सुविचार - १०

Parent Category: मराठी साहित्य Category: सुविचार Written by सौ. शुभांगी रानडे
भविष्यात घडणार्‍या किंवा कदाचित कधीच न घडणार्‍या विपत्तीची चिंता करून आपण केवढी मोठी किंमत चुकवत असतो.
प्रारब्धाचा व पुरूषार्थाचा मार्ग भिन्न आहे, परंतु जेव्हा त्यांची भेट होते, अद्भुत यश प्राप्त होत असते.
ज्याप्रमाणे अंधारात मनुष्याची पडछाया त्यांची साथ सोडून देते, त्याप्रमाणे दुर्दैवाच्या फेर्‍यात सापडलेल्या मनुष्याचे आप्तेष्ट त्याची साथ सोडून देतात.
धैर्य आणि विनयशीलता हे असे गुण आहेत की, ढोंगी लोकांना त्यांची नक्कल करता येत नाही.
मनुष्याला एकदा बोललेले खोटे पचविण्यासाठी अनेकदा खोटे बोलावे लागते.
पैसा हे मद्य आहे. सेवा हे अमृत आहे.
श्रीमंतीच्या हवेल्या चांगल्या आहेत म्हणून आपल्या लहान झोपड्या कोणी पाडतात का?
भुकेने कासावीस झालेले पोट नि अन्यायाने तडफडणारे मन यातूनच क्रांतीचा जन्म होतो.
तुमच्याने पुढे जाववत नसेल तर पुढे जाऊ नका. पण पुढे जाणार्‍याला मागे खेचू नका.
भाग्य म्हणजे जिंकावयाची बक्षिसे ! त्याचा रस्ता म्हणजे धैर्य ! आणि संधी म्हणजे रस्त्याच्या बाजूला सावलीत जे दडपलेले असते ते.
जसे मीठ अन्नाला रूची आणते. तशी व्यक्तीची भावना ही निर्गुणाला गुणाची पुटं चढवीत असते.
समोर अंधार असला, तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात घ्या.
अधर्म, अनीती, अनाचार यांच्या साहाय्याने मिळविलेला जय पराजयापेक्षाही अधिक लांच्छनास्पद आहे.
संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव होय.
घणाचे घाव बसले की हिर्‍यासारख्या दिसणार्‍या गारेचे पाणी होते, पण घणाचे आघात खर्‍या हिर्‍याचे पाणी पालटू शकत नाहीत.
शत्रूशी मित्रत्व राखणे ही प्रेमाची खरी कसोटी आहे. तो गुण आहे; कारण त्यात श्रम आहेत. तो खरा पुरूषार्थ आहे; कारण त्यात खरी बहद्दुरी आहे !
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
ज्याला काटे पेरायचे आहेत, त्याने अनवाणी चालता उपयोगी नाही.
तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल; तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. गोणपाटासारखा कराल, तर त्यातून परमेश्वर दिसणार कसा?
कीर्ती नदीप्रमाणे उगमस्थानी अत्यंत अरूंद असते; परंतु दूरवर गेल्यानंतर ती अत्यंत विशाल होते.
चिंता म्हणजे मानवी जीवनाला चढलेला गंज आहे. हा चिंतारूपी गंज मनुष्याच्या जीवनातील झळाळी नष्ट करतो व मनुष्याला दुर्बल बनवतो.
धनरूपी अथांग सागरात तुमची इज्जत, हृदय व सत्य बुडून जाऊ शकते.
जेव्हा आम्ही नम्रतेने लहान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.
घाम गाळल्याशिवाय मिळालेली सुखशांती टिकाऊ नसते.
स्वार्थरहित खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
जो तुमची सेवा करतो, त्याच्या ऋणातून तुम्ही केवळ पैसे मोजून मुक्त होऊ शकत नाही. सेवेचे ऋण जगात फक्त दोनच मार्गांनी फेडता येते; एक प्रेमाने व दुसरे सेवेने.
लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात.
दु:खापेक्षा उत्सुकताच अधिक रक्त आटवते.
प्रतिभा आणि पांडित्य यांचा संगम सर्वश्रेष्ठ होय.
दुसर्‍यासाठी डोळयात उभे राहिलेले अश्रू हे मनुष्याच्या आत्मविकासाच्या वेलीवरील फुललेली फुलेच होत.
आपण पक्ष्याप्रमाणे आकाशात विहार करावयास शिकलो; माशाप्रमाणे पाण्यात तरंगावयास शिकलो; परंतु अद्याप माणसाप्रमाणे जगात वावरण्यास मात्र शिकलो नाही.
पीडित हृदयाचा दाह शांत करणार्‍या आत्मियतेच्या एकाच दृष्टक्षेपाची किंमत कुबेराच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे.
बुध्दी हे आत्मदर्शनाचे महाद्वार आहे. बुध्दी उडाली की आत आत्मा उघडा आहे.
क्रोधामुळे प्राप्तीचा, मानामुळे विनयाचा, मायेमुळे मित्राचा व मोहामुळे सर्वांचा नाश होतो.
समाजाचा कौल हा पुष्कळ वेळा भाषणापेक्षा मौन व्रतानेच अधिक प्रभावीप्रमाणे व्यक्त केला जातो.
सतर्कतेने संधीची वाट पाहाणे, साहसाने आणि कौशल्याने संधी प्राप्त करणे, शक्ती आणि दृढतापूर्वक संधीचा फायदा घेऊन कार्य यशस्वी करणे, हेच मनुष्याला यशस्वी करणारे गुण !
परमेश्वराने आपणास दोन कान व एक तोंड दिले आहे. त्याचप्रमाणे आपण त्यांचा उपयोग केला पाहिजे.
वाचनाने मनुष्याला आकार येतो, सभेमुळे तो प्रसंगावधानी, तत्पर होतो आणि लिखाणामुळे तो सर्वांगीण होतो.
विचार हेतूकडे नेतो. हेतू कृतीकडे. कृतीमुळे सवय लागते. सवयीमुळे स्वभाव बनतो व स्वभावामुळे साध्य प्राप्त होते.
सद्गुणांसाठी दुसर्‍याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वत:वर नजर ठेवा.
सत्यामुळे असत्य, प्रेमामुळे राग व आत्मत्यागाने जुलूम नाहीसा होतो, हा अविनाशी नियम सर्वांना लागू आहे.
जन्मामुळे नव्हे तर केवळ सद्गुणांमुळेच आपण थोर बनतो. थोर कृती हीच थोर मनाची साक्षीदार आहे.
सुखापेक्षा दु:खामुळेच दोन हृदये अधिक जवळ येतात. समदु:ख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.
Hits: 989
X

Right Click

No right click