाषा असून तिच्यात अनेक पोटभेद आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा भेद उत्तरेकडील अर्ध्या भागात असून त्याला ‘मँडरीन चिनी’ हे नाव आहे. त्यातही अनेक बोली आहेत. यांगत्से नदीच्या मुखाभोवती ‘वू’ बोली बोलल्या जातात आणि त्यांपैकी ‘सुचाउ’ ही विशेष प्रसिद्ध आहे. दक्षिणेकडे किनाऱ्याच्या बाजूला बोलींची फार विविधता आढळते. या सर्व बोलींना ‘कूक्येन’ हे समूहवाचक नाव असून प्रत्येक बोली तिच्या प्रदेशातील महत्त्वाच्या शहराच्या नावाने ओळखली जाते. मध्यवर्ती प्रदेशात ‘हाक्का’ ही बोली असून तिच्या दक्षिणेकडील बोली ‘कँटनीज’ या नावाने ओळखल्या जातात.
साधारणपणे देण्यात येणारे वर्णन उत्तरेकडील प्रमाण बोलीचे असते. चिनी बोली परस्परांपासून इतक्या भिन्न आहेत, की दक्षिणेकडची चिनी आणि उत्तरेकडची चिनी या वस्तुतः अगदी भिन्न भाषा आहेत आणि हेच विधान इतर अनेक बोलींनाही लागू आहे. पण चिनी भाषेतील शब्द एकावयवी व विकारशुन्य असल्यामुळे आणि चिनीलिपी ही अर्थचित्रणात्मक असल्यामुळे या लिपीतील मजकूर कोणत्याही भागातील चिनी मनुष्य स्वतःच्या उच्चारानुसार वाचू शकतो. घोड्याचे चित्र पाहून ज्याप्रमाणे मराठी माणूस ‘घोडा’, फ्रेंच माणूस ‘शव्हाल’, इंग्रज ‘हॉर्स’, जर्मन ‘प्फेर्ट’, रशियन ‘लोशाद्’ याप्रमाणे त्याचे ध्वनिसंकेतांत रूपांतर करेल, तसाच हा प्रकार आहे. त्यामुळे बोली वेगळ्या असूनही त्या सर्वांना हे एकच लेखन उपयोगी पडू शकते. ज्यांची भाषिक रचना चिनीप्रमाणेच आहे, अशा ॲनमाइटसारख्या बोलींनाही ही लिपी उपयुक्त ठरते आणि अशा प्रकारच्या बोली असणाऱ्या सर्व भाषिक समाजांतील व्यक्तींत तोंडी व्यवहार होणे अशक्य असले, तरी लेखी व्यवहार सहज होऊ शकतो.
ध्वनिविचार : चिनी भाषेची ध्वनिपद्धती पुढीलप्रमाणे आहे :
स्वर : मूलभूत स्वर अ, आ, इ, ए, उ, ऑ, व उॅ असे सात आहेत. उॅ हा स्वर ओठ गोलाकृती ठेऊन ‘इ’ या स्वराची उच्चारक्रिया केल्याने मिळतो.
याशिवाय आइ, आउ, इउ, एइ, उआ, उय, आउ, उॅआ हे स्वरसंयोग आहेत.
व्यंजने : स्फोटक : क, ख, त, थ, प, फ
अर्धस्फोटक : च, छ, च, ज, झ.
अनुनासिक : ङ, न, म.
पार्श्विक : ल
घर्षक : फ, श, स, स्स.
अर्धस्वर : य, व.
चिनी भाषा ही एकावयवी शब्दांनी बनलेली आहे. हा शब्द सामान्यतः व्यंजन + स्वर अशा स्वरूपाचा असतो. शब्दान्ती न् किंवा ङ् ही अनुनासिके मात्र कित्येकदा आढळतात. एकावयवी शब्दान्ती संख्या अर्थातच अत्यंत मर्यादित असणार, पण ही उणीव शब्दावरील आघातांनी भरून काढलेली आहे. हे आघात चार आहेत, म्हणजे एकंदर शब्दसंख्या ध्वनींच्या संयोगाने मिळणाऱ्या शब्दांच्या चौपट बनते.
