शालेय शिक्षण मातृभाषेतूनच घ्या!

Parent Category: ROOT Category: मराठी भाषा Written by सौ. शुभांगी रानडे

संदर्भ -महाराष्ट्र टाईम्स ८-१-१२

' शालेय शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे . त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढते , विषयाची समज येते आणि शिकलेले पूर्णपणे आत्मसात होते . इतकेच नव्हे तर त्याच्या चौकस बुद्धीला व सृजनशीलतेला वाव मिळतो . येणारं युग घोकंपट्टी किंवा पुस्तकी पांडित्याचे नसून सृजनशीलतेचं आहे . तेव्हा इंग्रजी माध्यमातून परीक्षेपुरतं जुजबी ज्ञान मिळवणारे ठोकळे पुढील काळात मागे पडतील . अर्थात इंग्रजी चांगलं बोलता येणं ही काळाची गरज आहे म्हणून प्रत्येकाने इंग्रजी ' बोलायला ' शिकणं आवश्यक आहे . इंग्रजी फाडफाड बोलायला शिका , कारण परप्रांतीय किंवा परदेशीयांशी व्यवहार करताना इंग्रजी आवश्यक आहे , पण शालेय शिक्षण मराठीतून घ्या ,' असे आवाहन नवव्या जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष उद्योगपती अरूण फिरोदिया यांनी विरार येथे केले .

' शोध मराठी मनाचा ' या जागतिक मराठी अकादमीच्या नवव्या जागतिक मराठी संमेलनाचे विरार पश्चिम येथील विवा कॉलेजमध्ये शनिवारी सकाळी उद्घाटन झाले . ' नरवीर नगरी ' तील संमेलनासाठी मोठ्या संख्येने कॉलेज तरूण - तरूणी जमले होते . तरूणांना मार्गदर्शन व्हावे म्हणून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून , त्याला तरूणांनी चांगला प्रतिसाद दिला .

जगभरातील नामवंत मराठीजन उपस्थित होते . स्थानिक खासदार , आमदार तसेच अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आशीष चौघुले , कॅनडाच्या लीना देवधरे , अमेरिकेतील श्रीनिवास ठाणेदार , अध्यक्ष रामदास फुटाणे , कवी फ . मु . शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून व तुतारीच्या निनादात संमेलनाचे उद्घाटन झाले .

' मराठी माणूस , मराठी भाषा आणि मराठी माती ' या विषयावर अरूण फिरोदिया बोलले . मराठी नामवंतांची उदहारणे देत ते म्हणाले की , ' मराठी माणूस नेहमीच भारताचा गुरू आणि नेता राहिला असून , भारताचे नेतृत्व करीत आला आहे . उत्तर व दक्षिण भारताच्या मधोमध चपखल बसलेला हा महाराष्ट्र देश भारताचे नेतृत्व करतो यात नवल ते काय . नव्हे भारताच्या भाग्यविधात्याने तो ' रोल ' महाराष्ट्राला बहाल केला होता की काय असे वाटते . इथली माती आणि इथली माणसंच अशी कर्तृत्ववान होती . पण आजचे चित्र वेगळे आहे . देशातील १० टक्के जनता मराठी माणसाची असली , तरी डॉक्टरेट किंवा पीएचडी मिळविणाऱ्यांत १० टक्के मराठी माणूस आहे का ? आयएएस किंवा आयएफएस या क्षेत्रात १० टक्के जागा मराठी माणूस पटकावतोय का ? इतकेच काय पण एमएनसी किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांत मॅनेजरच्या १० टक्के जागा मराठी माणसाने काबीज केल्या आहेत का , असा सवाल त्यांनी केला . हे चित्र बदलायचे असेल आणि मराठी माणसाला पुन्हा भारताचे नेतृत्व करायचे असेल , तर ' माय मराठी व मराठी माती ' ची कास धरावी लागेल , असे ते म्हणाले .

शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल व तळागाळाचा विकास हे दोन बदल व्हावेत , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . शासकीय अनुदान शालान्त परीक्षेच्या निकालावर अधारित हवे . ज्या शाळेचा निकाल १०० टक्के लागला तिला दुप्पट अनुदान द्या व जिचा निकाल ० टक्के लागला तिला अर्धेच अनुदान द्या . यामुळे सर्व शाळा , शिक्षक शिकविण्याकडे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देतील , असा चांगला परिणाम होऊ शकतो .

महाराष्ट्राचा विकास वेगाने व्हायचा असेल , तर तो ' खालून वर ' झाला पाहिजे . गावोगावी वीज न्या , रस्ते बांधा , जलसंधारणाची कामे करा , शिक्षण व हॉस्पिटलची उत्तम सोय करून द्या . चीनने हेच केल्याने चीन वेगाने प्रगती करू शकला . ग्रामीण भागाचा विकास व्हायला हवा यावर त्यांनी भर दिला . मराठी मातीतून मराठी माणूस घडवून त्याला माय मराठीचा आधार द्या . तो या मराठी मातीचे सोने करील आणि आपले हक्काचे स्थान म्हणजेच भारताचे नेतृत्व करू शकेल , असा विश्वास त्यांनी भाषणाच्या शेवटी व्यक्त केला . उद्घाटनानंतर ' समुद्रापलीकडे भाग १ ' आणि ' देव , धर्म आणि माणूस ' हे दोन लक्षवेधी परिसंवाद झाले .

Hits: 1228
X

Right Click

No right click