पितृछत्र

Parent Category: मराठी साहित्य Category: कविता Written by सौ. शुभांगी रानडे
बाबा नाना काका अण्णा
कुणी म्हणती दादा ऽ ऽ ऽ 
मामा बापू तसेच डॅडी
कुणी म्हणती नाना - - -  १
 
कुणीही काही म्हणो तरीही 
भाव असे साधा ऽ ऽ ऽ
पैसा अडका असो नसो वा
रूप तसे संपदा - - - २
 
मातपित्याचे छत्र असे हे
शिरावरी जेधवा ऽ ऽ ऽ 
हरेक समयी शब्दासचि
त्या अर्थ येतसे नवा - - -  ३
 
उदरभरण अन् पोषण करण्या 
कर मातेचा हवा ऽ ऽ ऽ 
परि सुशांत नयनामधुनी पित्याच्या
लाभतसे गारवा - - - ४
 
गोकुळामधि नंदाघरी जव
बाळराज ठेवण्या ऽ ऽ ऽ 
धैर्यशील तो कृष्णपिता ती 
पार करी यमुना - - - ५
 
कन्यादाना करीत असता
होति किती यातना ऽ ऽ ऽ 
स्मितमुख करूनी वधूपिता तो
आवरितसे भावना - - - ६
 
सानपणीच हे पितृछत्र मी
हरवुनि की बसले ऽ ऽ ऽ 
स्वप्नी तरी ते दर्शन घेण्या 
आतुर की जाहले  - - - ७
 
अंधुकशी मज स्मरते अजुनी
उंचनिंच मूर्ती ऽ ऽ ऽ 
सतेज घारे हिरवे डोळे
प्रेमळ वदनावरती - - - ८
 
करुणाघन त्या परमेशाच्या
व्याकुळ मी दर्शना ऽ ऽ ऽ 
स्वर्लोकीच्या पित्यास माझी 
एकचि ही प्रार्थना - - - ९

— — सौ. शुभांगी सु. रानडे

Hits: 572
X

Right Click

No right click