ड्रायव्हर

Parent Category: मराठी साहित्य Category: बालकविता Written by सौ. शुभांगी रानडे

एकदा काय झाले सांगते
बसा सारे खालती
उंदीरमामा सापडला
मांजरोबाच्या हाती ---- १

मामाने मग केला
गणपतीचा धावा
`वाहन मी होईन तुमचे
मला आता पावा ---- २

नाही म्हणू नका तुम्ही
गणपतीराया
तुमच्याच चरणी
वाहीन ही काया' ---- ३

मांजरोबा पण मनी म्हणे
`देवाधिदेवा,
उंदराचा हा नैवेद्य
गोड करुन घ्यावा` ---- ४

खोटे खोटे डोळे मिटून
मांजर बसले ध्यानाला
मामांनी मग तेवढ्यात
सूंबाल्या केला ---- ५

फळ मिळे उंदराला
गणपतीच्या भक्तीने
तावडीतून मांजराच्या
सुटका केली युक्तीने ---- ६

तेव्हापासून गणपतीची
स्वारी खूष झाली
`ड्रायव्हर' म्हणून उंदराची
नेमणूक केली ---- ७

Hits: 614
X

Right Click

No right click