सुखी संसार

Parent Category: मराठी साहित्य Category: कविता Written by सौ. शुभांगी रानडे

पंचवीस वर्षाच्या आपल्या संसारात उणे असे का काही बायको म्हणते,
आपल्यासारखा आदर्श संसार दुसर्‍या कोणाचाच नाही ॥१॥

भांडण नाही, तंटा नाही, समंजसपणात माझ्यासारखा नवरा दुसर्‍या कोणाचाच नाही ॥२॥

सोमवारी मंगळवारी कडू कारल्याची भाजी असते,
बुधवारी गुरुवारीही कडू कारल्याचीच भाजी असते,
शुक्रवारी शनिवारी केलेल्या कडू कारल्याच्या भाजीला नावे ठेवायची नसतात,
रविवारी केलेली कडु कारल्याची मुकाट्याने पण हसत मुखाने खायची असते ॥३॥

पगाराचे दिवशी तर प्रेमच प्रेम असते,
खमंग भजी खायला घालून बायको माझा खिसा रिकामा करते,
मुक्त मुक्त वातावरणात फिरायची संधी मला देते,
कारण खिसा रिकामा असल्याने चोरीची भीतीच नसते ॥४॥

प्रवासाची सर्व जबाबदारी बायकोवरच असते,
कारण प्रवासाचे तिकीटच तिच्याजवळ असते,
माझ्या एका खांद्याला एअरबॅग असते,
दुसर्‍या हातात सूटकेस असते,
बायकोच्या मागे मागे जाउन पर्सचे रक्षण करावयाचे असते ॥५॥

आठवडे बाजारात भाजीची निवड माझी बायकोच करते,
माळीणबाई ती भाजी माझ्या पिशवीत भरते,
तिच्या पर्समधील पैसे ती माळीणबाईला देते,
पुढची भाजी घेण्यासाठी मागे या हे सांगायची जरुरच नसते ॥६॥

बायकोच्या आवाजाने गल्ली सारी जागी होते,
सकाळी उठण्यासाठी गल्लीतल्या लोकाना गजर लावायची जरुरच नसते ॥७॥

भारदस्तपणात माझ्या बायकोला गल्लीत तोड नाही,
वजनकाट्याचा काटा गरगर फिरून राही ॥८॥

बायकोला माझ्या दागिन्याची हौस अजिबात नाही,
वर्षाला फक्त लाखाचीच खरेदी होई ॥९॥

प्रत्येक शुक्रवारी माझी पत्नी अंबाबाईची खणानारळाने ओटी भरते,
अशा माझ्या सुखी संसाराला दृष्ट लागू नये म्हणून देवीची प्रार्थना करते ॥१०॥

Hits: 576
X

Right Click

No right click