गज्‍जर, त्रिभुवनदास कल्याणदास

Parent Category: मराठी उद्योग Category: उद्योजक आणि व्यावसायिक Written by सौ. शुभांगी रानडे

गज्‍जर, त्रिभुवनदास कल्याणदास : (१८६३–१९२०). सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ आणि भारतीय रसायन उद्योगाचे एक आद्य प्रवर्तक. जन्म सुरत येथे. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून रसायनशास्त्राची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कराची व बडोदा येथील महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. बडोद्यात त्यांनी छापकामाची व रंगकामाची प्रयोगशाळा काढली व रंगविद्येवर रंगरहस्य हे त्रैमासिक सुरू केले. बडोदा सरकारने त्यांची योजना स्वीकारून १८९० मध्ये बडोद्यास कलाभवनाची स्थापना केली व तेथे त्यांना प्रमुख नेमले. कलाभवनाचे रूपांतर औद्योगिक विद्यापीठात करण्याचे प्रयत्न यशस्वी न झाल्यामुळे त्यांनी बडोदा सोडले व मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापकपद स्वीकारले. त्यांनी प्लेगवर औषधे शोधून काढले परंतु त्यावर पैसे कमाविण्याचे नाकारले. १८९९ मध्ये मुंबईस त्यांनी एक तांत्रिक प्रयोगशाळाही स्थापिली. काही जातींच्या खऱ्या मोत्यांचे लुप्त तेज त्यांना पुन्हा प्राप्त करून देण्याच्या रासायनिक क्रियेचा शोध लावल्यामुळे गज्‍जर यांना जागतिक कीर्ती मिळाली. हा धंदा सुरू करून त्यातील कमाई त्यांनी रसायनशास्त्राच्या प्रचारार्थ खर्च केली. त्यांच्याच प्रेरणेने व श्रमाने १९०२ मध्ये भारतात प्रथमच बडोद्यास ‘ॲलेम्बिक केमिकल वर्क्स’ हा रसायनांचा कारखाना सुरू झाला. त्यांचेच प्रयत्न भारतातील रसायन उद्योगाच्या वाढीस कारणीभूत ठरले.

धोंगडे, ए. रा.

Hits: 271
X

Right Click

No right click