हे आघात तीव्रतादर्शक नसून स्वरातील घोषत्त्वाशी संबंधित आहेत. घोषाचे वैशिष्ट्य स्वरनलिकांच्या कंपनाची गती हे असते. ती वाढविता येते, सावकाश किंवा एकदम खाली नेता येते किंवा आहे तशीच ठेवता येते. या गतीला ‘रोह’ हे नाव असून ती वाढविता येणारी असल्यास ‘आरोह’ सावकाश खाली जाणारी असल्यास ‘अवरोह’, एकदम खाली जाणारी असल्यास ‘अधोरोह’ आणि न बदलणारी असल्यास ‘समरोह’ या नावांनी ओळखली जाते. या चारही रोहांचा उपयोग चिनी भाषेत आढळतो. समरोह, आरोह, अवरोह व अधोरोह हे लिप्यंतरात शब्दापुढे १, २, ३, ४, हे आकडे लिहून दाखविता येतात. उदा. मा१ ‘बेडूक’, मा२ ‘सण’ (ज्यूट)’ मा३ ‘घोडा’, मा४ ‘कोलंबी’.
वस्तुतः रोहतत्त्व कमी अधिक प्रमाणात सर्वच भाषा वापरतात. मराठीत ‘तो आला’ हे विधान व ‘तो आला?’ हा प्रश्न यांच्यातील फरक रोहतत्त्वाचा वापर केल्यानेच स्पष्ट होतो. पण चिनी भाषेत प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट रोह असतो आणि रोहानेच एरवी ध्वनिदृष्ट्या पूर्ण साम्य असलेल्या शब्दांचा अर्थ निश्चित होतो. म्हणजेच स्वर किंवा व्यंजन यांच्याप्रमाणेच प्रत्येक शब्दाचा रोह हा त्याचा अविभाज्य घटक असतो.
शब्दांचे वर्गीकरण : वस्तुतः आपण ज्यांना व्याकरणदृष्ट्या वर्ग असे म्हणतो, ते भेद चिनी शब्दांत आढळत नाहीत. संबंधदर्शक शब्दाप्रमाणे वापरली जाणारी ती क्रियापदे आणि शब्दयोगी अव्ययाप्रमाणे वापरली जाणारी ती नामे, असा एक भेद मानण्याचा प्रघात आहे. आधुनिक व्याकरणकार यात दोन भेदांना मान्यता देतात.
प्राचीन चिनीप्रमाणे आधुनिक चिनीतही नाम व क्रियापद यांत कोणताही भेद नाही. कारण एकच शब्द कधी नामाचे, तर कधी क्रियापदाचे कार्य करतो. पण प्रत्येक शब्द स्वाभाविकपणे वस्तुदर्शक आणि क्रियादर्शकही असतो, असा याचा अर्थ नव्हे. आपल्याला केवळ नामासारखे वाटणारे प्राणिवाचक, वस्तुवाचक, शरीरावयववाचक शब्दही क्रियादर्शक वाटतील, अशा प्रकारे वापरता येतात आणि आपल्याला क्रियावाचक वाटणारे शब्दही वस्तुवाचक अर्थ व्यक्त करू शकतात. हे सर्व करताना आपल्यासमोर भाषांतरित रूपात आपल्या बोलीत असणारे त्या शब्दाचे ‘रूप’ असते. पण अशी रूप ही कल्पना चिनी भाषेत मुळातच नाही.
