दलित साहित्य
आधुनिक मराठीतील एक महत्त्वाचा साहित्यप्रवाह. सामाजिक व वाङ्मयीन अशा दुहेरी विचारमंथनातून स्वातंत्र्योत्तर काळात ही संज्ञा पुढे आली. विशेषत्वाने १९६० नंतर ती विशेष चर्चाविषय ठरली.
दलित शब्दाचा पतित किंवा पडलेला वा दीनदुबळा हा अर्थ येथे मुळीच अभिप्रेत नाही. ह्या देशातील समाजव्यवस्थेतून हा शब्द निर्माण झाला. वर्णाश्रमव्यवस्थेने एका मोठ्या समूहाला विविध कारणपरंपरांनी अस्पृश्य घोषित केले. साधेसुधे मानवी जीवन जगणेही त्यांना अशक्य करून सोडले. ज्ञान, मान, सत्ता, संपत्ती, संस्कृती आणि सर्वस्व यांच्यापासून त्याला अलग काढले. दलितत्वाचा शिक्का ठोकून पुरते नगण्य करून टाकले.
समाजाच्या अनेक पदरी जीवनानुभूतीचे चित्रण प्रतिभावंतांच्या आविष्कारातून शब्दबद्ध केले जात असते पण भारतीय साहित्यात दलित वर्गाच्या लौकिक आयुष्यातील फरफट आणि भावजीवनाची वास्तपुस्त कधी ग्रंथबद्ध झालीच नाही. विचारांध बनविणारी धर्माधिष्ठित परंपरा दलित साहित्याने निग्रहाने नाकारली. ह्या अंधत्वाला त्याने ठामपणे नकार दिला, तर मानव म्हणून नव्याने उभारी धरताना मानवी परंपरेशी, ते व्यापकपणे दृढबद्ध झाले. वैचारिक व मानसिक दास्यातून मुक्तीचा उमटणारा हुंकार म्हणून ते आकारू लागले. आपल्या सांस्कृतिक साध्याकडे वाटचाल करू लागले.
मानवी हक्क नाकारणाऱ्या चातुर्वर्ण्याकडे, त्याला पोसणाऱ्या धर्मबंधनाकडे आणि त्याचा मूलाधार असलेल्या, माणसाला अगतिक ठरवणाऱ्या ईश्वराच्या अस्तित्वाकडे संपूर्ण वैज्ञानिक, स्वाभाविक व मानवीय दृष्टिकोणातून पाहण्याची गरज निर्माण झाली. उदियमान होऊ पाहणाऱ्या मनांवर संस्कार घडविण्याची क्षमता असलेले दलित साहित्य बाळसे धरू लागले. साहित्याने जीवनाशी, जीवनातून प्रतीत होणाऱ्या पण तरीही शब्दात न बांधता येणाऱ्या तरल भावस्पंदनांशी, मूल्यगर्भ वैचारिकतेने समांतर असलेच पाहिजे, ही निष्ठा बांधीलकी यातूनच उद्भवली.
दलित आणि दलितेतर हे एकाच समाजाचे जरी घटक असले, तरी त्यांची जगे मूलतः भिन्नच आहेत. १९५६ साली हे गृहीत धरूनच डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराचे पाऊल उचलले. दलितेतरांच्या वैचारिक गुलामगिरीवर हा प्रत्यक्ष प्रहार होता पण लवकरच डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण झाल्याने दलित समाजावरही मोठाच आघात झाला. अशा दुहेरी आघात प्रक्रियेतून दलित साहित्य उसळी घेऊन उभे राहिले.
नाकारलेल्या समूहमनाची संघशक्ती डॉ. आंबेडकरांच्या रूपाने प्रकट झाली होती. त्यांच्या अष्टपैलू नेतृत्वाची धग अनेक क्षेत्रांत दलितेतरांनी अनुभवली. ‘आपली सुखदुःखे आपल्या भाषेत बोलणारे लेखन झाले पाहिजे’, असे विचार ते त्यांच्या वक्तव्यांत मांडत. ‘ग्रंथांची भाषा जिवंत व नारळीपाण्याइतकी मधुर अशी असावयास हवी. या ग्रंथांच्या वाचनाने माणसांची झोप उडून जाऊन त्यांची विचारशक्ती जागृत झाली पाहिजे’ असे ते म्हणत. हाच दलित साहित्याचा उगमस्राेत म्हणावा लागेल.
