निष्कलंक चारित्र्याचे असामान्य पर्यावरण तंत्रज्ञ - डॉ. जी. डी. अग्रवाल भाग - १

Parent Category: मराठी साहित्य Category: पर्यावरण Written by सौ. शुभांगी रानडे

ऋषीतुल्य जीवन जगलेले माझे गुरू डॉ. जी. डी. अग्रवाल त्यांच्या कडे पीएचडी करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे परमभाग्य समजतो. कारण त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव माझ्या पुढील जीवनात कायम मार्गदर्शक ठरला.

लहानपणापासून अत्यंत हुषार व क्रांतीकारक स्वभावाच्या गुरुदास (त्यांचे नाव) यांनी रुरकी आयआयटीमधून बीटेक केले. पंडीत मदनमोहन मालवीय  यांनी १९०५ मध्ये स्थापन केलेल्या गंगा महासभा आर्यसमाजाचे ते  निष्ठावंत अनुयायी  व मुख्य प्रवर्तक होते.

 नंतर अमेरिकेतील बर्कले युनिव्हर्सिटीमधून एमएस आणि पीएचडी केवळ चार वर्षात पूर्ण करून आयआयटी कानपूर येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तरीही  त्यांचा पोशाख कायम पांढरा कुडता व पायजमा असाच असे. ते ब्रह्मचारी होते आणि घरात एकट्यानेच स्वतः स्वयंपाक करून जेवत. 


१९७१ मध्ये आमच्या कॉलेजमध्ये परिक्षेच्या निमित्ताने आले असताना त्यांनी डॉ. सुब्बाराव करीत असलेले आमचे काम तसेच आमची प्रयोगशाळा पाहिली. त्याचवेळी त्यांनी मला पीएचडीसाठी अर्ज करण्यास सांगितले.

पुढे मी आयआयटीचेन्नईला पीएचडी इंटरव्ह्यूसाठी प्रा भालबा केळकर यांचेबरोबर गेलो असताना त्यानीच माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळी प्रचंड उकाडा असूनही त्यांनी  ते तेथील सेवकाला पंखा लावण्यास मनाई केली. म्हणाले घाम आला की अंग गार होतेच. पंखा आवश्यकच नाही.

मी पीएचडीसाठी आयआयटीमध्ये दाखल झाल्यावर दोनच दिवसात मला त्यांच्या धाडसी व स्पष्टवक्तेपणाचा प्रत्यय आला. आयआयटीचे संचालक डॉ. जगदीशलाल यांनी आम्हा नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना पर्यावरणशास्त्राचे महत्व सांगितले. नंतर आगरवाल उभे राहिले आणि म्हणाले संचालकांनी जे काही सांगितले ते चुकीचे आहे, आम्ही सर्दच झालो. मग त्यांनी पर्यावरणावर आपले विचार मांडले.  

त्यांचे विद्यार्थ्यांबरोबरचे वागणे जुन्या पंतोजीप्रमाणे कडक होते. त्यांची आम्हाला भीती वाटे. त्यांची बुद्धीमत्ता प्रखर होती. हवाप्रदूषण विषय ते भारतातील संदर्भ देऊन अस्खलितपणे शिकवायचे. प्रयोगशाळेत स्वतः प्रयोग करून दाखवायचे. इतर प्राध्यापकांसारखे ते विद्यार्थ्यात अजिबात मिसळत नसत. बाहेरचे पाणी, हवा नमुन्याचे टेस्टींग ते स्वतः करीत.

मी फॅमिलीसह तेथे तीन वर्षे राहिलो तरी ते कधीही माझ्या घरी आले नाहीत. त्यांच्या तत्वात ते बसत नव्हते. इतके तुटक असले तरी आम्हाला त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता. भीती तर होतीच. त्यामुळे त्यांचेकडे जायचे म्हणजे व्यवस्थित तयारी करून जावे लागे. पूर्वपरवानगी न घेता त्यांच्याकडे केव्हाही गेले तरी चालत असे. पीएचडी झाल्यानंतर मात्र ते  अनेक वेळा आपल्या मावशीला घेऊन सांगलीस येत व आमच्या कुटुंबातील सर्वांशी सलोख्याने वागत. माझ्या मुलाबरोबर क्रिकेट खेळत.

मला पहिल्या वर्षी त्यांच्याकडून कडक शिस्तीचीच वागणूक मिळाली. मी पहिल्यांदा माझे थिसिसबद्दल एक प्रपोजल घेऊन गेलो व त्यात पहिल्याच वाक्यात झालेली खाडाखोड पाहून  की ते संतापले व माझे कागद भिरकावून दिले. विचार न करता लिहितोसच कसे असे मला म्हणाले. मी सॉरी म्हणून घाबरून घरी आलो. मला हे सर्व नवीन होते. सांगलीत कॉलेजवर मला डॉ. सुब्बाराव मित्रासारखा मान देत. येथे मात्र माझी जमदग्नीशी गाठ पडली होती. मी पण मग हट्टाला पेटलो.

त्यांनी पाणी शुद्धीकरणावर पीएचडी केली हे माहीत असल्याने मला त्यांच्याकडून त्या विषयात पीएचडी करायची होती कारण सांगलीत त्याची गरज होती.  दरवेळी मी जलशुद्धीकरणावर प्रपोजल नेई. ते सारखे काही ना काही बदल सुचवायचे.  त्यांची अपेक्षा मी सांगलीतील साखर उद्योगातील सांडपाण्याविषयी संशोधन करावे अशी होती. व मला विषय बदलायला सांगायचे. पण मी माझा हेका कायम ठेवला. शेवटी त्यांनी मला त्यांनी रुरकीला प्रा. एस.व्ही. पटवर्धन यांचेकडे पाठविले. प्रा. पटवर्धन यांनी जलशुद्धीकरणावर बरेच संशोधन केले होते. तेथे जाऊन आल्यावर माझे ड्युएल मिडीया फिल्टरचे प्रपोजल त्यांनी मंजूर केले.

 माझ्याशी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांशी अत्यंत कडक वागत असूनही बाहेरच्या लोकांशी बोलताना तो आमची स्तुती करत हे लक्षात आल्यावर आमचा त्यांच्याविषयाचा आदर अधिकच वाढला. ते कधी संतुष्ट न होता अधिक कामाची अपेक्षा ठेवत. त्यांच्यामुळेच मला सतत कामाची सवय लागली. 

Hits: 151
X

Right Click

No right click