सर्व वस्तुवाचक शब्द क्रियावाचकासारखे वापरता येतील असे नाही. निउ ‘स्त्री’ हा केवळ वस्तुवाचक आहे, तर जेन् ‘पुरुष’ हा क्रियावाचकाप्रमाणे वापरता येतो. मा ‘घोडा’ हा केवळ वस्तुवाचक आढळतो. तर न्येओउ ‘बैल’ व लांग् ‘लांडगा’ हे उभयवाचक आहेत. त्यांचे अर्थ ‘बैलाप्रमाणे चालणे’ अथवा ‘मूर्खपणाने वागणे’ आणि ‘लांगड्याप्रमाणे वागणे’ किंवा ‘फसवणे’ असे होऊ शकतात.
गुणवाचक शब्द क्रियापदे असतात. पांढरा म्हणजे पांढरा हो-कर-चांगला म्हणजे चांगला-हो-इत्यादी.
हे सर्व शब्द कोणताही विकार न होता केवळ वाक्यरचनेच्या संदर्भात विशिष्ट कार्य (नाम, क्रियापद इ.) करीत असल्यामुळे, चिनी भाषेत व्याकरणदृष्ट्या शब्दांचे वर्गीकरण करणे अप्रस्तुत आहे, हे सिद्ध होते.
परंतु शब्दांचे परस्परसंबंध हा वर्गीकरणाचा प्रकार होऊ शकतो. हे संबंध निश्चयवाचक व दिग्दर्शक असे दोन प्रकारचे असून ते क्रमनिष्ठ आहेत. निश्चयवाचक निश्चित होणाऱ्या शब्दापूर्वी येतो, तर दिग्दर्शक नंतर येतो. हे दोनच प्रकार असण्याचे कारण हे की भाषा ही रेषात्मक असल्यामुळे एखादा शब्द कोणत्या तरी शब्दापूर्वी येईल वा नंतर येईल. एखादा शब्द क्रियापद किंवा नाम म्हणून कार्य करतो अशी जी आपली भावना होते ती आपल्या भाषेच्या व्याकरणाच्या प्रभावातून आपण सुटू शकत नसल्यामुळे होते. मात्र शब्दाची वस्तुवाचकता, गुणवाचकता, क्रियावाचकता इत्यादींसाठी नाम, विशेषण, क्रियापद इ. संज्ञा सोयीच्या असल्यामुळे, चिनी भाषेचे विकाररहित शब्द वापरण्याचे वैशिष्ट्य लक्षात ठेऊन त्यांचा उपयोग करणे योग्य ठरेल.
वरील कारणामुळेच लिंग, वचन, काळ, अर्थ इ. कल्पनाही या भाषेत येऊ शकत नाहीत. म्हणून व्याकरणाचे इतर काही नियम न देता नमुन्यादाखल काही शब्द व वाक्ये देणे योग्य होईल :
इ१ ‘एक’ – ति४ -इ१ ‘पहिला’
एर्ह४ ‘दोन’, ल्याङ, ‘दोन (जोडी)’ – ति४ -एर्ह४ ‘दुसरा’
सान१ ‘तीन’ -ति४-सान३ ‘तिसरा’
स्सु४ ‘चार’ – ति४ – स्सु४ ‘चौथा’
वु३ ‘पाच’- ति४– वु३ ‘पाचवा’
वो३ ‘मी’ : वो३ मेन२ ‘आम्ही’
नी३ ‘तू’ : नी३-मेन२ ‘तुम्ही’
था१ ‘तो – ती – ते’ : था१ – मेन२ ‘ते -त्या- ती’
वो३ – मेन२ – ति ‘आमचा’
नी३ – मेन२ ति- ‘तुमचा’
था१ – ति ‘त्याचा’
वो३ याओ४ माइ४ (मी इच्छा- अस- विक-) ‘मला विकायचं आहे’.
वो३ याओ४ माइ३ (मी इच्छा – अस – खरीद –) ‘मला विकत घ्यायचं आहे’.
वो३ पु१ याओ४ (मी न इच्छा – अस– ) ‘मला नको’.
था१ लाइ२ ल्याओ३ (तो ये – समाप्त) ‘तो आला’.
