प्रामाणिकपणाचे फळ
रात्रीचे दहा-साडेदहा झाले असावेत. दारात रिक्षा येऊन थांबल्याचा आवाज ऎकल्यावर माझ्या मनात आले, ‘कोण बाई आलं आत्ता?’ बाहेर जाऊन बघते तर काय! माझी बालमैत्रीण कुसूम व तिचे व तिचे यजमान वसंतराव. या अनपेक्षित भेटीमुळे आम्हा दोघींना इतका आनंद झाला की घरात येऊन चहापाणी, गप्पाटप्पा करण्यात अर्धा तास कसा निघून गेला ते कळलेही नाही. तेवढ्यात पुन्हा दारासमोर रिक्षा थांबून दारावरची बेल वाजली ‘डिंग-डॉंग’. ‘कोण बरे असेल?’ असे म्हणत मी दार उघडले तर तोच रिक्षावाला दारात हजर. हातातली लहानशी बॅग पुढे करत तो म्हणाला,‘ मगाशी मी तुमच्याकडे या रिक्षातून पाहुण्यांना आणून सोडले. त्यांची ही बॅग रिक्षातच विसरली होती. ती द्यायला आलो आहे.’ आम्ही सर्वजण बघतच राहिलो. वसंतरावांनी पुढे होऊन ती बॅग घेतली उघडून बघितले तर आतील महत्वाची कागदपत्रे व पैसे वगैरे सर्व काही सहीसलामत होते. रिक्षावाल्याला कपभर चहा देऊन त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल बक्षिसही दिले. आणि दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रात त्याच्या प्रामाणिकपणाची बातमी पण दिली.
रिक्षातून उतरण्याच्या नादात वसंतराव रिक्षातच बॅग विसरले होते हे खरेच. नंतरही घरात आल्यावर त्यांच्या हे ध्यानात आले नाही. आणि समजा आठवलेच असते तरी त्या रिक्षावाल्याला शोधून काढणार तरी कसे? शिवाय त्या रिक्षावाल्याला जर मोह झालाच असता तर त्याला अचानक भरपूर धनलाभ झाला असता. पण तो मोह टाळून ज्या प्रामाणिकपणे त्याने ती बॅग परत केली त्याला काही तोडच नाही.
‘दुसर्याचे काही घेऊ नये, चोरी कधी करु नये
पाहिले ते मागू नये, कोणासंगे भांडू नये’
अशा सुसंस्कारांचे धडे त्या रिक्षावाल्याला लहानपणी मिळाले असल्याने त्याच्या हातून एवढे सत्कृत्य घडले. अन्यथा दुसरा एखादा माणूस बॅग घेऊन पसार झाल असता. आणि परत करायला तर मुळीच आला नसता.
लहानपणापासूनच मुलांच्या मनावर सद्गुणांची महती जर बिंबवली गेली तर मोठेपणी त्यांच्या हातून चोरी, दरोडे, अतिरेकीपणा असल्या गोष्टी होणार नाहीत. चोर, दरोडेखोर, लुटारू बनण्य़ाऎवजी ते सुसंस्कृत, सुजाण नागरीक बनतील. लबाडीने, अप्रामाणिकपणा करुन खोटेपणा करुन मिळवलेले धन हे कायमचे समाधान मिळवून देऊ शकत नाही. याउलट खोटेपणामुळे आपल्या पापाच्या घड्यात सदैव भरच पडते. तेव्हा आपण पुण्यसंचय करायचा का पापाचा घडा भरायचा हे आपणच ठरवायचे.
Hits: 462