जळु

Parent Category: मराठी साहित्य Category: लेख Written by सौ. शुभांगी रानडे

सांगली नगरपरिषदेच्या आयुर्वेदीय दवाखान्याची वेटिंगरुम, रुग्णांची गर्दी मी आत रोगी तपासत होतो! ती गर्दी बाजूला ढकलून एका पोराचा रडून केलेला आकांत आत घुसला! रुग्ण तपासणी थांबवून शिपायाकडून त्या रडणाऱ्या मुलाला आत बोलावले! मांडीच्या मागे कापलेले अर्ध्या लिंबाएवढे करट, भोवती लाल सूज, अंग तापलेले. ७-८ वर्षाचे पोर. भूल देऊन ऑपरेशन करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला. बाई गरीब! शिवाय भूलीची भीती! अशुद्ध रक्त काढल्यास ताबडतोब वेदना कमी होतात. जळवा! जळू लावून रक्त काढायचे! सुदैवाने त्यावेळी दवाखान्यात जळवा होत्या. आईला कल्पना दिली! ऑपरेशन टळते म्हटल्यावर बाई तयार झाली.

आश्चर्य म्हणजे...!
त्या करटावर गोगलगाईप्रमाणे पण हिरव्या दिसणाऱ्या दोन जळवा ठेवल्या १-२ सेकंद तोंडाने चाचपल्याप्रमाणे करुन त्या जळवा चिकटल्या. मुलगा रडत होताच. जळवा रक्त शोषू लागल्या. त्याला पुस्तकांत स्तनपानाची उपमा दिली आहे! करटाच्या ठणकेत जळवांचा चावा मुलाला कळलाही नसावा. आईला पाय धरणेस सांगून मी इतर रोगी तपासू लागलो. १०-१५ मिनिटे झाली असतील मुलाचे रडणे ऐकू येइना. म्हणून मी बाहेर येऊन पाहतो तो आश्चर्य म्हणजे बारीक बॉलपेन एवढ्या जळवा रक्त पिऊन मार्कर पेन एवढ्या जाड झालेल्या आणि करटाच्या ठणक्याने १-२ रात्री न झोपलेले ते पोरं ठणका थांबल्याने गाढ झोपले होते. तिकडे त्या जळवा रक्त शोषितच होत्या.
आश्चर्यकारक असली तरी वस्तुस्थिती होती. शक्यतो सर्व रुग्णांच्या समोरच मी जळवा लावतो. त्यामुळे पाहणाऱ्यांची भीती मोडते. उपायाचा प्रसार होतो, सोपेपणा व परिणाम समोर दिसतो.

दोन प्रकारच्या जळवा
जळवा! प्रथम अशुद्ध रक्त शोषून घेतात. कोकणात कानेट म्हणतात. त्यावरुन कानेटकर आडनाव पडले असावे कारण धुळे, जळगावकडे जळूकर आडनाव आहे. ज्याच्या करामध्य (हातामध्ये) जळु-कानेट- आहे तो कानेटकर-जळूकर- धन्वंतरी! हिंदीत ज्योकं, इंग्रजीत Leech, संस्कृतमध्ये जलौका म्हणतात. Biology मध्ये Hirudo Medicinalis, म्हणतात. जळवामध्ये आयुर्वेदशास्त्राप्रमाणे दोन प्रकार आहेत. एक निर्विष, दुसरी सविष (Venomu), निर्विष ही स्वच्छ पाण्यात असते. रंग शेवाळी असतो. पोटाचा रंग पिवळसर असतो. अंगावर स्प्रिंगप्रमाणे वर्तुळाकार खाचा असतात. एक-दोन इंच दिसणारी जळू ४-५ इंच लांबू शकते. शेपटीने व तोंडाने ती चिटकते. त्याला Sucker म्हणतात. तोंडाकडील बाजूस टाटा मर्सडिसबेंझच्या चिन्हाप्रमाणे १२० अंशावर तीन सुक्ष्म करवतीप्रमाणे जबडे असतात. त्याने ती त्वचेवर जखम करते. तिच्या लाळेत Hirudin नावाचे वेदनाशामक (Analgesic) व Anticoagulant रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे द्रव असते.
त्यामुळे जळ चावलेली फारशी कळत नाही. मध्यम आकाराची एक जळू १-१ चमचा रक्त शोषून घेते. तिचे पोटभरल्यावरच ती आपोआप गळून पडते. आपणास तत्पूर्वी ती काढायची झाल्यास चिमूटभर हळदपूड किंवा मिठाचे पाणी किंवा तंबाखूचे पाणी टाकावे. जंगलात ट्रेकिंग करताना सिगारेट किंवा काडी ओढून तिला चटका दिल्यास ती पडते.
विषारी जळवा या रंगाने काळ्या, स्पर्शाने बुळबुळीत, सुतळीसारख्या बारीक, अत्यंत वळवळणाऱ्या असतात. या चावल्या तर त्या ठिकाणी सूज येते. ज्वर येतो. सेप्टिक होते. या जळवा Hermaphrodite म्हणजे उभय लिंगी असतात. प्रत्येक जळूत प्रत्येक लिंगाच्या ७-८ जोड्या असू शकतात. उत्पत्तीसाठी दोन जळवांची जरुरी असते. जळवांची अंडी (Cocoons) शेंगदाण्याप्रमाणे (elipticle) असतात. जळूला डोके, स्पर्शेंद्रिये, पचनेद्रिये असतात. एकदा पोटभर रक्त प्यालेली जळू अनेक महिने जगू शकते.
Deep seated जळू खोलवरचे रक्तशोषण्यास वापरावी. सुखासीन लोकांच्यासाठी (वेदना कमी म्हणून) Surgical Blade ने रक्त काढण्याऐवजी जळू वापरावी.