काओ४ – सु४ था (सांग – तो ) ‘त्याला सांग’.
था१ मेइ२ लाइ२ (तो न ये – ) ‘तो येणार नाही’.
नी३ – मेन२ मिङ- पाइ मो (तुम्ही समज – का) ‘तुम्हाला समजतं का?’
चुङ१ – कुओ२ ‘चीन’
हु्आ४ ‘बोलण’
नी३ हुइ४ शुओ१ चुङ१ – कुओ२ हुआ४ मो (तुम्ही शक्य बोल – चीन बोलणं का) ‘तुम्हाला चिनी भाषा बोलता येते का?’
संदर्भ : 1. Encyclopedie Francaise, Tome I, Paris, 1937.
2. Whymant, A. N. J. Colloquial Chinese, London, 1942.
कालेलकर, ना. गो.
चिनी लिपी : चिनी लिपी जगातील एकमेव प्रचलित चित्रलिपी आहे. जगातील सु. एकचतुर्थांश लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये आजही चित्रलिपी वापरात आहे. ही लिपी सु. चार हजार वर्षांइतकी प्राचीन आहे परंतु लेखनपद्धतीतील बाह्यतः दिसणाऱ्या फरकांव्यक्तिरिक्त तिच्यामध्ये कोणताही फरक आढळून येत नाही. ही लिपी कल्पनाचित्रांच्या अवस्थेतून निश्चित वर्णांच्या अवस्थेमध्ये आजही आलेली नाही.
चिनी लिपीच्या उत्पत्तीविषयी आज तरी कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. चीनमध्ये दोन हजार वर्षांपूर्वीच्या लिपीचे नमुने मात्र आजही अस्तित्वात आहेत. हाडाच्या तुकड्यांवर, कासवाच्या पाठींवर, पंचरसी धातूच्या भांड्यांवर, हत्यारांवर, खापरांवर ही प्राचीन चिनी अक्षरे आढळून येतात. हाडांवर, बांबूच्या तुकड्यांवर इ. नाशवंत वस्तूंवरही ही प्राचीन अक्षरे असल्यामुळे त्याबद्दल निश्चित स्वरूपाची विधाने करणे चुकीचे ठरेल. निरनिराळ्या कालखंडांतही चिनी लिपीचे स्वरूप थोडेफार बदलले आहे. स्थूलमानाने इ.स.पू. २००० ते इ.स. २०० पर्यंतच्या कालखंडातील चिनी लिपीचे स्वरूप सर्वसाधारणपणे सारखे होते. नंतर लेखन साहित्यात फरक झाल्यामुळे लिपीतही फरक झाला. बोरूने अक्षरे रंगविल्यामुळे अगर पंचरसी धातूच्या अणकुचीदार लेखणीने अक्षरे लिहिल्यामुळे हा फऱक पडलेला दिसून येतो. इ.स.पू. तिसऱ्या शतकानंतर चिनी अक्षरे कुंचल्याने काळ्या रंगात लिहिल्यामुळे चिनी लिपीत लक्षात येण्यासारखा फरक पडला आणि तिचे स्वरूप ईजिप्तमधील डेमॉटिक किंवा हिअरेटिक प्रकारच्या लिपिपद्धतीसारखे झाले.
चिनी चित्रवर्ण
चिनी चित्रवर्ण
चीनमध्ये इ. स.१०५ मध्ये कागदाचा शोध लागला व त्यानंतर चिनी लिपी सध्याच्या प्रचलित लिपीचे स्वरूप घेऊ लागली.
