आत्मनिर्भर भारतासाठी स्वातंत्र्यलढ्यासारखेच समर्पण आवश्यक

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

 कोरोनाच्या विश्वव्यापी संकटात सारे देश होरपळून निघाले आहेत. भारताची अर्थव्यवस्था ढासळली असून बेरोजगारीचे मोठे संकट देशापुढे उङे ठाकले आहे. अशावेळी प्रगत राष्ट्रातील मोठ्या धनाढ्य कंपन्यांची नजर भारतातील प्रचंड ग्राहक संख्येकडे आकर्षित झाली असून त्यांनी आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे.

शासनासही नाईलाजाने का होईना अशा गुंतवणुकीचे स्वागत करावे लागत आहे. स्वदेशीचा अट्टाहास मागे पडला आहे. परकीय गुंतवणुकीमुळे येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळत असली तरी त्यामार्गाने येथील पैसाही बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा होतो हे लक्षात घेतले पाहिजे.

 गुगल, मायक्रोसॉफ्ट, झूम, आयबीएम, इंटेल यासारख्या कंपन्यांनी ऑनलाईन सुविधांद्वारे आपल्या शिक्षण क्षेत्राचा ताबा घेतला असून आता परकीय विद्यापीठांनाही भारतात प्रवेश देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. वस्तुतः परदेशातील विद्यापिठात शिकविणारे आणि शिकणारे बहुतेक दोन्हीही भारत व चीनमधलेच असतात.   आंतरराष्ट्रीय मान्यतेच्या अशा संस्था भारतात आल्या तर येथील संस्थांना त्याची झळ पोहोचणारच आहे.

भारतात आयटी क्षेत्राने आत्तापर्यंत परकीय  चलन मिळवून दिले असले तरी  येथील बौद्धिक संपदा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विकासासाठीच वापरली गेली आणि भारतीय उद्योगांसाठी त्याचा लाभ झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. 


भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. नवयुवकांना इंग्रजी येत असले तरी बहुतेक सर्वसामान्य जनता आपल्या स्थानिक भाषेतच सर्व व्यवहार करतात. त्यांच्यापर्यंत माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी आपण काहीच प्रयत्न केले नाहीत. साहजिकच इंग्रजीचा वरचष्मा आयटी क्षेत्रावर अबाधित राहिला. पर्यायाने शासनदरबारी, शिक्षण क्षेत्रात आणि उच्च तंत्रज्ञानात इंग्रजीस पर्याय राहिला नाही. याचा मुख्य फायदा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी घेतला. मोठ्या पगाराचे आमिष दाखवून बुद्धीमान तरुणांना आपल्या सैन्यात समाविष्ट करून घेतले आणि भारतात सर्व क्षेत्रात आपली पकड मजबूत केली.

अशा मोठ्या कंपनीत मानाची व आर्थिक लाभाची नोकरी मिळविणे हेच आता येथील तरुणांपुढे एकमेव ध्येय बनले आहे. आयटी तंत्रज्ञानात, मुख्यत्वे आयओटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात  झालेल्या  प्रगतीमुळे, अशा नोक-या मिळण्याच्या संधीही दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहेत. याचवेळी बेरोजगारीत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या ऑनलाईन जाहिराती व वितरण व्यवस्थेमार्फत देशातील सर्व व्यापार हळूहळू आपल्या हातात घेण्याची शक्यता आहे. भारतीय बॅंका अशा कंपन्यांना हवे तेवढे कर्ज देण्यास पुढे येतात. मात्र छोट्या उद्योगांना कर्ज देताना टाळाटाळ करतात. कर्ज काढून उद्योग नव्याने उभा करणे भारतात अतिशय अवघड गोष्ट आहे कारण येथील व्याजदर १० ते १५ टक्के एवढे जास्त आहेत. उद्योगाला होणारा फायदा क्वचितच १५ टक्क्यांपेक्षा जास्त असतो.   हे असेच चालू राहिले तर छोटे उद्योग बंद पडून देश या कंपन्यांच्या आर्थिक गुलामगिरीत लोटला जाईल अशी भीती वाटते.

