विज्ञानवादी सावरकर

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे
सांगलीत २५ ऑगस्ट २०१३ रोजी निवृत्त अभियंता मंडळाच्या सांगली, कोल्हापूर व सातारा या संघटनांचे संयुक्त संमेलन झाले. त्यात एड्व्होकेट बाळासाहेब देशपांडे यांचे सावरकरांच्या कविता या विषयावर व्याख्यान ठेवले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविण्याची मला संधी मिळाली. सावरकरांविषयी मला हिंदु धर्माचे पुरस्कर्ते व स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाची वा कुटुंबाची तमा न बाळगता संघर्ष करणारे नेते यापलिकडे फारशी माहिती नव्हती.

बाळासाहेब देशपांडे यांनी सावरकरांच्या  काव्यरचनेचा प्रवास सांगताना त्यांचा सारा जीवनपटच उलगडून दाखविला व त्यांच्या  अलौकिक काव्यप्रतिभेचा प्रत्यय सर्व श्रोत्यांपर्यंत पोचविला. माझ्या भाषणात मी असे सुचविले की सावरकरांच्या या पैलूबरोबर त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन व धर्मसुधारणाविषयक कार्याचीही माहिती लोकांपर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे. कारण सावरकरांना अभिप्रेत असणारा हिंदू धर्म, सध्याच्या  जनमानसात हिंदू धर्माविषयी असणार्‍या कल्पनेहून फार भिन्न व उच्च दर्जाचा होता.

प्रस्तुत भाषणामुळे सावरकरांच्या सर्व कविता वाचण्याची मला हुरहुर लागली होती. इंटरनेटवर शोध घेताना बुकगंगा या संकेतस्थळावर सावरकरांच्या कविता हे पुस्तक मोफत वाचायला उपलब्ध आहे हेपाहून मला आनंद झाला हे पुस्तक डाऊनलोड करतानाच अंधश्रद्धा निर्मूलन भाग १ व भाग २ ही पुस्तके संकेतस्थळावर दिसली. डॉ. नरेंद्र दाभॊळकरांचा विषय ताजा असल्याने मी ती लगेच डाऊनलोड केली. मात्र ही पुस्तके सावरकरांनी लिहिली आहेत हे मला माहीत नव्हते. या कथा वाचल्यावर सावरकर यांच्या अंधश्रद्धांवर त्यांनी किती कठोर टीका केली आहे हे लक्षात आले. अधिक माहिती मिळण्यासाठी विज्ञान व सावरकर हे शब्द टाकून इंटरनेटवर शोध घेतला तेव्हा विकिपिडियामध्ये सावरकरांच्या  सावरकरांचा  वैज्ञानिक दृष्टीकोन आणि हिंदु धर्मातील  चुकीच्या रूढी व जातीधर्मातील विषमता यांच्या विरुद्धही त्यानी कसे उघडपणे बंड पुकारले होते याची माहिती मिळाली. त्यात असणारी काही  माहिती खाली देत आहे.

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली.आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयातील जातीयतेवरपण निर्भीड टिका केली.

त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.

जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.

सावरकरांनी चालवलेल्या जात्युच्छेदन चळवळीने अस्वस्थ झालेल्या ब्राह्मणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला. सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले.

पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी या धार्मिक कार्यक्रमांना भटांना बोलावणे बंद करून 'भटशाही' संपवावी असे मत मांडले.त्यासोबतच काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्यांची विकेट घेतली.

वरील सर्व माहिती वाचल्यावर ही माहिती सध्याच्या हिंदू संघटना लोकांपर्यंत का नेत नाहीत असा मला प्रश्न पडला आहे.जर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्याची खरी माहिती समाजातील खालच्या थरातील सर्व लोकांपर्यंत पोचली तर हिंदुत्वाचा व्यापक दृष्टीकोन समजून जातीपातींचे राजकारण करणा-या व चिनी समाजवादाची भलावण करणा-या पक्षांपेक्षा भारत देशावर व त्यातील सर्व समाजाला  हिंदू मानणा-या पक्षालाच जनता आपलेसे करील.
Hits: 466
X

Right Click

No right click