सांगलीची तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती -इतिहास

Parent Category: मराठी उद्योग Category: उद्योजक आणि व्यावसायिक Written by सौ. शुभांगी रानडे

सांगली हे छोटेसे संस्थान. पटवर्धन हे येथील राजे. पटवर्धन राजेसाहेबांनी संस्थानातील जनतेला सर्वतोपरी सहाय्य केले. संस्थानाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून राजेसाहेबांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. १९०८ साली चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन हे अज्ञान असल्यामुळे इंग्रज सरकारने बर्क या युरोपियन अधिकार्‍या ला प्रशासक म्हणून नियुक्त केले. चिंतामणराव सज्ञान होईपर्यंत त्यांनी संस्थानचा कार्यभार सांभाळला.

बर्कसाहेब प्रशासक असताना राजेसाहेब हे राजवाड्यात रहात असत. त्यावेळी राजवाडयाची कमान नव्हती. सध्याचे जिल्हाधिकारी कार्यालय हे राजेसाहेबांच्या दिवाणांचे कार्यालय म्हणून वापरले जात होते. राजवाड्याची कमान, त्याला लागून असलेली कोर्टाची इमारत व दगडी बांधकामातील इमारती या बर्कसाहेबांच्या कारकीर्दीत झाल्या. त्यावेळी सांगलीमध्ये अभियंते नव्हते. पण कंत्राटी पध्दतीने काम करणारे बाबू शेट्टी वडर हे संस्थानातील मोठे कंत्राटदार होते. त्याचबरोबर नरसिंगराव माळी नावाचे आणखी एक कंत्राटदार काम करीत होते. त्यावेळी त्यांनी बांधलेल्या दगडी इमारती आजही त्याच डौलाने उभ्या आहेत.

या कंत्राटदारांना बांधकामासाठी जे मार्गदर्शन हवे असे, त्याठी राजेसाहेब मुंबईच्या गॅरिसन व बॅटली या दोन युरोपियन अभियंत्यांना बोलावीत असत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजवाड्यासमोरील सांगली बँकेची इमारत कंत्राटदार साने यांनी बांधली. गणपती मंदिराचा सभामंडप मुंबईच्या मराठे, कुलकर्णी या वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली झाला. गणपती मंदिराच्या महाद्वाराच्या डिझाईनसाठी दिल्लीचे प्रसिध्द वास्तुविशारद रानडे यांना बोलावले होते. त्यांचेच मार्गदर्शनाखाली महाद्वाराचे काम झाले.

१९३०-३५ च्या सुमारास श्री. भवरीलाल लड्डा यांनी बालाजी मिल सुरू केली. एक मजूर म्हणून काम करीत असलेल्या श्री. दादासाहेब वेलणकर यांनी त्याच सुमारास गजानन मिल सुरू केली आणि नावारुपास आणली. हजारो कामगारांना काम देणार्‍या या दादासाहेबांना लोक धनी वेलणकर या नांवाने संबोधू लागले.

१९१४ पूर्वी सांगली - मिरज कोल्हापूर अशी मीटर गेज रेल्वे सुरू होती. १९२२ च्या सुमारास पुण्याच्या व्ही. आर्. रानडे अँड सन्स या कंपनीने कृष्णा नदीवर पूल बांधला. या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी त्यावेळचे व्हॉइसरॉय आयर्विन हे आले होते. त्यांचेच नांव पुलाला देण्यात आले.

सांगलीला पाणी पुरवठ्यासाठी कृष्णा नदीच्या पात्रात जमिनीखाली पाच ते सहा फूट उंचीची व शंभर ते दीडशे फूट लांबीची गॅलरी बांधली होती व या गॅलरीला उतार होता. गॅलरीतील झिरपलेले पाणी नळावाटे एका विहिरीत जमा होई. हे पाणी साठविण्यासाठी दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाशेजारी एक मोठी लोखंडी टाकी बांधलेली आहे. या टाकीत हे पाणी चढवावे लागे. त्यावेळी बॉयलरचा उपयोग करुन त्याच्या वाफेने पंप सुरू करीत व टाकीतील पाणी नळाने सांगलीत पुरविले जाई.

