माझे परदेशगमन भाग - २

Parent Category: मराठी साहित्य Category: लेख Written by सौ. शुभांगी रानडे

माझे परदेशगमन भाग -२..........................मधुरा रानडे, ह्युस्टन
अमेरिकेला जायचं म्हणुन पहिल्यांदा जेवढा उत्साह होता त्यातला कणभरही उत्साह जायच्या दिवशी राहिला नाही. नकोच ती अमेरिका असे हजारदा वाटून गेलं... सगळ्या नातेवाइकांचे, मित्रमंडळींचे शुभेच्छांचे फोन येत होते, त्यामुळे या सगळ्यांना सोडुन जायचे म्हणुन मन आणखीनंच उदास होत होतं. पण आता पाऊल मागे फिरणेही शक्य नव्हते.
बंगलोरमधील सर्व कामे घरच्यांवर टाकून आम्ही फक्त आमच्या बॅगा घेऊन विमानतळाकडे निघालो. तिथे गेल्यावर जसजशी आत जायची वेळ येऊ लागली तसा मनातला विचारांचा, भावनांचा कल्लोळ आणखीनच वाढत होता. प्रत्येकजण आपल्या डोळ्यातून पाण्याचा एकही थेंब बाहेर येणार नाही याची काळजी घेत होता आणि चेहर्‍यावर उसनं हासू आणायचा प्रयत्न करत होता. पण आज हे लिहिताना मात्र मी माझ्या डोळ्यातल्या पाण्याला आवर नाही घालू शकत... 'चेहर्‍यावर हसू आणि मनात आसू' अशा अवस्थेत सर्वांचा निरोप घेऊन आम्ही Check-In करायला निघालो. जाताना नजर सारखी मागे वळत होती.......ते सगळे गेल्यावरही कितीतरी वेळ आम्ही दोघेही त्यांना शोधायचा प्रयत्न करत होतो.
शेवटी ८ जूनला पहाटे २.१५ वाजता आम्ही Air-France च्या A-380 airbus मधे स्थानापन्न झालो. आत प्रवेश केल्यावरच International Flight बद्दलच्या सगळ्या अपेक्षा कोलमडून पडल्या. इतक्या लहान आणि uncomfertable खुर्च्यांवर बसून बावीस तास प्रवास करायचा ही कल्पनाच सहन होत नव्हती. पण आलीया भोगासी असावे सादर............ मग समोर असलेले छोटे screen, music player.... आणि संकटाच्या वेळी उपयोगी पडणार्‍या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यावर आमचा breakfast आला. दिवसाच्या एवढ्या सुरुवातीला ब्रेकफास्ट करायची ही पहिलीच वेळ.... तरं असा थंडगार ब्रेकफस्टची चव घेऊन (कारण त्यात खाण्यासारख्या गोष्टी खुप कमी होत्या) आम्ही निद्रेच्या स्वाधीन झालो. तशी झोप व्यवस्थित लागतचं नव्हती... पण JetLag च्या भीतीने आम्ही झोपायचा प्रयत्न करत होतो. अधुनमधुन समोरच्या स्क्रीनवर आपण आता कोणत्या देशावरुन उडत आहोत, अजुन किती अंतर शिल्लक आहे याची माहिती घेणंही सुरु होतं. आमच्या घडयाळातली वेळ आणि स्क्रीनवरची वेळ यांचा तर उंदीर-मांजराचा खेळ चालू होता.
नकाशावरच्या बंगलोर, पुणे, मुंबई, आणि नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरिया, भूमध्य समुद्र, इटली, जर्मनी अशा बर्‍याच ठिकाणांवरुन उडत आम्ही एकदा फ्रान्स देशातल्या पॅरीस इथे येऊन पोहोचलो. संपूर्ण जगामधे 'अत्याधुनिक फॅशनचे शहर' म्हणून ओळखल्या जाणार्‍या पॅरीसने आम्हाला मात्र त्या शहराची एक वेगळीच फॅशन दाखवली. आम्ही विमानाच्या खिडकीमधुन हे शहर पहाण्यासाठी, जगप्रसिध्द आयफेल टॉवरची एखादी ओझरती झलक पहाण्यासाठी खुप उत्सुक होतो... पण या शहराने आम्हाला पूर्णपणे निराश केलं. तसेही आमच्या दोन्ही विमान उड्डाणांमधे खूपच कमी वेळ असल्याने आम्हाला फक्त आकाशातूनच पॅरीसचं दर्शन घ्यावं लागणार होतं... पण तेही आम्हाला मिळालं नाही. एखाद्या सौंदर्यवतीने अतिशय सुरेख पोषाख करावा आणि थंडी आहे म्हणुन वरुन शाल घेउन तो पूर्णपणे झाकून टाकावा त्याप्रमाणे पॅरीसने आपल्याभोवती धुक्याची दाट शाल लपेटून घेतली होती. त्यामुळे ही 'परदानशीन' आमच्यासमोर 'बेपर्दा' झालीच नाही.
एक पान लिहीन म्हणाले आणि चांगली (की वाईट?) चार पाने लिहून झाली. आता पोटानं आणि हातानंही आपण असल्याची जाणीव करुन दिली आणि मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. आता गाण्यानं सुद्धा एक नविन वळण घेतलं आहे......" ये जो देस है तेरा, स्वदेस है तेरा, तुझे है पुकारा...... ये वो बंधन है जो कभी टूट नही सकता......"

Hits: 570
X

Right Click

No right click