शेकडो रुग्णांना लाभ
दुर्दैवाने आयुर्वेदातील समृद्ध शस्त्रक्रियेची परंपरा वैद्यांचे हातून निसटली. ती ज्यांच्या हातात शस्त्र आहे (नाभिक) त्यांच्या हातात टिकून आहे. आजही खेडोपाडी नाचकणीने (नखशस्त्र) शीर(Vein) तोंडून, अर्धशिशीमध्ये भिवयीजवळ रक्तस्राव केला जातो. पायातील कुरुप (Orn) कापले जाते. वैद्यांनी जळवा सांभाळणे सोडले त्या आज (मांग) मातंग समाजात सांभाळण्याची परंपरा आहे. जळवा आजही त्यांचेकडूनच बऱ्याच ठिकाणी वापरल्या जातात. सांगली नगरपरिषदेत २५ वर्षापूर्वी प्रथम जळवा खरेदी केला. अक्षरश: शेकडो रुग्णांना त्याचा लाभ झाला. त्यापैकी काही वैशिष्ट्ये पूर्ण रुग्णांच्या हकिकती वाचल्यास जळवांचा किती आत्यायिक (Emmergnsy), प्रसंगी उपयोग होतो व त्यांचे सामर्थ्य लक्षात येईल.

स्तनविद्रधि- Breast Absces
बहुधा पहिल्या प्रसुतीत बाळाला न पाजल्याने किंवा दूध न पिळल्याने दुध तुंबल्यासारखे होते, दुखू लागते हातही लावणे अवघड त्यामुळे पिळता येत नाही. अ‍ॅंटिबायोटिक्स किंवा वेदनाशामक देऊन काही वेळा उपयोग होत नाही अशावेळी ऑपरेशन! बाळंतपणासारख्या संकटातून बाहेर पडण्यापूर्वीच नवीन संकट नको वाटणे स्वाभाविक. अशा वेळी वैद्याकडे रुग्ण वळतो. पूयोत्पत्ती झाली नसेल तर ३-४ जळवा लावल्यावर तेथील तुंबा कमी होतो, ठणक कमी होते काही वेळा जळवा न लावता दिवसातून अनेकवेळा ब्रेस्ट पंपचा वापर हळूवारपणे करुन ४-५ थेंबांचे प्रमाणात थोडे थोडे घट्ट चिकाप्रमाणे दूध काढून टाकल्यास वरील प्रसंग येत नाही. तरी मातांनी किंवा बाळांच्या आजीने चिकाटीने मायेने हे काम केल्यास उपयोग होईल असा माझा अनुभव आहे.

