रेल्वेचा प्रवास भाग - २

Parent Category: मराठी साहित्य Category: लेख Written by सौ. शुभांगी रानडे

----------------------------------------- वैभव मालसे, बंगलोर
वातावरण शांत झालं होतं,सर्व पोरांनी रडं थांबवलं होतं, खाण्याची तोंडं बंद झाली होती, लोक आपापल्या जागी स्थिरावले होते.काही लोकांचा डोळा लागला होता,त्यांनी शेजारी बसलेल्या खांद्याची उशी केली होती.पण उशांना ते ओझं होत होतं.'दिवसा कसला झोपतोस रे ? नको झोपू , रात्री तुला झोप नाही लागत' बायकोने चिमटा काढला तेव्हा मी जागा झालो. आमचा असा प्रेमळ संवाद नेहमीच चालू असतो. आमच्या बायकोला संध्याकाळचं झोपलेलं आवडत नाही. मी पुन्हा खिडकीतून बाहेत बघण्यास सुरुवात केली.रेलवे शेतं,घरं,नद्या,पूल,रस्ते काही क्षणात् मागे टाकत भरदाव वेगाने पुढे जात होती. रेलवे मध्ये भिकार्‍यांचे पण वर्गीकरण केलेले आहे. काही शारिरीक व्यंग दाखवून पैसे मागतात,काही लहान मुलं दाखवून, काही गाणी गावून,वाद्य वाजवून दाखवतात.मी एक निराळीच जात पाहिली.एक बाई आली आणि आमच्या डब्याचा केर काढू लागली.तिने किती केर काढला माहित नाही पण ते काम झाल्या नंतर ती पैसे मागू लागली.मला काहीच कळेना.ती बाई जास्तीत जास्त केविलवाणे चेहरे करू लागली.मला भिकार्‍यांची खूप कमी वेळा दया येते.मी खिडकीतून बाहेर बघू लागलो.काही मासे गळाला लागल्यानंतर ती बाई पुढे निघुन गेली.या पुढे सुध्दा भेळ वाले,पेरू वाले, चहा वाले,बिस्किटवाले येत होते आणि जात होते.माझा वेळ छान चालला होता.आता बायकोला झोप आली आणि तिने माझ्यामांडीवर डोकं ठेवून पाय पसरले. वास्तविक मला मगाशी काढलेल्या चिमट्याचा बदला घेता आला असता पण पुरुष या भानगडीत पडत नाहीत.कारणं अनेक आहेत पण महत्वाचं कारण म्हणजे 'समजुतदारपणा'.या वाक्याने वादळ येईल, पण हेच सत्य आहे.(टाळ्या)
आता संध्याकाळ झाली होती, आणि बाहेरचं वातावरण बदललं होतं.सुर‍व्या शांत झाला होता.आता फेरीवाल्यांचा प्रकार बदलला होता. चहावाल्यांची जागा 'सूप'वाल्यांनी घेतली होती. पेपरवाले,भेळवाले दिसेनासे झाले होते.चहाचा धकसा घेतल्यानंतर मी सुपचा विचारपण नाही केला.बायकोला तो अनुभव नसल्यामुळे तिने ती 'रिस्क' घेतली. चव घेतल्यानंतरचा चेहरा मला अजुनही आठवतो. तिच्या म्हणण्या प्रमाणे 'टोमँटो केचप' पाण्यामध्ये घालून ते मिश्रण थोडावेळ उकळलं तर जे काही तयार होइल ते म्हणजे रेलवे मधील सूप.'एसी' डब्यामध्ये असल्या गोष्टी मिळत नाहित.तिथे पुतळ्यासारखं बसून रहाव लागतं.वागण्यामध्ये एक प्रकारचा पोक्तपणा लागतो. मोठ्याने बोलायचं नाही,खोकताना,शिंकताना रुमाल,निटनेटकं बसणं,शिस्तीत खाणं, घाण नाही कचरा नाही.डोळे मिटून बसलं तर माणूस शेजारी आहे की नाही हे कळणार पण नाही .साध्याडब्याचं तसं नाही. माणसाला माणुसाची किम्मत असते.आता लोकांनी 'क्राँस कम्युनिकेशन' करण्यास सुरुवात केली होती.सुरुवात ओळख करण्यापासून झाली. बायकांचे नेहमीचे साचेबद्ध बोलणं सुरू झालं.पुरुष आपापल्या उद्योग धंद्याबाबत चौकशी करू लागले.बिस्किट,गोळ्या,चणे,फुटाणे यांची देवाण घेवाण सुरू झाली. आता एका नविन फेरीवाल्यानी दर्शन दिलं.'डिनर सर'.बायकोचं आणि माझं अशा काही वेळेला जुळतं सुध्दा,आम्हाला दोघांनाही रेलवे मधलं जेवळ आवडत नाही.आम्ही घरातून जेवण आणलं होतं.