रेल्वेप्रवासातील मजेशीर किस्से भाग - २

Parent Category: मराठी साहित्य Category: लेख Written by सौ. शुभांगी रानडे

हवाईदलातील कार्यकाळात घडलेले रेल्वेप्रवासातील मजेशीर किस्से भाग - २
लेखकः विंग कमांडर (नि) शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१०४९.

‘टॅक्सीने केला गाडीचा पाठलाग!’
माझा मित्र विंग कमांडर (नि) सी एम उर्फ चंदर मोहन गांधी एक महान वल्ली होता. त्याच्या परिवाराची आमची श्रीनगर पासूनची मैत्री. गांधी प्रचंड तऱ्हेवाईक व लहरी प्राणी! मूठवळून सिगरेट करंगळी जवळ ठेवून स्वारी प्रदीर्घ झुरके घेत धुम्रपान करीत असे. बिहारीवळणाच्या त्याच्या सवयी! जर्दावाल्या पानाचा तोबरा आसपासची भिंत लाल करायचा सदैव तयार! तीन पत्ती, पपलू, टिटलू वगैरे पैसे लाऊन पत्त्याचा जुगार खेळण्याचा भरपूर शौक! तंद्री लागली तर काय करेल सांगता येणार नाही. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पुस्तक वाचनात रंगली स्वारी गाडी येऊन केंव्हा गेली त्याचा पत्ताच नाही याला! ‘ट्रेन छूट गई यार’ असे म्हणून खळखळून हसणारा हा प्राणी एक महान वल्ली होता. एकदा पैजेत हरल्याने कार विकून अपरात्री आलेला पाहून त्याची पत्नी निशा म्हणे, ‘हा नवरा काय कधी करेल नेम नाही’! असे हे कुटुंब पुण्यात लोहगावच्या क्वार्टरमधे पाहुणे म्हणून आले होते! पाहुणचार संपवून पंत गांधी बंगलोरला आधी रवाना झाले. निशा व तिच्या मुलीचे नवी दिल्लीपर्यंत झेलम एक्सप्रेसचे एसीचे तिकिट होते. तिला सोडायला मी पुणे स्टेशनवर गेलो होतो. वाटेत तिकिटे घेतल्याची खात्री म्हणून मी तिची तिकिटे पाहिली. रिझर्वेशनचा चार्ट पहायला सोईचे म्हणून निशाने तिकिटे माझ्याजवळच ठेवली.

रीतसर ‘टाटा बाय बाय’ केल्यावर परतताना हवाईदलातील एकजण गाठ पडले त्यांच्या मागे स्कूटर वरून जाता जाता सहज खिशात हात गेला तर त्यांची तिकिटे हातात आली! गाडीतर केंव्हाच निघून गेलेली. परत आम्ही स्टेशनवर गेलो मास्टरांना सर्व सांगितले. त्यांनी टीसीला तिकिटे नगरला मिळतील असा निरोप द्यायची व्यवस्था केली. मी टॅक्सीने अहमदनगरच्या दिशेने निघालो. रेंगाळत चालवणाऱ्या चालकाचा अवतार पाहून त्याला मी परत स्टेशनवर सोडायला सांगितले. त्यात आणखी वेळ जात होता. शेवटी एक पैजेवर गाडी पकडून देतो म्हणून तयार झाला. इमर्जन्सी केस घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्सच्या थाटात टॅक्सी निघाली. सिनेमात दाखवतात तशी कधी करकचून ब्रेक मारत तर ट्रकवाल्यांना शिव्यांचा वर्षाव करत मागे टाकत फियाट अशी भिन्नाट जात होती की पूछो मत. शेवटी नगर स्टेशनच्या जवळच्या ओव्हरब्रिज वरून झेलमसाठी मिळालेला हिरवा सिग्नल पाहिला, तेंव्हा हायसे वाटले. मी पोहोचेपर्यंत गाडी धडाडत थांबली. निशा दारातच उभी होती. तिच्या हाती तिकिटे दिली. नवऱ्याची आठव काढून ती म्हणाली, ‘भाईसाब आप भी कोई कम नही!’ दोघांनीही गलती बद्दल कान कान पकडले.. तिला ट्रेनमधे निरोप मिळाला होता म्हणून टीसीने सतावले नव्हते. तेंव्हा मला हायसे झाले. परतीला टॅक्सीवाल्याने खाऊन-पिऊन मला खूप कापला. पण तो टॅक्सीतून केलेला पाठलाग अद्याप विसरलेला नाही.