इंजेक्शन अ‍ॅबसेस
इंजेक्शन दिल्यावर क्वचित प्रसंगी सूज येथे ठणक सुरु होते, लाली वाढते मग अ‍ॅंटिबायोटिक, शेकणे यांनीही कमी न झाल्यास ऑपरेशन! अशावेळी त्या सुजेच्या घेराच्या मानाने ३-४ जळवा लावल्या असता कंजेशन कमी होते. सूज उतरते. विशेषत: (Gluhal) कमरेत दिलेल्या इंजेक्शनच्या बाबतीत Abscess झाले तर खोलवर कापावे लागते व नंतर बरेच दिवस ड्रेसिंग करावे लागते अशावेळी जळवांचा उत्तम उपयोग होते. काहीवेळा आत पूयोप्तती झालेली असते. जळवा लावल्या जातात. त्यामुळे तुंबलेले रक्त काढले जाते व सूजेचा घेर कमी झालेला असल्याने लहानशा करटात रुपांतर होऊन थोडक्यात भागते. जास्त ठणकणाऱ्या सांध्यावर जळू लावून रक्त काढल्यास वेदना व सूज कमी होते. वात रक्ताच्या पेशंटचे वारंवार रक्त काढावे.

अर्धशिशी
हा एक अत्यंत त्रासदायक विकार आहे. भुवई जवळ जळू वैद्यांचे सल्ल्याने लावावी. काही वेळा उपयोग होतो. मुळव्याधीचे बाहेर असलेल्या मोडात रक्त तुंबलेने ठणका सुरु होतो. अशावेळी गुदद्वारात जळू जाणार नाही याची खबरदारी घेऊन जळू लावल्यास साठलेले रक्त निघून ठणका कमी होतो. गुदद्वारात गॉज घालून ठेऊन सतत लक्ष ठेवावे लागते.

लाल डोळे
काही जणांचे डोळे दारु प्याल्याप्रमाणे (दारु न पिता) लाल, तारवटलेले असतात. अशांच्या डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूस जळवा लावल्याने डोळ्यातील रक्तवाहिन्यातील तुंबलेले रक्त कमी होऊन डोळे पांढरे (?) होतात.! (निवळतात) पोटांत रक्तपित्त नाशक कामदुधा, महातिक्तघृत दूर्वाघृतासारखी औषधे घ्यावी लागतात. जळजळीत आहार, डोक्यावरुन अत्यंत गरम पाणी वर्ज्य करावे लागते.

गुडघे, घोटे सूज
कबड्डी, खोखो, क्रिकेट वगैरे खेळात मार लागतो, मुरगळतो, सूज येते, लाली येते अशावेळी इतर उपचारांबरोबर जळवा लावून साकळलेले रक्त काढल्यास लवकर बरे वाटते. किंबहुना ज्या ज्या वेदनांना आघात किंवा पडण्याचा पूर्वेतिहास (History of Fall, Trama) आहे. मग भले ती ४-५ वर्षापूर्वीचा असला तरी त्या वेदनांच्या जागेवर जळवा लागोपाठ २-३ वेळा लावल्यास ठणक कमी होते असा अनुभव आहे. विशेष म्हणजे जळू लावून झाल्यावर जेव्हा ती आम्ही पिळतो. तेव्हा ते रक्त काळसर, चिकट व दाढ आढळलेले आहे. मुव्दल नावाचे रुग्णाच्या पावलावर लाकडाचा ओंडका पडला. XRay काढला हाडास इजा नव्हती. वेदनाशामक व सूज कमी करणारी औषधे दिली गेली असे काही दिवस गेले. वेदना कमी नाही. डॉक्टर बदलून पाहिले उपचार अर्थात हेच असणे स्वाभाविक आहे. एक चान्स म्हणून सा.न.पा.च्या दवाखान्यात आले. आघात होता. त्यावेळी रक्त साकळलेले असणार शिवाय हे सर्व खोलवरचे असे अनुमान करुन जळवा लावल्यावर दाट, चिकट काळसर रक्त निघाले. वेदना थोड्या कमी वाटल्या. दुसरे दिवशी पुन्हा जळवा लावला त्यानंतर वेदना संपूर्ण कमी झाल्या.

Hits: 236
X

Right Click

No right click