मी त्याला डबा नको असल्याचं सांगितलं.तरी तो परत आला आणि पुन्हा विचारू लागला. यावेळी मी फक्त मान हालवली.रेलवे मधे जेवताना आजुबाजूला पाहू नये. समोरच्या कुटुंबाने रेलवेचं कचरा कोंडाळ केलं होतं.बस मधून प्रवास करणारे खिडकीतून शक्यतो काही बाहेर टाकत नाहीत.गाडी थांबली की जे काही खायचं आहे ते खातात.रेलवेचं तसं नाही,आपल्याला हवं तेव्हा खाउ शकता आणि खिडकीतून बाहेर टाकलं की विषय संपला.बायकोला त्यांच ते खाणं बघवेना, मी तिला माझ्याकडे बघून खाण्यास सांगितलं.ज्याकोणाला 'हायजिनिक' शब्दाबद्दल खूप प्रेम असेल त्यानी रेलवे मधून प्रवासच करू नये.मी जेवण आटोपलं आणि हात धुवायला 'बेसिन' जवळ गेलो.साध्या डब्यामध्ये नेहमी आढळून येणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा, आपण बाथरूम मध्ये जावं आणि पाणी संपलेलं असावं,या सारखं नशीब नाही.मी हात धुतले,नशीबाने तेव्हा पाणी होतं.मी उद्या लवकर उठून पाणी असे पर्यंत सर्व प्रात:विधी उरकून घ्यायचे याचाच विचार करत होतो.गाडी चालू असताना जेवण करणे, हात धूणे , आणि इतर प्रात: विधी करणे किती कठीण आहे हे, ज्यानी त्याचा अनुभव घेतलेला आहे तेच जाणून आहेत.रेलवे बाथरूम मधला लोटा हा कोणाला इतका प्रिय आहे , त्याचा तो चोर काय उपयोग करतो आणि त्याला त्या चोरीचा किती फायदा होतो माहित नाही,पण ही जिवनावश्यक गोष्ट नेहमी अद्रुष्य झालेली असते.त्यामुळे रेलवे प्रवासामध्ये एक पाण्याची बाटली नेहमी जवळ ठेवावी,हा अजून एक सल्ला.
आता जेवण झाल्यानंतर झोपेचा प्रश्न उरला होता. अशावेळी पाहिला विचार डोक्यात येतो तो सामान चोरीचा. सामानामध्ये अजुन एक आहे ती म्हणजे चप्पल.मी देवळात जाताना आणि रेलवे प्रवासामध्ये नेहमी जुन्या चप्पल वापरतो.निवांत देव दर्शन घेता येतं आणि रेलवे मध्ये शांत झोप लागते,अनुक्रमे.तरी बायकोने चप्पल शक्य तेवढ्या आत कोंबल्या.रेलवे तिकिट काढताना माणुस तरूण दिसला तर त्याच्या माथी 'अप्पर बर्थ' मारतात.त्यामुळे मला शिडी चढून झोपायचं होतं.'सावकाश रे, नाहीतर पंख्याला डोकं लागेल', बायको. मी कसाबसा मावलो त्या जागी.माझ्यासमोरचा गालेलठ्ठ बराचवेळ शरीर वेडं वाकडं करून त्या जागेमध्ये मावण्याचा प्रयत्न करत होता.खूप 'कँलरीज्' खर्च करूनकुठे त्याला यश आलं.पंखा जिवाच्या अंतापर्यंत लोकांची सेवा करत होता आणि माझा हात जवळजवळ पंख्यात गेला होता.पोरांना कसं कळतं माहित नाही पण आता काही पोरांचा आवाज येवू लागला होता.ही पोरं झोपमोड करण्यासाठीच जन्माला येतात असं माझं ठाम मत आहे.बायको कुरकुर कारू लागली.तिला झोपताना दिवा आणि आवाज बिलकुल चालत नाही.शेवटी मनाची खूप समजुत घालून ती पण झोपी गेली.
सकाळ झाली तशी परत एकदा फेरीवाल्यानी हजेरी लावली.रात्रीतल्या रात्री काही जण आपापल्या गावी उतरले होते.त्यामुळे मला पाय पसरून बसण्याची जागा मिळाली.आता ती काही काळापुरती झालेली नाती तोडण्याचा क्षण आला होता.कुणास ठाउक परत कधी भेटतील की नाही.सर्वजण सामान बांधण्यात गुंतले होते.आमचं स्टेशन आलं.पुणे स्टेशनवर पहिलं पाउल ठेवताना बायकोला चंद्रावर पाउल ठेवताना जो आनंद झाला असेल, त्यापेक्षा जास्त आनंद झाला होता.आम्ही रेलवेला रामराम ठोकला आणि स्टेशनच्या गर्दिमध्ये मिसळून गेलो.

Hits: 680
X

Right Click

No right click