अभ्यास कसा करावा ?

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे
सध्या कोरोनाच्या सुट्टीमुळे आणि टीव्हीच्या करमणुकीमुळे मुलांचे अभ्यासाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्याला पालकही तितकेच जबाबदार आहेत. मी पूर्वी लिहिलेला एक लेख खाली देत आहे. त्यात भर घालण्यासाठी आता माझ्याकडे अनेक नवे मुद्दे मिळाले आहेत. त्यापैकी स्वयंशिस्त आणि स्वतःसाठी आचारसंहिता आखणे आणि दररोज आठ तासांचे बंधन घालणे  हे मला विशेष महत्वाचे वाटतात. त्याबद्दलही पुढेमागे लिहीनच.


अभ्यास कसा करावा?

लाख मोलाचा प्रश्न. अभ्यास कसा करावा या विषयावर अनेक पुस्तके असली तरी हा प्रश्न अजूनही विद्यार्थी व पालक नेहमी विचारतात.



परवाच माझ्या अमेरिकेत असणार्‍या नातवाने मला हाच प्रश्न विचारला. नेहमीच्या पद्धतीने मी त्याला उत्त्तर दिले की रोज नियमितपणे वाचन, लेखन व चित्र काढणे या तिन्ही गोष्टींचा वापर करून विषय समजाऊन घे.


हे सांगणे फार सोपे आहे पण आचरणात आणणे किती कठीण आहे हे मला स्वानुभवाने माहीत होते. आपण कसा अभ्यास करू शकलो याची माहिती दिली तर ते अधिक उपयुक्त ठरेल असे मला वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.

लहानपणी मला आईने नव्या पाटीवर माझा हात धरून अक्षरे गिरवायला शिकवल्याचे माझ्या चांगले लक्षात आहे. बालपणीचे सर्व शिक्षण मी तिच्याशेजारी बसून घेतले. त्यानंतरच्या अभ्यासाच्या बाबतीतल्या सगळ्या आठवणी आहेत त्या वडिलांनी मला शिकविल्याच्या.

माझ्या वडिलांना सर्वजण ’तात्या’ म्हणत. त्यांना स्वतःला अभ्यासाची फार आवड होती. स्वतः तीन तीन नोकर्‍या करीत असूनही ते माझ्या अभ्यासासाठी आवर्जून वेळ काढत. माझ्या शेजारी बसून पुस्तक वाचून दाखवीत. निबंध लिहायला मदत करत. दर शनिवारी आमची चाचणी परीक्षा असे त्यासाठी कोर्‍या कागदांचा आडवा पेपर दोर्‍याने शिवून ते तयार करीत. माझे नाव, इयत्ता, शाळेचे नाव आपल्या सुवाच्च अक्षरात ते लिहून देत. सर्व पुस्तकांना ब्राउन पेपरची कव्हर घालून नाव घालणे हे त्यांचे आवडीचे काम असे.त्यांनी कधीही मला अभ्यास कर असे सांगितल्याचे मला आठवत नाही. ते स्वतःच लहान मुलाच्या उत्साहाने माझ्या सोबत जणु स्वतःच्याच अभ्यासास बसत. अभ्यास करण्यात आनंद कसा मिळतो हे त्यांनी मला कृतीतून दाखवून दिले.

शाळेत विषय शिकवला जाण्याअगोदरच तात्या मला त्या विषयाची ओळख करून देत.त्यासाठी ते स्वतः पुस्तकातील धडे मला मोठ्याने वाचून दाखवत. मग मलाही त्यात काय लिहिले आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता वाटे व मला काय नवे कळले हे त्यांना सांगावेसे मला वाटू लागे. निबंध स्पर्धा असो वा वक्तृत्व स्पर्धा असो. ते मला त्यात भाग घ्यायला सांगत व माझ्याकडून त्याची तयारी करून घेत. मला अभ्यासाची गोडी लावली ती त्यानीच.

म्हणजे अभ्यासास महत्वाची गरज म्हणजे त्याची आवड निर्माण करण्याची. आजकाल मुलांसाठी त्यांचे आईवडील असा वेळ काढू शकत नाहीत व त्यामुळे मुलांत अभ्यासाची आवडच निर्माण होत नाही असे मला वाटते. यासाठी आई वा वडील यांनी मुलाशेजारी शेजारी बसून शिक्षकाच्या भूमिकेतून नव्हे तर मित्राच्या भूमिकेतून अभ्यासाची त्याला गोडी लावावयास हवी.

अभ्यास हा नेहमीच आनंददायी असतो. कोणतीही नवी गोष्ट आपल्याला आवडते, नवी वस्तू हवीशी वाटते, नवी माहिती कळली की आनंद होतो. अभ्यास केल्यानंतरही असाच आनंद आपल्याला मिळतो याची जाणीव पालकांनी आपल्या उदाहरणातून मुलांना करून द्यावयास हवी.म्हणजे अभ्यासाचा मुले कंटाळा करणार नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्धा. इतर मुलांशी स्पर्धा करून आपण सर्वांच्या पुढे जाण्याची ईर्षा व जिद्द मुलांच्यात निर्माण करणे अतिशय आवश्यक आहे. मात्र यश नाही मिळाले तरी निराश न होता अधिक जोमाने अभ्यास करण्याची गरज त्यांना वाटली पाहिजे. काहीवेळा आपला नंबर खाली गेला वा आपण नापास झालो की मुले हाय खातात. अशावेळी दाबलेली स्प्रिंग जशी संधी मिळताच वर उसळी घेते त्याप्रमाणे ईर्षा व नवी जिद्द मुलांत निर्माण व्हावयास हवी.