कारखानदारीच्या क्षेत्रात कै. दादुकाका भिडे आणि त्यांचे बंधू रामभाऊ भिडे हे अग्रेसर होते. रामभाऊ भिडे, हे स्वत: इंजिनिअर नसले तरी त्यांना इंजिनिअरिंगचे उपजत ज्ञान होते. त्यांनी त्यावेळी एक रोडरोलर तयार केला होता. पण या रोडरोलरला त्यावेळच्या शासनाने परवानगी न दिल्याने, तो रोडरोलर रस्त्यावर येऊ शकला नाही. हाच कारखाना पुढे रघुनाथराव व त्यांचे चिरंजीव समर्थपणे चालवीत आहेत. सांगलीबरोबर पुणे येथेही कारखाना उभारून दैदिप्यमान प्रगती केली आहे. त्यावेळचे आणखी एक प्रमुख कररखानदार म्हणजे दांडेकर बंधू. कै. बाबुराव दांडेकर यांनी अविरत परिश्रमाने हा कारखाना पुढे आणला व आज त्यांचे चिरंजीव या कारखान्याची धुरा कुशलतेने सांभाळीत आहेत.


स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये कै. बाळासाहेब पालकर या पदवीधर अभियंत्याने १९३५ च्या सुमारास येथे कामाला सुरुवात केली. धोतर, कोट व काळी टोपी या पेहेरावातच ते बांधकाम कंत्राटदारांना मार्गदर्शन करीत. त्यांचे काम अगदी चोख असे. त्यांच्या ३५-४० वर्षांच्या कारकिर्दीबद्दल सांगलीकर जनता समाधानी होती व आजही त्यांचेबद्दल आदराने बोलले जाते.

१९४५ च्या सुमारास श्री. के. डी. नरगुंदे हे बडोद्याहून वास्तुविशारदाची पदविका घेऊन सांगलीला आले. त्यांचे वडील राजेसाहेबांचे दिवाण असल्याने नरगुंदे सांगलीला परिचित होतेच. त्यांनी आपल्या कौशल्याने पालकरांचेबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी व्यवसायात आपले स्थान निर्माण केले. १९४७ साली विश्रामबाग येथे न्यू इंजिंनिअरिंग कॉलेज ( आताचे वालचंद कॉलेज ऑफ इंजिंनिअरिंग ) स्थापन झाल्यावर वास्तुशास्त्रविशारद म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागले. सिटी हायस्कूल, पुरोहित कन्याशाळा, पुतळाबेन कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली जिल्हा नगरवाचनालय, अर्बन बँक अशा कितीतरी सार्वजनिक इमारती बांधण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.

१९४७ साली पुण्याच्या महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीने विश्रामबाग येथे \'न्यू इंजिंनिअरिंग कॉलेज \'सुरू केले. त्यावेळी फक्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखा होती व त्यांत प्रथम वर्षाला १७० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाई. १९५५ ला वालचंद ट्रस्टने देणगी दिली आणि या कॉलेजचे नाव वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असे झाले.

१९५५ पासून पदवीच्या यांत्रिकी व विद्युत अशा दोन शाखा सुरू झाल्या. अल्पावधीतच या महाविद्यालयाने नांव कमावले व सर्व शाखांतील उत्तमोत्तम अभियंते सांगलीला, महाराष्ट्राला आणि भारतालाही मिळवून दिले. काही अभियंत्यांनी सांगलीतच अभियांत्रिकी व्यवसायात पदार्पण केले. श्री. प्रवीणभाई परीख, एम्. पी. कोठारी (बाबा कोठारी), जगन्नाथ उपरे, सी. टी. साने हे त्यापैकी प्रमुख अभियंते होते. इतर काही स्थापत्य अभियंते वास्तुशास्त्रविशारद म्हणूनही काम करीत होते. वास्तुशास्त्रातील पदवी व पदविका घेऊन कांही तरुणांनी सांगलीत व्यवसाय करावयास सुरुवात केली. त्यानंतर वास्तुशास्त्रविशारद, स्थापत्य अभियंते, स्ट्र्क्चरल डिझायनर्स व कंत्राटदार अशा चारही क्षेत्रातील व्यक्तींनी अभियांत्रिकी कामाचा दर्जा उंचावला.


सांगलीस अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊन २५ वर्षे होऊन गेली व सर्व शाखांतील अनेक अभियंते व वास्तुविशारद सांगलीत काम करीत होते. या सर्वांना एकत्र आणून काही भरीव कार्य करावे या उद्देशाने ज्येष्ठ अभियंते कै. प्रवीणभाई परीख व कै. श्री. कोठारी यांच्या प्रयत्नांतून १९७८ साली \'इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट्स् असोसिएशन\' अशी संस्था सांगली जिल्ह्यासाठी स्थापन झाली. अल्पावधीतच या संस्थेने चाळीस हजार चौ. फूट जागेत चार हजार चौ. फुटांचा प्रशस्त हॉल बांधला. १९९३ पासून या हॉलमध्ये इंजिनिअरिंगवरची चर्चासत्रे होत आहेत.


