पॅथी म्हणजे औषध नव्हे

Parent Category: मराठी साहित्य Category: लेख Written by सौ. शुभांगी रानडे

लोकमताची लाट पुन: आयुर्वेदाकडे वळू लागली आहे असे वाटते. कारण कोठलेही वृत्तपत्र, दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक एवढेच नव्हें तर इंग्रजी वृत्तपत्र पाहिले तर त्यात एखाद्या वनस्पतीचे गुणधर्म, एखाद्या विकारावरील आयुर्वेदीय उपचार, प्रश्नोत्तर सदरांत निरनिराळ्या तक्रारीवर आयुर्वेदीय औषधे, अनुभविक आजीबाईच्या बटव्यातील औषधे वगैरे प्रसिध्द झालेली आढळतील. तसेच कोठे आयुर्वेदीय कॉलेज, कोठे संशोधन विभाग, कोठे वैद्याला पद्मश्री पदवी वगैरे सरकारी पातळीवरील हालचालीहि ऐकण्या, वाचण्यास मिळतात. यावरुन आयुर्वेदाबद्दल सार्वजनिक औत्सुक्य जागृत झालेले स्पष्ट दिसते. थोडीशी संक्रमणावस्था आहे. त्यामुळे वनस्पतीपासून बनवलेली औषधे आरष्टे आसवे, भस्मे वगैरे देणारे सर्वचजण आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून लोकांसमोर येऊ लागले आहेत. अशा वेळी लोकांच्या मनात सध्या औत्सुक्य विषय झालेल्या पूर्वी समृध्द प्रचलित असलेल्या आयुर्वेदाबद्दल योग्य ती प्रतिमा उभी करण्याची नैतीक जबाबदारी ही औषधे देणाऱ्यांच्यावर आहे. न पेक्षा आयुर्वेदाबद्दलची विकृत, न्यूनगंडात्मक असामर्थ्याची कल्पना दृढमूल होण्याची शक्यता आहे.

आयुर्वेदाचा विचार करताना सर्व प्रथम त्याचे इतर पॅथीपासून वेगळेपण पाहिले पाहिजे. कारण औषधीद्रव्याचे वेगळेपण म्हणजे आयुर्वेदीय चिकित्सा पध्दती नव्हे. कारण इतर पॅथितही अशोक, धोत्रा, बचनाग, अडुळसा, सुंठें, सर्पगंधा, जेष्टमध वगैरे शेकडो वनस्पती तसेच गंधक, सोनल पाऱ्यासारखी खनिजही वापरली जातात. तेव्हा ही औषधे वापरली असता कोणती पॅथी वापरली असे समजायचे ? प्रवाळ शंख याची भस्में ही कॅंल्सियम कार्बोनेट असतात. तेव्हा सिंथेटिक कॅल्सियम कार्बोनेट ऐवजी प्रवाळभस्म वापरले तर ऑर्गनिक कॅल्सियम कार्बोनेट वापरला असे फारतर म्हणता येईल. पॅथीचा निर्णय होत नाही यावरुन औषधी द्र्व्यावर पॅंथी अवलंबून नाही हे स्पष्ट व्हावे.

यासाठी निरोगी (प्रकृती) व रोगी (विकृती) शरीराकडे पाहण्याची आयुर्वेदाची दृष्टी पाहिली पाहिजे आयुर्वेदाचे मत खाल्लेले अन्न शरीरातील पचनानंतर द्रवावस्थेत येते यालाच रस असे म्हटले आहे. हा सर्व शरीरभर परिभ्रमण करीत असतो. याच्यावरही त्याचे ठाई असलेल्या अग्नीमुळे संस्कार होऊन त्याचे रुपांतर रक्तांत होते. रक्ताचे ठिकाणी असलेल्या अग्नीमुळे मासांत परिवर्तन होते. जशी परिणाम परंपरा मेद (फॅट), अस्थीमज्जा (बोनमॅरो), शुक्र (प्रजोत्पादक धातू) व ओज (तेज) पर्यंत आहे याना धातू असे म्हटले आहे. उसाच्या रसाचे पचन होऊन गूळ बनताना जशी मळी निघते तसे या प्रत्येक धातूचे पुढील धातूत परिवर्तन होताना मल द्र्व्ये बाहेर टाकली जातात. धाम हे मेदाचे मलद्रव्ये आहे, मलमूत्र ही मुख्य त्याज द्रव्ये आहेत. अन्न घेणें त्याचे शरीर घटकांत परिवर्तन करणें व मलद्रव्ये बाहेर टाकणें हे व्यवस्थित चालू असेल म्हणजे शरीर निरोगी राहते.