मी अभ्यासाची डायरी लिहीत असे. हीहि सवय मला तात्यांनीच लावली. एकूण विषय व अभ्यासाची गरज पाहून आठवड्यातील उपलब्ध वेळाचे कोष्टक मी करीत असे. आपल्याला आवडणारे विषयच आपण जास्त वेळ करतो व अवघड व न समजणार्‍या विषयांना टाळण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात आल्याने मी निग्रहाने पसंतीचा क्रम बदलण्यास सुरुवात केली. सर्व विषय झाले नाहीत तरी चालेल पण मला हा अवघड भाग समजलाच पाहिजे अशा जिद्दीने मी तो प्रथम अभ्यासास घेई.

नुसते वाचून पुष्कळ वेळा काहीच बोध होत नाही अशा वेळी मागचे संदर्भ पुनः वाचणे उपयोगी ठरू शकते. वाचताना आपले लक्ष वा मनातील विचार दुसरीकडे जाण्याची फार शक्यता असते. यासाठी मोठ्याने वाचणे, मनन करून पुस्तक न पाहता कागदावर मुद्दे लिहिणे, आकृत्या काढणे व आपल्य़ाला समजलेले दुसर्‍याला सांगण्याचा प्रयत्न करणे फार फायदेशीर ठरते.

एखाद्या गणिती सूत्राचा आपल्याला बोध होत नसेल तर त्याचे पृथ्थ्करण करून त्यातील प्रत्येक पदाचा सूत्रात काय संबंध आहे हे शोधावयास हवे. कोणत्याही अवघड वाटणार्‍या सूत्रात वा परिच्छेदातील काही कठीण संज्ञा वा दुर्बोध शब्द यामुळे आपल्याला काहीच समजू शकत नाही अशी आपली भावना होते. उदा. संस्कृत लेखनातील संधी व समास, वा गणितातील काही क्रियादर्शक चिन्हे. यांचा नीट उलगडा आधी केला की सर्व भाग आपल्याला समजू शकतो.

दोर्‍याचा गुंता सोडविताना ज्याप्रमाणे आपण हलक्या हाताने निरगाठी उसविण्याचा प्रयत्न करतो तसाच प्रयत्न अवघड भाग समजावून घेण्यासाठी करावा लागतो.

आजकाल पुस्तकांपेक्षा गाईडचे प्रस्थ फार वाढले आहे. पण यात उत्तराचा नेमका भागच दिल्याने संदर्भ नसल्याने अशी उत्तरे आपण होऊन लक्षात रहात नाहीत. शिवाय जरा प्रश्नाचा रोख बदलला की ते उत्तर उपयोगी पडत नाही.फळ खाण्यातील आनंद रस पिऊन होत नाही त्याप्रमाणे मूळ पुस्तक वाचल्याशिवाय खरा अर्थ समजत नाही.

एका विषयासाठी अनेक लेखकांची पुस्तके व गाईडे मुले जमा करतात. पण प्रत्येक पुस्तकातील लिखाणाची पद्धत वेगळी असल्याने विषयाचा संपूर्ण आवाका एकसंधपणे आपल्या लक्षात राहू शकत नाही. यासाठी शक्यतो एकच पुस्तक मुख्य अभ्यासासाठी वापरावे व इतर पुस्तकातील वेगळी माहिती वहीत लिहून ठेवावी म्हणजे ते पुस्तक पुनः हाताळावे लागत नाही.

इंटरनॆटवर सध्या सर्व विषयांवर इत्थंभूत माहिती विविध प्रकारे दिलेली असते. मात्र बर्‍याच वेळा आपण त्या माहितीच्या जंजाळात आपल्याला नक्की काय हवे होते हे विसरून जातो. व भलत्याच माहितीचा वा चित्रविचित्र जाहिरातींचा आस्वाद घेण्यात आपण कधी गुंगून जातो. हे आपल्याला कळत नाही. यासाठी अनावश्यक माहिती पाहणे कटाक्षाने टाळायला हवे.

आपला वेळ मौल्यवान आहे व त्याचा आपण काटकसरीने व सुयोग्यपणे वापर करावयाची गरज आहे हे एकदा लक्षात आले की आपण होऊनच मग आपण फालतु गप्पा, टीव्हीवरील करमणुकीचे कार्यक्रम पाहण्याचे टाळतो व तो वेळ आपल्या ध्येयसिद्धीसाठी वापरण्यास तयार होतो. माझ्या आवडीच्या बुद्धिबळ, अवांतर वाचन या छंदांना मी अभ्यासाच्या आड येऊ दिले नाही.

जगात अवघड असे काहीही नाही. मला प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट समजू शकेल असा विश्वास आपण मनाशी बाळगायला हवा. अभ्यासाची गोडी व हा विश्वास असला की अभ्यास हा नकोसा वाटणार विषय न ठरता तो करमणुकीचा सर्वात महत्वाचा पर्याय होऊ शकतो.
Hits: 212
X

Right Click

No right click