शासनाने उद्योगवाढीसाठी अनेक योजना आखल्या असल्या तरी त्याचा फायदा फक्त अगदी थोडे आर्थिक दृष्ट्या सधन वर्गातील तरूण घेऊ शकतात. त्यांनाही अनुभव नसल्याने ब-याच अडचणींना तोंड द्यावे लागते. आपल्या समाजात उद्योजकाकडे बघण्याची दृष्टीदेखील  संशयी असते. शासकीय अधिका-यांची मदत न होता त्यांनाच खूष करावे लागते.

बेरोजगारी जर अशीच वाढत गेली तर त्याची परिणती लुटालूट व हिंसक दंगलीत होऊ शकते. राजकीय पक्ष आपल्या फायद्यासाठी अशा दंगलींना मदत करण्याच्याही घटना घडतात. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि गुन्ह्यांचे प्रमाण वाढते.

यावर उपाय म्हणजे सधन, ज्येष्ठ आणि पेन्शन मिळणा-या  निवृत्त व्यक्तींनी बेरोजगार युवकांना हाताशी धरून छोटा उद्योग सुरू करणे. त्यात त्यांच्या अनुभवाचा व आर्थिक मदतीचा फायदा नवतरुणांना मिळेल. त्यांनी तयार केलेल्या वस्तू वा देऊ करीत असलेल्या सेवांना ग्राहक मिळणेही सोपे जाईल. आणि एक छोटा नवा उद्योग जन्माला येईल. नवीन रोपाला किंवा नवजात बालकाला ज्याप्रमाणे आधाराची व मायेची घरज असते त्याप्रमाणे उद्योगालाही या वृद्ध अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन आणि अर्थ साहाय्य मिळाले तर  नवी अर्थक्रांती होईल व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल.

निवृत्त व्यक्ती आपले पैसे बॅंकेत, फिक्स्ड डिपॉझिट वा शेअरमध्ये गुंतवतो. सध्याची आर्थिक परिस्थिती पहाता यातही मोठा तोटा होण्याची वा पैपे बुडण्याची भीती राहते. यापेक्षा आपल्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या जोरावर नवयुवकाला मदत केली तर फायद्याची अधिक शक्यता आहे. शिवाय आजारीपणात मदत, मान आणि अपल्या अनुभवाचा कोणाला तरी फायदा झाल्याचे समाधान यांचाही लाभ होतो.

ज्ञानदीप फौंडेशन  अशा नवउद्योगांच्या स्थापनेसाठी व त्यांच्या निकोप वाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्यास  तयार आहे.  ज्ञानदीप फौंडेशनच्या छत्राखाली असा उद्योग सुरू झाल्यास त्यांना लागणारे मार्गदर्शन, डिजिटल माध्यमातून जाहिरात तसेच वस्तू वितरण प्रणाली वा ग्राहकांशी संपर्क साधण्याचे काम ज्ञानदीपमार्फत केले जाईल. उद्योग स्वतःच्या पायावर उभा राहिला की ज्ञानदीपपासून तो विभक्त होऊन त्याला स्वतंत्रपणे कार्य करता येईल.

२२ ऑगस्ट हा माझ्या पत्नीचा स्मृतीदिन आहे. या वर्षाची गणेश चतुर्थीही त्याच  दिवशी आहे.  या दिवसाचे हे महत्व जाणून मी आमच्या ज्ञानदीपच्या कर्मचा-यांना नवउद्योजक बनविण्याचा प्रारंभ करणार आहे. यापुढे ज्ञानदीपचे  काम याच नवउद्योजकांकडून केले जाईल.

आपणही निदान एका बेरोजगार य़ुवकाला  उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि आर्थिक साहाय्य द्यावे व उद्याच्या समृद्ध आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे असे मला वाटते.
- सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.


Hits: 120
X

Right Click

No right click