चिनी लिपी उभी, उजवीकडून डावीकडे लिहितात. ती सुरुवातीस संपूर्णपणे चित्रलिपी होती उदा., माणूस, सूर्य, चंद्र इत्यादी. प्राचीन काळच्या चिनी भाषेत प्रत्येक शब्द एकावयवी असे. नामांच्या विभक्तीमुळे किंवा क्रियापदांच्या काळामुळे त्यांत रूपांतर होत नसे. असे शब्द लिहिताना प्रत्येक शब्दाला एक खूण किंवा चित्र जोडण्यात आले. या चित्रांचा व उच्चारांचा कायमचा संबंध निर्माणही झाला. परंतु त्यास मर्यादा पडली. एकाच शब्दाच्या उच्चारणभेदांमुळे त्याच्या अर्थाभिव्यक्तीतही भिन्नता आली. ध्वनिचित्रणामुळेही लिपी अधिक क्लिष्ट झाली. कल्पनाचित्रे मात्र अर्थवाही असल्यामुळे, त्यांच्याबाबतीत काहीच प्रश्न उद्भवला नाही. उदा., स्त्री चिन्ह दोन वेळा काढल्यास त्याचा अर्थ भांडण असा होतो. ऐकणे ही शब्दखूण व दरवाजाची खूण म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. उच्चारचिन्हांमुळे वाचकास चित्राचा नेमका अर्थ लक्षात घेण्यास मदत झाली. या उच्चारणचिन्हांमुळे लिपीने वेगळा आकार घेतला. हा वेगळा आकार घेतलेल्या लिपीस ‘ह्सिंग शेंग’ म्हणत. ह्या लिपीमुळे अर्थाभिव्यक्ती सुलभ झाली, तरी अक्षरसंख्या मात्र फार वाढली. उच्चारणचिन्हांच्या वाढीबरोबरच ते कोशांत ग्रथित करण्यात आले.
सामान्यपणे प्रत्येक लिपीत प्रत्येक खुणेचे किंवा अक्षरांचे उच्चार कायमचे ठरलेले असतात प्रत्येक उच्चार कोणत्या अक्षराने वा खुणेने लिहावयाचा हेही ठरलेले असते. चिनी लिपीत मात्र उच्चाराचा आणि खुणेचा संबंध नाही. प्रत्येक शब्दाला सर्वसाधारणपणे एक व प्रसंगी दोन किंवा तीनही खुणा तीत आहेत. अर्थ आणि उच्चारासह या सर्व खुणा शिकाव्या लागतात. कालानुरूप या लिपीमध्ये अक्षरखुणा बदललेल्या दिसून येतात. इ.स.पू. दुसऱ्या शतकात सु. २,५०० खुणा, इ.स.पू. तिसऱ्या शतकात ३,५०० खुणा तर दहाव्या शतकात ४४,००० खुणा चिनी लिपीत असल्याचे दिसून येते. आज सुशिक्षित चिनी माणसास सु. सात-आठ हजार खुणा अवगत असतात. साधारणपणे दोन-तीन हजार खुणा माहित असल्या, म्हणजे दैनंदिन व्यवहारापुरते भागते.
चिनी लिपीबाबत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्यामधील खुणांचे किंवा चिन्हांचे कायम स्वरूप. दोन हजार वर्षांपूर्वी ज्या अर्थासाठी एखादी खूण वापरली जात होती, त्याच अर्थाने जवळ जवळ ती आजही वापरली जाते. तिच्या उच्चारात अनेक फेरफार झाले असले. तरी ती खूण आणि तिने अभिव्यक्त होणारा अर्थ हे आजही कायम आहेत. लेखानाची साधने बदलली, तरी ह्या खुणांचा मुळचा आकार ओळखणे आजही शक्य आहे.