या धातूपैकी एखादा धातू जेव्हा वाढतो तेव्हा त्याचा अग्निमंद झालेला असतो. उदा. बैठा उद्योग करणाऱ्याचे पोट सुटते. मेद वाढतो. कारण मेदावर्धक आहार (तूप, गहू, वगैरे) जास्त खाल्ला जातो, व्यायाम होत नाही. मेदातील अग्नी मंद झाल्याने अस्थी मज्जा वगैरे पुढील धातूना पोषण मिळत नाही. व तो मनुष्य निरुत्साही व अशक्त असतो. म्हणजे समतोल आहार करणाऱ्याचे शरीर समतोल राहणार.

समतोल आहाराचा विचार करताना आहार द्रव्यांचे सहा रसांत या ठिकाणी रस म्हणजे चव वर्गीकरण केले आहे ती अशी. गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तूरट एक स्थूल नियम सांगितला आहे.

नित्य सर्व रसाभ्यास
रोज या सहाहि चवीनी युक्त असा आहार करावा कारण प्रत्येक रसाच्या (चवीच्या) द्रव्याचे शरीरावर काय परिणाम होतात हे सांगितले आहे ते थोडक्यात असे.
१) मधूर - सर्वांना आवडणारा शक्तीवर्धक वरील सातहि धातूना पोषक, थंड सर्व इंद्रियांची तृप्ती करणारा घशाला चांगले, दुध, तूप, मांस, रस, गहू साखर वगैरेवरुन ढोबळ कल्पना येईल.
२) आंबट - चव वाढवणारा, भूक वाढवणारा, मनाला आल्हाद उत्पन्न करणारा, अन्न पचवणारा, पित्त वाढवणारा उदा. लिंबू, दही, ताक, चिंच.
३) खारट - चव जाणणारा, अन्न पचवणारा, मलाचा खडा फोडणारा, शौचाला साफ करणारा, पोट फुगी नाहीशी करणारा, अग्नी प्रदीप्त करणारा, उदा. मीठ, सोडा, मॅंग्सल्फ पादेलोण.
४) तिखट - भूक वाढवणारा, अन्न पचवणारा, पित्त वाढवणारा सुंठ, मिरे, मिरची वगैरे.
५) कडू- नावडता परंतु डातोंचा कडूपणा घालवणारा, स्राव कमी करणारा, ज्वरघ्न पित्तनाशक, कृमिनाशक, त्वचारोगनाशक, रक्तदोषनाशक असतो. उदा. कडूनिंब, हळद, काडेचिराईत वगैरे.
६) तुरट- व्रण जखमा बऱ्या करणारा, रक्तस्राव बंद करणारा उदा. कात. जीभ जड करणारा. उदा. कच्चे कवठ.
वरील सहा चवीच्या पदार्थाचा रोज आहार असावा म्हणजे एकाच चवीचा पदार्थ अती खाण्याने होणारे रोग टळतात. उदा. गोडाने स्थूलपणा मधुमेह, आंबटाने पित्त वाढणे, खारट पदार्थाने केस पिकणे, गळणे वगैरे. या नियमामुळेच सांबारे करण्याची पद्धत शास्त्रोक्त वाटते. कारण त्यात गोड गुळ, आंबट चिंच अमसूल, खारट मिठ तिखट मिरची व कडू मेथी, हळद, मोहरी. तुरट- तूर असे सर्व रस आहेत. हा ढोबळ मानाने निरोगी शरीराकडे पाहण्याचा आयुर्वेदाचा दृष्टीकोन.