कोट लटकला गाडीत !

हवाईदलातील नोकरीत अकाऊंट्स ऑफिसर्सना ऑडीटच्या कामासाठी डेहराडूनला सीडीए (कंट्रोलर डिफेन्स अकाऊंट्स) ऑफिसच्या भोज्याला शिवायला दरवर्षी जाणे अनिवार्य असते. अशीच कामे घेऊन मी श्रीनगरला व्हाया जम्मू परतत होतो. सर्व कामे सुरळीत झाल्याने मी खुषीत होतो. अमृतसरला जाणाऱ्या गाडीत फर्स्टक्लास कूपेत पांढऱ्या सफेद कपड्यातील ग्यानी सरदारजींशी गप्पा मारून मी ताणून दिली. कारण पहाटे ३ नंतर कडाक्याच्या थंडीत उतरून जम्मूच्या गाडीत चढण्याचे दिव्य करायचे होते. रात्री १२।। ला मला अचानक जाग आली. बाहेर अंबाला स्टेशन आले होते. विचार केला पटकन उतरावे व आत्ताच जम्मूला जाणाऱ्या गाडीत चढावे म्हणजे नंतर उतरायचे झंझट नको. लगेच होल्ड-ऑलचे पट्टे बांधून गाशा गुंडाळला. उतरलो. समोरच्या रेवडीवाल्याकडून गरमागरम चहाचा गिलास ओठांना लावला. तोवर मी आलेली गाडी गेली. मी चहाचे पैसे द्यायला खिशात हात घातला अन् लक्षात आले की पाकीट, वॉरंट व अन्य महत्वाची कागदपत्रे ठेवलेला कोट गाडीतल्या खुंटीला लटकलेला राहिला. गाडी तर गेली! झाले. वाटले आता कसला कोट परत मिळतोय. पुढची ट्रेन तासाभराने आली. वाटले की प्रयत्न करून पाहावे मिळाला तर मिळाला. म्हणून चढलो गाडीत. आता जम्मू ऐवजी अमृतसरला जाणे भाग होते. करत करत अमृतसरला लॉस्ट अँड फाऊंड खिडकीपाशी नकार मिळाल्यावर फार निराशा आली. आणखी चौकशी करता ‘त्या गाडीतील टीसींच्या रेस्टरुमवर पहा प्रयत्न करून’ एकांनी सल्ला दिला. मी त्या खोलीकडे जाता जाता एकदम हाक आली, ‘आई ये भाईसाहब, हम आपकी ही राह देख रहे है.’ माझा कोट हातात देत तो म्हणाला, ‘ये लो आपकी अमानत’. सर्व वस्तू ठाकठीक असल्याचे पाहून माझा चेहरा खुलला. ‘धन्यवाद आप उस ग्यानी सरदारजी को देना जिन्होंने ये कोट आप का होने की बात की’.

त्या टीसीं परतीच्या प्रवासासाठी जालंधरपर्यंत त्यांच्या बरोबर येण्यचे सुचवले. तो पर्यंतचा वेळ मी स्वर्ण मंदीर, जालियनवाला बाग पहात घालवला. सहज नजर गेली सिनेमाच्या पोस्टरवर सुनील दत्त, प्रेमनाथचा ग्यानीजी पिक्चर लागला होता. आठवले की या पिक्चरचे शूटींग एअर फोर्स स्टेशन चंदीगढला झाले होते. तेंव्हा आपण त्यात होतो. सिनेमात तो शॉट आला. लढाई जिंकून हिरो सुनील दत्तला महावीर चक्र मिळते. त्याचे कडकडून अभिनंदन करायला आम्ही हवाईदलातील खरे ऑफिसर्स विमानतळावर हजर असतो. मी मला ओझरता पहायला मजा वाटली. अशीच मजा नंतर हवाईदलात असताना माझ्यावरील घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ‘मन में है विश्वास’च्या सीरियलमधे २६ जानेवारी २००७ ला दाखवलेल्या एका एपिसोडचे शूटींग पहाताना आली. कारण त्यात आमच्या घरच्या सर्वांची भूमिका करणाऱ्या शशिकांत, अलका, चिन्मय व नेहा या कलाकारांतून आम्ही आम्हालाच पहात होतो. श्रद्धा व भक्ती तीव्र असेल तर अशक्यातीत घटनांवर कशी तोड निघते याचे ते अदभूत उहादाहरण होते!

Hits: 525
X

Right Click

No right click