कन्नड भाषा

Parent Category: भाषांतर Category: इतर भारतीय भाषा Written by सौ. शुभांगी रानडे

Following article is small part of language information article. Pleae refer to https://vishwakosh.marathi.gov.in for font images, complete article and info about literature in this language.

मुख्यत्वे कर्नाटक राज्यात बोलली जाणारी कन्नड ही एक महत्त्वाची द्रविड भाषा आहे. तिच्या पूर्वेस तेलुगू, उत्तरेस मराठी, पश्चिमेस कोकणी, तुळू व मलयाळम्‌ आणि दक्षिणेस तमिळ या भाषा बोलल्या जातात. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे कन्नड भाषिकांची एकंदर संख्या १,७४,१५,८२७ होती. त्यांतील १,५३,६१,०५१ खुद्द कर्नाटक राज्यात असून बाकीचे भारताच्या इतर भागांत होते. संख्यानुक्रमाने त्यांची वाटणी पुढीलप्रमाणे : तमिळनाडू- ८,५३,२११, महाराष्ट्र- ६,२९,५८३, आंध्र प्रदेश- ३,८१,९०३, केरळ- ६२,०६८, गुजरात- ५,१९२, मध्य प्रदेश- ४,४५४,दिल्ली- १,९८२, उत्तर प्रदेश- १,५२७ इत्यादी. लोकसंख्येच्या क्रमाने पाहिल्यास कन्नड ही द्रविड भाषांत तेलुगू व तमिळ यांनंतर म्हणजे तिसरी आणि एकंदर भारतीय भाषांत हिंदी, तेलुगू, बंगाली, मराठी, तमिळ, उर्दू व गुजराती यांनंतर म्हणजे आठवी येते.

सर्वांत जुना लिखित पुरावा असलेली द्रविड भाषा कन्नड आहे. हा पुरावा ४५० च्या सुमाराचा असून त्यात संस्कृतच्या जोडीला प्रगल्भ अशी कन्नड वापरलेली दिसते. नवव्या शतकापासून तिच्यात साहित्यनिर्मिती होऊ लागली. तिचा पहिला ग्रंथ कविराजमार्ग हा साहित्यशास्त्रावरचा असून त्यात संस्कृत नावे असणाऱ्या पूर्वीच्या लेखकांचाही उल्लेख आढळतो. कन्नड नावाच्या व्युत्पत्तीबद्दल निश्चितपणे सांगता आले नाही, तरी ती ‘करि’ (काळा) व ‘नाडु’ (प्रदेश) यावरून संभवते. ‘कर्नाटक’ हे अर्थातच याचे संस्कृतीकरण असावे.  

द्राविडी भाषासमूहातील भाषांत आढळणारी महत्त्वाची वैशिष्ट्ये कन्नडलाही लागू पडतात : रूपविचार सर्वस्वी प्रत्ययांवर आधारलेला ध्वनींच्या स्पष्टतेमुळे शब्दांचे सर्व अर्थघटकही स्पष्ट दिसतात आणि त्यामुळेच व्याकरणाची नियमबद्धताही जाणवते. सूक्ष्म निरीक्षणानंतर जाणवते, की मुळात क्रियापद व नाम ही भिन्न नव्हती. वाक्यरचनेत सर्वनामांचा प्रत्ययसारखा उपयोग करण्याकडे नामांचा कल आहे.

कन्नड भाषेत समाविष्ट करता येतील अशा बत्तीस बोलींची नोंद १९६१ च्या जनगणनेत करण्यात आली आहे. त्यांतील सर्वांत महत्त्वाची बडगा ही असून तिच्या भाषिकांची संख्या ८५,४६३ आहे. कन्नड बोलींची नावे अशी : अडविचंची, बडगा, विजापुरी, गोलारी-कन्नड, हरण शिकारी, होलिया, कन्नड, कारंदी, कर्नाटक, कुरुंब, उरळी, आटविका, चट्टिभाषा-कन्नड, हालियान, कडुभाषा, कट्‍टुनाइकन, कोनावर, कुरुव-कन्नडम्‌, लिंगायती, मदारी-कन्नड, मंगलोरी, मोची, मोंतादेंचेट्टी, म्हैसूर, पल्लवकल, बुडुबुडिके, कोराचा, कोराम-कन्नड, नागरी-कन्नड, नाइकी-कुरुंब, सोळग-कन्नड आणि वाणी. 

ध्वनि विचार : कन्नडची ध्वनिरचना पुढीलप्रमाणे आहे : 

स्वर: इ, ई, अ‍ि२, उ, ऊ, ए, एः१, अ, ओ, ओः१, अँ, आ, आः१, आँ. 

व्यंजने: प, त, ट, च४, क, ब, द, ड, ज४, ग, फ३, स, ष, श, झ३, म, न, ण, व, ल, ळ, य, र. 

खुलासा – (१) विसर्गचिन्ह दीर्घत्व दाखवते. (२) अ‍िचा उच्चार अच्या वर व ईच्या मागे. (३) आणि हे घर्षक आहेत. (४) आणि संस्कृतप्रमाणे तालव्य आहेत. 

लिपी : इतर भारतीय लिपींप्रमाणे कन्नड लिपीदेखील ब्राह्मी लिपीपासूनच आलेली आहे. तिच्यात संस्कृतची सर्व अक्षरे आली असून कन्नड ध्वनिव्यवस्थेच्या आवश्यकतेनुसार ऱ्हस्व ए आणि ओ यांना पाहिजे असलेली ध्वनिचिन्हेही आली आहेत मात्र मराठीप्रमाणे इंग्रजीतून उसने घेतलेले अँ आणि आँ या उच्चारांना स्वतंत्र चिन्हे नाहीत. 