रोगी शरीराकडे पाहताना वरील दृष्टीकोन हा प्रकृती निदर्शक असलेने विकृती त्या सापेक्ष पाहता येते. आहार द्रव्यातून शरीराची उभारणी (कॉन्स्ट्रक्शन) होते. मातीतील दोषान तयार होणाऱ्या भांड्यात दोष रहावा तव्दत सदोष आहाराने शरीरात दोष व्याधी उत्पन्न होणे अपरिहार्य आहे. कायम आंबट, तेलकट तिखट खाणाऱ्या जागरण, धुम्रपान करणाऱ्या माणसाचे पित्त वाढते हे आपणास अनुभवासहि येते. अशावेळी वरील सर्व कारणे बंद करणे हे तर्कदृष्ट्या (लॉजिकली) सुसंगत आहे. त्यामुळे पथ्य हे अपरिहार्य आहे. तसेच वाढलेले पित्त क्षार द्रव्यानी जरी निरुपद्रवी (न्यूट्रल) झाले तरी (क्षारामृयोस्तु संयोग: मधुरीभवती क्षणात) पुन: येणारा पित्ताचा स्राव बंद होऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर तो वाढत जातो. (रिवाउंड फिनॉमिना) व अल्कलोसिस होण्याचाही धोका असतो. अशा वेळी आयुर्वेदीय चिकित्सेतील वेगळेपण दिसून येते ते असे. प्रथम ज्या कारणानी पित्त वाढते ती कारणे आहारविहार बंद करणे, तसेच अ‍ॅसिड स्थूलता पित्त हे जरी अग्नीप्रमाणे आहाराचे पचन करते तरी देखील ते जास्त झाल्यास अग्नीप्रमाणेच अन्न करपवते, जळजळ करपट ढेकरा उत्पन्न करते. म्हणून ते जादा (खरे तर अगाऊ) पित्त शरीराबाहेर काढून टाकणे (Elimination of Caurative Factor) युकत ठरते.
(तव्दव्दिरेचन पित्ते) असे विरेचन देणे. अजूनही काही वयस्क माणसे पित्ताने चक्कर, जळजळ होऊ लागल्यास सूतशेखर हे (शामक Poliative) औषध घेतात. त्यानी नाही बरे वाटले तर एरंडेल किंवा एखादे मारक औषध घेण्यात त्यांना बरे वाटते. झऱ्यातील गढूळ पाणी तुरटी फिरविल्याने निवळते परंतु फारच गढूळ पाणी असेल तर थोडे पाणी उपसून टाकणे हाच उपाय केला जातो. नंतरच्या थोड्या गढूळ पाण्यासाठी तुरटी फिरविण्यास हरकत नाही. नाहीतर गढूळपणा न जाता पाणी मात्र तुरट व्हायचे. थोडे राहिलेले पित्त प्रवाळभस्म किंवा Calcam Corbonate किंवा इतर कुठल्याहि औषधाने शमन करायला हरकत नाही. अर्थात आयुर्वेदीय औषध निवडताना कडू, तुरट व गोड या चवीच्या वनस्पतींचे काढे किंवा चूर्णे किंवा या औषधींचा संस्कार केलेले तूप दिले जाते. कारण कडू व तुरट रसानी स्राव कमी होतो ! त्यामुळे पित्तस्रावावर नियंत्रण येते. एवढे झाल्यावर रसायन विधी हे रसायन म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवणे किंवा रस, रक्त वगैरे धातू पुष्ट करणे. यात वर्धमान पिंपळीचा काढा वगैरे उपाय आहेत. पिंपळी ही सीरम ग्लोब्युलीन ( जे इम्युनिटी वाढवते ) असे ठरले आहे. हे रोगाच्या अष्टणर्भयासाठी आहे. म्हणजे याचा अर्थ इतर निरोगी माणसे जितपत अपथ्य तेलकट, तिखट सोसू शकतात तितपत या माजी रोगी माणसाने सोसले पाहीजे. त्यामुळे आयुर्वेदाने मूळापासून रोग जातो. पुन: होत नाही. हा जनमानसात विश्वास आहे.

