निष्कलंक चारित्र्याचे असामान्य पर्यावरण तंत्रज्ञ - डॉ. जी. डी. अग्रवाल भाग -३

Parent Category: मराठी साहित्य Category: पर्यावरण Written by सौ. शुभांगी रानडे

कानपूर वाटर वर्क्समध्ये आगरवाल आले की आपली प्रोफेसरशिप विसरून खुलेपणाने कामगारांशीही चर्चा करत. त्यांच्या अडचणी समजावून घेत. माझ्या कामाबद्दलही सूचना देत. रॅपिड सॅंडफिल्टरचा ( जलद गतीची वाळू गाळण टाकी ) एक हिस्सा रिकामा करून खालचे पाईप मोठे घालणे. बाजूच्या भिंतीत एक उभी खिडकी करून परस्पेक्स शीट बसवून नमुने घेण्यासाठी व हेडलॉस मोजण्यासाठी प्लॅस्टिकच्या नळ्या घालणे. ग्रॅव्हल, वाळू व कोळशाचे थर घालून ते धुवून घेणे  वेगवेगळ्या पद्धतीने फित्टर चालवून नोंदी व नमुने घेणे यात माझे अनेक दिवस गेले.  दिवसाचा वेळ माझा कानपूर वाटर वर्क्समध्ये  गेला तरी  रात्री मी आयआयटीच्या लॅबमध्ये काम करत असे. तेथे दोन ४इंची व्यासाचे पण ८फूट उंचीचे फिल्टर करून त्यात पाण्याचा गढूळपणा व प्रवाह यात नियंत्रित पद्धतीने बदल करीत रॅपिड सॅंड व ड्युएल मिडिया फिल्टरचा ( वाळूत गाळ पृष्ठभागावर गाळ न अडकता खोलवर जाण्यासाठी मोठ्या आकाराच्या कोळशाचा थर असणारी द्विथर गाळण टाकी)  तुलनात्मक अभ्यासही करावा लागला.   

डॉ. आगरवालना कॉम्प्युटर आवडत नसला तरी त्यांचे वागणे त्यावेळच्या ऑन ऑफ किंवा ०,  १ सारखे रोखठोक असे. फझी लॉजिकसारखे अधलेमधले, गुळमुणित वागणे त्यांना ठाऊक नव्हते. त्यांची मते कणखर असत. बक्षिस किंवा शिक्षा या दोनच गोषटी माणसात बदल घडवू शकतात. असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे शिक्षा करायला ते कचरत नसत. बक्षिस देताना मात्र बक्षिसाने शेफारून जाऊ नये म्हणून असेल कदाचित पण विद्यार्थ्याला प्रत्यक्ष काही न देता इतरांकडे त्याच्या हुषारीचे वा कामाचे कौतुक ते करत असत.    मी पक्का बनिया आहे असे ते म्हणायचे पण त्यांची बनियेगिरी आपल्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी असायची.

त्यांची उत्तरप्रदेश जलनिगममधील इंजिनिअरांशी चांगली ओळख होती. दिल्ली आयआयटीतील आरसी सिंग आणि अमेरिकेतील पाणीपुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञ हडसन यांना त्यानी माझा ड्युएल मिडीया फिल्टर पहाण्यासाठी मुद्दाम निमंत्रित केले होते. हडसन यांचे कार्यसत्र जलनिगमच्या अधिका-यांसाठी घेण्यात आले त्यावेळी जलशुद्धीकरणाच्या यंत्रणेत कमी खर्चाच्या पण प्रभावी सुधारणा कशा करता येतील याचे मार्गदर्शन केले. 

कलकत्त्यात भरलेल्या इन्स्टिट्यूशन ऑफ पब्लीक हेल्थ इंजिनिअरिंगच्या पहिल्या अधिवेशनासाठी मी, मिश्रा व आगरवाल यांचा पेपर  पाठवताना माझे नाव पहिले घालण्याचा त्यांनी मिश्रांकडे आग्रह धरला. आम्ही सर्व आमच्या कुटुंबांसह  रेल्वेने कलकत्याला गेलो. कार्यक्रमात  मिश्राना पेपर सादर करायचा होता  यासाठी त्यांनी स्पेशल सूट घातला होता.  माझ्याबरोबर बसून त्यांनी खूप तयारी केली होती. कार्यक्रमावेळी नोट्स घेऊन ते  माझ्या शेजारी बसले होते. सारखे मला काही विचारत होते. आगरवालना जेव्हा ते भाषण देणार हे कळले तेव्हा आयत्यावेळी त्यांना थांबवून त्यांनी मला स्टेजवर जायला सांगितले. ते खट्टू झाले. मला पण त्यांचा विरस झालेला पाहवेना. पण आगरवालांपुढे मला बोलण्याचे धाडस झाले नाही. मुकाट्याने मी उठलो व स्टेजवर गेलो. आमचा विषय नवा असल्याने सर्वांना तो आवडला.   