प्रचलित व्यवस्थेच्या दावणीला बांधले गेलेले पारंपारिक निकष या साहित्याने नाकारले. ग्रंथप्रामाण्य, ईश्वर, स्नानसंध्या, जातीवाद आणि देहदंडन ही ध्वस्तप्रज्ञाची लक्षणे धर्मकीर्ती या बुद्ध विचारवंताने सांगितली आहेतच. ते ओळखून हे लेखन अधिक संयतपणाने होऊ लागले. ‘भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येते असे नाही’ हे सूत्र स्मरणात ठेवून आरंभी ज्यांनी लेखन केले त्यांत किसन फागू बनसोडे ह्या नावाचा खास उल्लेख करावा लागेल. हरिहरराव सोनुले, ना. रा. शेंडे, शंकरराव सुराडकर, चां. भ. खैरमोडे, नामदेव व्हटकर, दा. ता. रूपवते, घनःश्याम तळवटकर इ. अनेक लेखकांनी ठामपणे हा विचार सर्वत्र रुजविला.
या काळात महाराष्ट्रभर लोकजागृतीचे कार्य वेगाने घडले. शाहीर केरू अर्जुन घेगडे, केरूबुवा गायकवाड, पतीतपावनदास, दीनबंधू, राजानंद गडपायले, वामन कर्डक, श्रावण यशवंते यांनी सर्व समाजमन आपल्या रसपूर्ण आवाहक गीतांनी घुसळून लखलखीत केले. सुख, समृद्धी, सभ्यता, समानता यांची स्वप्ने पाहात व महाराष्ट्राचे नंदनवन व्हावे ही अपेक्षा करीत अण्णाभाऊ साठे यांनी आपली लेखणी सरसावली. ‘त्यांची ती शाहिरी त्यांच्या जिभेवर साणेवर घासलेल्या तलवारीप्रमाणे लखलखत होती’ हे अण्णाभाऊंनी केलेले शाहिरांवरील भाष्य त्यांच्याच लेखनाला चपखल बसते. १९५९ साली अवतरलेली फकिरा ही त्यांची सर्वोत्तम कलाकृती. बरबाद्या कंजारी (१९६०), आबी (१९६१), माकडीचा माळ (१९६३), वारणेचा वाघ (१९६८) असे विपुल लेखन अण्णाभाऊंनी केले पण पुढे त्यांच्या लेखनाला केवळ संख्यात्मक मूल्य उरले. त्यांच्या लेखन प्रपंचाचा ‘मराठी कादंबरी’ च्या आढाव्यात नामोल्लेखही येऊ नये, ही गोष्ट रूढ साहित्यविचार उघडा पाडणारीच होती.
दलित साहित्यात वास्तव जीवनाचे जळते चित्रण फार मोठ्या प्रमाणातून प्रकट होण्याचा काळ म्हणजे १९६० नंतरचे लेखन. उपलब्ध साहित्यात शब्दांच्या खोडाबेडीत अडकलेली क्षीण रेखाटने आणि स्वानुभवाच्या खोलीने अथांग बनलेली वेगवान शब्दांकने यांच्यात तीव्र स्पर्धा जाणवू लागली. शंकरराव खरात, हरिभाऊ पगारे, बंधुमाधव, बाबुराव बागूल, सुखराम हिवराळे, केशव मेश्राम, वामन होवाळ, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा ढाले, चोखा कांबळे, हिरा बनसोडे, भीमराव शिरवाळे, सुरेखा भगत, योगीराज वाघमारे, त्र्यंबक सपकाळे, दया पवार, दत्ता भगत, वामन निंबाळकर, प्रल्हाद चेंदवणकर, नरेंद्र शेलार, माधव कोंडविलकर, उमाकांत रणधीर, अरुण कांबळे, अर्जुन डांगळे असे खूप लेखक या काळात लेखक म्हणून गुणवैशिष्ट्याने पुढे आले.
सैद्धांतिक व ललित आणि विविध वाङ्मयप्रकारांनी दलित साहित्यात १९६० नंतरच्या काळात मोठीच भर पडली. मराठी वाङ्मयविवेचकांना त्याची गंभीर नोंद घेऊन त्याचे मूल्यांकन व्यासंगीपणे करण्याची अपरिहार्यता निर्माण झाली. म. भि. चिटणीस, म. ना. वानखडे, डी. टी. माने, ताराचंद्र खांडेकर, गंगाधर पानतावणे, राजा ढाले यांनी दलित साहित्याच्या भविष्याची वेळोवेळी विवेचक चर्चा करून त्यास मौलिकता प्राप्त करून दिली.