चिनी वाक्य
चिनी वाक्य
बोलभाषा व चिनी लिपीचा तसा प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे आणि देशातील मूठभर लोकांनीच ही लिपी जतन करून ठेवल्यामुळे तिचे मूळ स्वरूप आजही टिकून राहिले आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतही बोलभाषा आणि लिहिण्याची भाषा ह्या वेगवेगळ्या लिहिल्या जात असत. सध्या चीनमध्ये बोलभाषाच लिहिली जात असल्यामुळे चिनी लिपीत बदल घडून आले आहेत. कित्येक जुने शब्द वापरातून नाहीसे झाले आहेत. त्यामुळे त्या खुणा आता प्रचलित नाहीत. बोलभाषेतील काही शब्दांना पूर्वी खुणा नव्हत्या. त्या नव्याने निर्माण करण्यात आल्या चिनी लिपी शिकण्यास फार कठीण असल्यामुळे साक्षरता प्रसारासाठी काही मुळाक्षरे निर्माण करण्याचे प्रयत्न चीनमध्ये झाले आणि आजही ते सुरू आहेत. काही अत्यंत किचकट खुणा सोप्या करण्याच्या प्रयत्नात यशही आले आहे. तथापि चिनी भाषा मुळाक्षरांच्या लिपीमध्ये लिहिण्यात बऱ्याच अडचणी अजूनही कायम आहेत. एक महत्त्वाची अडचण म्हणजे भाषेत एकाच उच्चाराचे असंख्य शब्द आहेत आणि ते वेगवेगळ्या खुणा वापरून लिहिले जातात. ते मुळाक्षर वापरून लिहिल्यास बऱ्याच वेळा अर्थ समजणे केवळ अशक्य होते. उदा. ‘शृ’ या शब्दाचे निदान शंभर तरी अर्थ होतात. ते सर्व वेगळ्या खुणांनी लिहितात.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, सध्या एकच लिपी सर्व चीनमध्ये प्रचलित आहे. कारण लिपीमध्ये अर्थ लिहिला जातो. उच्चार नाही. त्यामुळे चीनच्या वेगवेगळ्या भागांत जरी एकमेकांचे भाषण एकमेकांना समजणे अशक्य असले, तरी लिपीच्या खुणांचा अर्थ सगळीकडे तोच असल्यामुळे लिखाण एकमेकांना समजणे सहज शक्य आहे. ही पद्धत बदलून भाषेतील उच्चार लिहिल्यास, हा फायदा नष्ट होईल आणि भाषावादास प्रोत्साहन मिळेल. जो पर्यंत सर्व चीनमध्ये एकच भाषा बोलली जात नाही, तोपर्यंत चिनी लिपी मुळाक्षरयुक्त करणे कठीण आहे.
चिनी लिपी ही चित्रमय असल्यामुळे ती लिहिण्याची कला ही चित्रकलाही आहे. असे मानले जाते. सुसंस्कृत मनुष्याचे हस्ताक्षर हे सुंदर असलेच पाहिजे, असे तेथे समीकरण आहे. अजूनही चिनी नेते सुंदर हस्ताक्षर काढण्याचा सराव करतात.
एके काळी चीनच्या आसपासच्या सर्व चिनी देशांत चिनी लिपीचा वापर केला जात असे. हळूहळू जपान व कोरियांमध्ये त्यांची स्वतःची लिपी प्रचारात आल्यावर चिनी लिपीचा वापर कमी झाला तथापि अजूनही जपान व कोरियामध्ये व्यवहारातील चिनी शब्द चिनी लिपीमध्येच लिहिले जातात. त्यामुळे या भाषांमध्ये एक वाक्यात काही चिनी खुणा व उरलेले शब्द जपानी किंवा कोरियन लिपीत असे मिश्रण सर्रास आढळते [→जपानी लिपी] . व्हिएटनाममध्ये मात्र फ्रेंच सरकारने चिनी लिपीचे पूर्ण उच्चाटन केले आहे. आता ती भाषा लॅटिन अक्षरांत लिहिली जाते तथापि या सर्व देशांत आजही चिनी लिपी चांगली अवगत असणे, हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.
संदर्भ : 1. Diringer, David, The Alphabet, 2 Vols, London, 1968.
2. Edkins, J. Introduction to the Study of the Chinese Characters, London, 1876.
3. Simon, W. How to Study and Write Chinese Characters, London, 1944.
गोखले, शोभना ल.
Hits: 198