आणखी एक रोगाचे कारण सूक्ष्मजंतू ! आयुर्वेदाचे काळी सुक्ष्मदर्शकाचे अभावी हे माहीत असेल असे वाटत नाही अपवाद एकच- बट् ते कुष्ठैक कर्माण: सौक्ष्म्यात केचिददर्शना: (हे सहाकृमी कुष्ठ उत्पन्न करताना सुक्ष्म असलेने काही दिसत नाहीत.) तथापि अमुक आजारात अमुक जंतु हा शोध जेव्हापासून लागला तेव्हापासून चिकित्सा शास्त्रात मोठी क्रांती झाली ती अशी की, कोठल्याही आजाराचें स्वतंत्र जंतू शोधून काढणे. व त्या जंतूंना मारक असे औषध शोधून काढणे. जंतू मारले गेल्याने आजारात झपाट्याने फरक पडू लागला. त्यातून पेनिसिलीनसारखे सर्व जंतूनाशक औषधे शोधले गेल्यानंतर अमृतानुभव झाल्याप्रमाणे वाटल्यास नवल नाही पर्ंतु सजीव जंतूंचा नाश करणारे द्रव्य हे विषारी असते व पर्यायाने शरीरातील सजिव पेशींना व शरीरपोषक जंतुंनाही ते मारक ठरते स्वाभाविक आहे. डी डी. टी. ने डांस पुर्वीप्रमाणे मरत नाहीत. तसे पुढे सुरुवातीच्या जंतुनाशकांचा ते ते जंतू दाद देईनात. त्यातून नवनवीन अधिक प्रभावी जंतुनाशके निघत आहेतच. औषधाने जरी अमीबा नष्ट झाले तरी पुन: अन्नपाण्यावाटे त्याचे शरीरावर आक्रमण होणारच व पुर्वीचे औषधास ते पुर्वीप्रमाणे दाद देणार नाहीत. हे दुष्ट वर्तूळ ( व्हिशससर्कल) तोडण्यासाठी आयुष्यातील थोडा भाग उपयोगी पडतो. जंतू हेच केवळ रोगाचे कारण नसून डासाना दलदल जशी पोषक तसे त्या त्या जंतूना जी पोषक अशी शरीरावस्था पॅथॉलाजी (?) सुधारणे हे महत्त्वाचे आहे कारण तेच जंतुयुक्त अन्नपाणी इतरांच्याहि शरीरात त्यांची दाद लागत नाही. तेथील वातावरण (Media) प्रतिकुल असते. बी दगडावर टाकून किंवा जमिनीतही बिन पाण्याने उगवत नाही. तसे रोग जंतूचे झाले पाहिजे. आयुर्वेद अशावेळी आजार वाढवणारा न सोसणारा (म्हणजेच अपथ्य) आहार विहार बंद करणे म्हणजेच पथ्य करणे वरील व्याधीतच ताकासारखे पचन संस्थेला विश्रांती देणारे द्रव पदार्थ धान्य पंचकासारखा अग्नी प्रदीप्त करणारा, द्रव शोषक काढा, सुवर्णपर्पटीसारखे रसायन सुचवितो. याने आतड्यातील अन्तत्वचा (इंटेस्टाइनल फ्लोरो) सुधारते. नंतर जरी किरकोळ अपथ्य केले तरी तो जंतू बळावू शकत नाही.

शत्रूने आक्रमण केल्यावर त्याचा नि:पात करणे हे जसे महत्वाचे तसेच आपली सीमा संरक्षण सज्ज ठेवणे हेहि महत्वाचे आहे. सीमा मजबूत असल्यावर शत्रूचे आक्रमण करण्याची काय बिशाद ! त्यातून आक्रमक केलेच तर फारसे चालत नाही.

Hits: 178
X

Right Click

No right click