सुदैवाने मला त्यात पहिले बक्षिस मिळाले व पुढील वर्षी दिल्लीमध्ये पारितोषिक स्वीकारण्यासाठी निमंत्रणही मिळाले. (नंतर अर्थात मिश्रांनाही या संशोधनामुळे दिल्लीच्या वाटरवर्क्समध्ये बढती मिळाली.) त्यादिवशी रात्री एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टीसाठी आम्हाला बोलावले गेले. अशा हॉटेलमध्ये जायची आमची पहिलीच वेळ होती. प्रथम अध्यक्ष डॉ. निलय चौधरी यांनी लाल चोटी पापा तुवा .. हे प्रसिद्ध  बंगाली गाणे हावभावासहित सादर केले. इतरही काही कार्यक्रम होत राहिले. आमच्या पुढे कॉफी आणि बनपाव आले. तेच जेवण समजून आम्ही ते अधाशासारखे खाल्ले. मग बटाटा चिप्स आल्या आम्ही पाहिले की इतर लोक फक्त एखादा तुकडा खात आहेत. ते सेव्हन कोर्सचे जेवण होते. शेवटी जेव्हा मुख्य जेवण आले तेव्हा आमचे पोट आधीच भरले असल्याने खाता आले नाही.

त्यावेळी सांगलीहून कानपूरला जाण्यासाठी दोन वेळा गाडी बदलावी लागे. प्रथम मिरज ते मुंबई, मुंबई ते झाशी आणि झाशी ते कानपूर. त्यापैकी झाशी ते कानपूर मार्ग चंबळच्या खो-यातून जात दरोडेखोरांच्या टोळ्यांमुळे धोकादायक होता.  दोन दिवसांचा हा प्रवास असे. १९७५ मध्ये दिल्लीत होणा-या कार्यक्रमासाठी मी माझ्या आई वडिलांना बोलाविले होते. त्यांचा हा पहिलाच प्रवास होता.  माझा मित्र बरोबर असल्याने त्यांनी यायचे धाडस केले. पम  सर्व काळजी घेऊनही रेल्वेत त्यांची बॅग मागल्या बाजूने फोडून कपडे चोरीस गेले. दिल्लीला मुख्य कार्यक्रमात आगरवाल आणि माझ्या आईवडिलांची ओळख झाली. त्या वेळी आगरवालनी नमस्कार करत माझी स्तुती केल्याने त्यांना धन्य वाटले. केंद्रीय मंत्री करणसिंग यांचे हस्ते बक्षिस स्वीकारताना त्याना पहावयास मिळाले नंतर दिल्ली आग्रा, हरिद्वार, ऋषिकेश, अलाहाबाद, काशी, गया अशी ट्रीपही आम्ही पूर्ण केली. मात्र आगरवाल कामात व्यग्र असल्याने आयआयटीत त्यांची भेट होऊ शकली नाही. नंतर सांगलीतच त्यांची पुन्हा भेट झाली.

आयआयटीतून परतल्यानंतर आगरवाल यांचे मला पोस्ट कार्डवर पत्र येई. त्यांनी कधीही मला फोन केला नाही. ते नेहमी दुस-या वर्गाच्या रेल्वेने प्रवास करीत. कहर म्हणजे रेल्वेच्या टायलेटमध्ये आंघोळही करीत. त्यांना त्याचे काहीच वाटत नसे. सर्वसामान्यांत मिसळून वागताना ते आयआयटीत प्रोफेसर आहेत हे कोणालाही लक्षात यायचे नाही.

सांगलीत येरळा नदीतील वाळूउपसा रोखण्यासाठी डॉ. भारत पाटणकर यांचेबरोबर इपीआरएफमध्ये सेमिनार घेताना ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांचेबरोबर उगार व इतर साखर कारखान्यांना आम्ही भेटी दिल्या होत्या.  अशा भेटीच्या वेळी त्यांची निरीक्षणे आणि मते फार मार्मिक व महत्वाची असायची.

आयआयटी सोडण्यापूर्वी मला त्यांचे पत्र आले. पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातील खंत पत्रात व्यक्त केली. सहकारी प्राध्यापकांनी माझे येथे राहणे अवघड केले आहे असे त्यांनी लिहिले होते. असे अगतिक झालेले पाङून मला फार वाईट वाटले. त्यांनी राजिनामा देऊन दिल्लीस प्रयाण केले. मात्र सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने त्यांना सदस्यसचिवपदासाठी निमंत्रित केल्याने त्यांचे कार्य सुरू राहिले. तेथे प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी कायदा करण्यासाठी आवश्यक आधारभूत ढाचा तयार करण्यात त्यांनी महत्वाचे योगदान दिले. मात्र तेथेही सरकारी लालफितीच्या वेळकाढू कारभाराचा त्याना कंटाळा आला व ते त्यातूनही बाहेर पडले आणि त्यांच्या विद्यार्थ्याने स्थापन केलेल्या एनव्हायरोटेक इन्स्ट्रुमेंटस या कंपनीत डायरेक्टर झाले.


हवाप्रदूषण मोजण्याच्या यंत्रणात त्यांनी  नवे बदल करून परदेशी तोडीची यंत्रणा विकसित केली.

Hits: 187
X

Right Click

No right click