शंकरराव खरात यांचे साहित्य लक्षणीय असेच आहे. उपेक्षित समूहमनाची व व्यक्तिमनांची वेदना, त्यांच्यातील माणुसकी, सोशीकता आणि उद्रेक यांचे प्रत्ययकारक चित्रण खरात सामर्थ्याने करतात. माणुसकीची हाक (१९५८), बारा बलुतेदार (१९५९), तडीपार (१९६१), सांगावा (१९६२), टिटवीचा फेरा (१९६३), दौंडी (१९६५), गावशिव (१९७०) या त्यांच्या कथासंग्रहांतून त्यांनी निर्माण केलेल्या माणसांचे अनेक स्तरांवरील जीवन खिळवून ठेवते. वैचारिक लेखन आणि कांदबरीलेखनही खरातांनी केले आहे पण त्यांची वैशिष्ट्ये प्रामुख्याने कथालेखनातूनच जाणवतात.
उद्दाम आणि झंझावती भाषेचा आणि विचारप्रवण करणाऱ्या विद्रोहाचा लाव्हा श्री. बाबुराव बागूल यांच्या लेखनातून उसळतो. जेव्हा मी जात चोरली होती (१९६२), मरण स्वस्त होत आहे (१९६९) आणि सूड (१९७०) अशा पुस्तकांतून बागूलांचे आत्मवेध घेणारे व समाजचिंतनात सतत बुडालेले मन प्रकर्षाने ध्यानात भरते.
दलितांची वृत्तपत्रसृष्टी हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. त्यांच्या वृत्तपत्रातून व्यक्त होणारी त्यांची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व धार्मिक दृष्टी अभ्यसनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी गोपाळबाबा वलंगकर यांचे विटाळविध्वंसक (१८८८), किसन फागू बनसोडे यांची विटाळविध्वंसक (१९०२), निराश्रित हिंद नागरिक (१९१३), मजूर पत्रिका (१९१८), चोखामेळा (१९३१) ही नियतकालिके, शिवराम जानबा कांबळे यांचे सोमवंशीय मित्र (१९०९), गणेश आक्काजी गवई यांचे बहिष्कृत भारत (१९२०) ही नियतकालिके, पाक्षिके, साप्ताहिक या स्वरूपांत होती. निराश्रित हिंद नागरिकच्या निवेदनात संपादकाने म्हटले होते, ‘अस्पृश्य मानलेल्या समाजाच्या सुधारणेला ज्या ज्या प्रयत्नांची आवश्यकता आहे, त्यां वर्तमानपत्र चालविणे हाही एक अत्यंत आवश्यक व महत्त्वाचा प्रयत्न होय. चळवळीचा प्रसार करण्याचे व लोकजागृती करण्याचे हे एक मुख्य साधन आहे’. यावरून उपरोक्त दलित पत्रकारांच्या पुढे कोणते ध्येय होते हे स्पष्ट दिसते. त्या अनुषंगाने त्यांनी केलेले लेखन मोलाचे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० साली मूकनायक, १९२७ साली बहिष्कृत भारत, १९२९ साली जनता आणि १९५५ साली प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे जन्माला घातली. बहिष्कृत भारतातील त्यांचे अग्रलेख म्हणजे त्यांच्या वृत्तपत्रसृष्टीतील तेजस्वितेचाच प्रत्यय आणून देतात. चिंतन, अभ्यासपूर्णता, तर्ककठोरता आणि सामाजिक दृष्टिकोण यांचे दर्शन त्यांच्या सर्वच लेखनातून घडते. मराठी वृत्तपत्रसृष्टीने या महान पत्रपंडितांकडे दुर्लक्ष करून मराठी सारस्वताचे फार मोठे नुकसान केले आहे. बहिष्कृत भारतातील निवडक लेख रत्नाकर गणवीर ह्यांनी बहिष्कृत भारत ह्या नावाने संपादिले आहेत (१९७६).
दलित साहित्य स्वानुभवाच्या आचेतून, अस्मितेच्या शोधात, उपलब्ध वाङ्मय व समाजमूल्यांच्या विरोधात भक्कमपणाने उभे राहिले आहे. प्रत्यक्षानुभवाचे चित्रण करताना ते स्वतःचे आदर्शही शोधीत चालले आहे. चालत राहिल्यावर रस्ता तुटावा आणि ठिकाणही जवळ यावे अशा तऱ्हेची ही वाटचाल आहे. या आत्मशोधाचे निष्कर्ष, नवदर्शनाची विलसिते, विराट जीवनाचे मूल्यगर्भ चिंतन आणि समाजाच्या प्रवाहीपणावर टिकून राहणारी वाङ्मयीन महात्मता, या दृष्टीनेच दलित साहित्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले पाहिजे.
, केशव मेश्राम मराठी विश्वकोश
Hits: 169