कन्नड लिपी व तेलुगू लिपी यांत फारसा फरक नाही. त्यामुळे त्या दोन एक कराव्यात अशी सूचनाही काही लोकांनी केली आहे.

व्याकरण : पुढील विवेचनात कन्नडची काही वैशिष्ट्येच दिली आहेत : 

रूप विचार : (१) नाम : नामात तीन लिंगे व दोन वचने आहेत. लिंगव्यवस्था मराठीपेक्षा तर्कशुद्ध आहे. सामान्यतः पुल्लिंग पुरुषव्यक्तिवाचक, स्त्रीलिंग स्त्रीव्यक्तिवाचक व नपुंसकलिंग इतरवाचक असते. अनेकवचन प्रत्यय लावून होते. काही नामांना व सर्वनामांना प्रत्यय लागून किंवा त्यांच्या मूळ स्वरूपात विकार होऊन त्यांचे सामान्यरूप तयार होते. ही रूपे पुढील नामांशी संबंध दाखविणारी असतात. 

अनेकवचनाचेप्रत्यय : अन्दरु (पुरुष व स्त्रीवाचक नात्याची संज्ञा), अरु(इत रस्त्रीपुरुषवाचक नामे) हेआहेत.नपुंसकलिंगाला – गळू हा प्रत्यय लागतोपण तो वैकल्पिक आहे : 

उदा.,  अण्ण ‘मोठा भाऊ’ – अण्णन्दरु 

          अक्क ‘मोठी बहीण’ – अक्कन्दरु 

          हुडुग ‘मुलगा’ – हुडुगरु 

          सोसे ‘सून’ – सोसेःरु 

मरद् कोम्बे ‘झाडाची फांदी, झाडाच्या फांद्या, झाडांच्या फांद्या’, इ. (अनेकवचन मर्द कोम्बेगळु, मरगळु कोम्बेळु किंवा मरगळ कोम्बेगळु असेही  होऊ शकते).

वर्तमानकाळाचे नकारार्थी रूप धातूला अदु हा प्रत्यय व शेवटी इल्लं हे नकारार्थी जोडून होते. होःगु त्याचे होगु + अदु= होगुवदुव, होगुवदु + इल्ल = होगुवदिल्ल ‘जात नाही ’ हेरूप बनते. ते सर्व पुरुषांत, लिंगांत व वचनांत तसेच राहते.  

भविष्यकाळाची रूपे स्वतंत्र असली, तरी पुष्कळदा त्यांबद्दल वर्तमान काळाचीच रूपे वारण्यात येतात. सकर्मक  भूतकाळात कर्मणिप्रयोग नाही. 

वाक्यविचार : वाक्यरचना बऱ्याच अंशी मराठीप्रमाणे आहे एवढेच नव्हे, तर मराठीत आढळणारी संयुक्त क्रियापदांसारखी काही वैशिष्ट्ये  कन्नडमध्येही असल्यामुळे, हा परस्पर संपर्काचा प्रभाव असावा किंवा मराठी  भाषिक लोक मुळात द्रविड भाषिक असावेत असे वाटते. वाक्यरचनेची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे: 

       नम्म अण्णुनु मनुयोळगे इद्दाने ‘आमचा (मोठा) भाऊ घरात आहे ’. 

       पोस्टआफिसिगे होःगि कार्डु मत्तु कवरु कोंडुवा ‘पोस्टात जाऊन कार्ड पाकिटं घेऊन ये ’. 

       निम्म हेसरु एःनु ‘तुमचं नाव काय ? ’ 

       पेटेःयिंद अक्कियन्नु तंदेनु ‘बाजारातून तांदूळ आणले ’.

       अवने पेःटेयिंद पल्लेः तरुवनु ‘तो बाजारातून भाजी आणेल ’.

       ननगे ऊट मात्र चन्नगिर बेःकु ‘मला खाणंपिण चमचमीत पाहिजे ’.

      ओब्ब राज इद्द ‘एक होता राजा ’.

       अवनिगे इब्बरु राणीयरिद्दरु ‘त्याला दोन राण्या होत्या ’.


शब्दसंग्रह : कन्नड भाषा द्राविडी समूहातील असल्यामुळे तिचा शब्दसंग्रह प्रामुख्याने द्रविड आहे. तथापि संस्कृतची परंपराही तितकीच जुनी आणि दृढ असल्याने अनेक संस्कृत शब्द तिने आत्मसात केलेले आहेत. याबरोबरच मराठी व कन्नड यांच्या दृढ व दीर्घ संबंधामुळे त्यांचा एकमेकींवर अतिशय प्रभाव पडलेला आहे. ज्यांचे मूळ संस्कृतात सापडत नाही अशा अनेक मराठी शब्दांचा प्रश्न द्रविड भाषांचा, विशेषतः कन्नड व तेलुगूचा परिचय होताच सुटतो. रेव्ह. एफ्‌. किटेल यांनी आपल्या कन्नड-इंग्रजी शब्दकोशात संस्कृतमधील द्रविड शब्दांबद्दल दिलेली माहिती या दृष्टीने उद्‌बोधक आहे.

संदर्भ : 1. Bloch, Jules, Structure grammaticale des langues dravidiennes, Paris, 1946.

2. Bright, W. An Outline of Colloquial Kannad, Poona, 1958,

3. Kittel, F. A Kannad-English Dictionary, Mangalore, 1894.

4. Narasimhia, A. N. A Grammar of the Oldest Kanarese Inscriptions, Mysore, 1941.

 ५.जोशी, शं.वि.कन्नड-प्रबोध, धारवाड, १९५४.

कालेलकर, ना. गो. 

X

Right Click

No right click

X

Right Click

No right click

Hits: 167
X

Right Click

No right click