सासू-सून संबंध
पालक-मुले, शिक्षक-विद्यार्थी, मालक-नोकर, भाऊ-बहीण, सासू-सून, मित्र-मैत्रिणी अशा नात्यात अनेक कंगोरे असतात. वेगवेगळे पदर असतात. अनेक दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघता येते. पण त्यातल्या त्यात सासू-सून हे नाते फार नाजूक असते असे मला वाटते. गरीब, श्रीमंत, देश, परदेश अशी कोणतीही परिस्थिती असली तरी या नात्याची गुंतागुंत, नुसती नव्हे तर विलक्षण गुंतागुंत ही सगळीकडे सारखीच असते.
मुलगी जेव्हा लग्न होऊन दुसर्या घरात सून म्हणून जाणार असते तेव्हा तिच्या दृष्टीने तिच्या आयुष्यात होणारा फार मोठा बदल असतो. आजपर्यंतचे आपले हक्काचे माहेरचे घर सोडून दुसर्याच्या घरी कायमचे राहायला जायचे असते. त्या नवीन घरात त्या माणसांना ‘आपले’ म्हणायचे असते. नाही म्हटले तरी ही गोष्ट थोडीशी अवघडच असते. अर्थात यात ‘तडजोड’ या कल्पनेला फार मोठे महत्वाचे स्थान असते. ती दोन्ही बाजूंनी असावी लागते. सध्या आपण सुनेच्या बाजूने विचार करू. सासरच्या घरचे रीतिरिवाज, खाणे-पिणे, बोलणे-चालणे अशा प्रत्येक गोष्टीत माहेरच्या घरापेक्षा वेगळेपणा असतो. पण एकदा का तो ‘स्वीकारायचा’ असे ठरविले की मग ‘आमच्या आईकडे असे नसते’, ‘मला नाही बाई हे आवडत’ इत्यादी गोष्टींना पूर्ण फाटा द्यावा लागतो. उलट असे म्हाणण्यापेक्षा प्रत्येक गोष्टच ‘वा छान चव आली आहे हं!’, ‘मला फार आवडले हे’ असे म्हणावे. मुख्य म्हणजे ‘कंटाळा’ हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकावा. कोणतेही काम आनंदाने करायची तयारी असावी.
सहज माझा अनुभव म्हणून सांगते - कौतुक म्हणून नव्हे हं! आमच्या सासूबाईंना वाटायचे, ‘अगोबाई! ही पुण्याची मुलगी! कशी असेल कोण जाणे!’ लग्नाच्या दुसर्या दिवसापासून माझी शाळेतली शिक्षिकेची नोकरी सुरू झाली. पगार किती हा प्रश्न नव्हता. पण दर महिन्याला घरातील प्रत्येकाला काही ना काही लहान-मोठी वस्तू मी आणत असे. त्यावेळी आमच्या सासूबाई काठापदराच्या नऊवारी साड्या नेसत. वायलच्या साड्य़ांची फारशी पद्धत नव्हती. मी पहिलीच साडी - अन् तीही वायलची आणली त्यांना! मला वाटले, ‘आवडेल का नाही कोण जाणे?’ पण झाले वेगळेच! केवढे अप्रूप वाटले त्यांना त्या साडीचे! ‘अगोबाई, ही साडी नेसायची का मी?’ असे म्हणत त्या नेसल्या आणि अगदी आवडीने, आनंदाने शेजारपाजारच्या मैत्रिणींनाही ‘सूनबाईंनी आणलेली नवी साडी’ कौतुकाने दाखवूनही झाली.
खरं सांगायचं तर माझं नशीब अगदी जोरावरच म्हटले पाहिजे. कारण आमच्या सासूबाई अतिशय चांगल्या म्हणजे ‘लाखात एक’ अशाच होत्या. सदैव हसतमुख, अत्यंत समाधानी, सतत दुसर्याच्या भल्याचा विचार करणार्या अशा होत्या. त्यांना स्वतःला मुलगी नव्हती. तेव्हा सून हीच मुलगी समजून वागल्या त्या माझ्याशी. आम्ही चार घरच्या चार सुना. पण कधी हिचं तिला नाही की तिचं हिला नाही. रुसवा नाही की फुगवा नाही. त्यांच्या हाताला फार गोडी होती. मग ती साधी कांद्याची आमटी - भाकरी असो वा पुरणपोळी असो. कोणताही पदार्थ अत्यंत चवदार, रुचकर करण्यात त्यांचा हातखंडा असे. जीव ओतून काम करायची त्यांची पद्धत ही आम्हाला बरंच काही शिकवून गेली.
सासू व सून ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. आजची सासू ही कालची सून असते व आजची सून ही उद्याची सासू होणार असते. ही जाणीव जर प्रत्येकीने ठेवली तर हे सासू-सुनेचे नाते मखमली व्हायला मुळीच वेळ लागणार नाही असे मला वाटते.
Hits: 391