सांगलीमध्ये बरेच वास्तुविशारद काम करीत असले तरीसुध्दा सांगलीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित येऊन कांही सूचना करणे त्यांना आवश्यक वाटू लागले.


श्री. विवेक देशपांडे, श्रीकांत गोरे यांनी सर्व वास्तुशास्त्रविशारदांना एकत्र करून \'इंडियन इंन्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर\' या संस्थेची एक शाखा सांगलीत सुरू केली. १९९१ पासून पहिली चार वर्षे श्री विवेक देशपांडे हे अध्यक्ष होते. त्यानंतर श्री. श्रीकांत गोरे यांनी चार वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सध्या श्री. प्रमोद चौगुले हे उत्साही वास्तुशास्त्रविशारद अध्यक्ष आहेत. या संस्थेचे आज ३५ आजीव सदस्य असून त्यामध्ये श्री. विवेक देशपांडे, टी. डी. गाडगीळ, श्रीकांत गोरे, प्रमोद परीख, आनंद साळुंखे, रवी पटवर्धन, प्रकाश जगताप, श्रीराम कुलकर्णी, माणिक हिरेमठ, तायवाडे पाटील वगैरे प्रमुख मंडळी आहेत. या वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेल्या कांही प्रमुख इमारतींमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद कार्यालय, सांगली जिल्हा नगर वाचनालय, भूविकास बँक, खरे मंगल कार्यालय, कच्छी समाजसेवा कार्यालय, राजमती भवन, बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, आर्किटेक्चर कॉलेज आदि आयुर्वेदिक कॉलेज यांचा समावेश करावा लागेल.

सांगली मिरज परिसरात १९९३-९४ च्या सुमारास इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सची सांगली शाखा आणि पद्मभूषण वसंतदादा ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून आप्पासाहेब बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज सुरू झाले. सांगलीच्या सर्व वास्तुशास्त्र विशारदांनी या महाविद्यालयाला सर्वतोपरी सहकार्य दिले. श्री. राजेंद्र लाकुले हे पहिले प्राचार्य. त्यानंतर नंदिनी देशपांडे, माधव जोशी यांनी प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. सध्या श्री. सांबरेकर हे प्राचार्यपदाचे काम पहात आहेत. या महाविद्यालयात प्रथमवर्षाला फक्त २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो.


सांगलीमध्ये सामान्य नागरिकांना प्लॉट घेऊन घर बांधणे अशक्य झाल्याने याठिकाणी ओनरशिप फ्लॅट सिस्टिम सुरू झाली आणि काही बिल्डर्स अशा प्रकारच्या इमारती बांधू लागले. नागरिकांचा प्रतिसाद पाहून आणखी काही काँट्न्क्टर्स या व्यवसायात उतरले. या सर्वांनी ऑल इंडिया बिल्डर्स असोसिएशन या संस्थेची एक शाखा १९८९ साली सांगलीमध्ये सुरू केली. आणि सर्व बिल्डर्स या संस्थेचे या संस्थेचे सभासद झाले. आज या संस्थेचे ११० सभासद आहेत. या सभासदांना त्यांच्या व्यवसायात काही सवलती शासनाकडून मिळतात. बिल्डर्स असोसिएशनची शाखा सांगलीमध्ये सुरू करण्यात श्री. एम्. डी. भाटे यांचा सिंहाचा वाटा होता. पहिली चार वर्षे ते या संस्थेचे अध्यक्ष होते. पुढे श्री. विकास कुलकर्णी, एस्. बी. पाटील, अनिल कोकितकर, कुमार मेहता, अनिल बाफना, मोहन अंबोळे, एस्. एफ्. चौगुले यांनी या संस्थेची धुरा सांभाळली.


या संस्थेने सांगली नगरपालिकेकडून २०००० चौ. फूट जागा घेऊन १९९५ साली त्यामध्ये २००० चौ. फूटाची इमारत बांधली आहे. सर्व बिल्डर्स व कंत्राटदार यांच्या सहकार्यातून ही इमारत उभी राहिली. काही प्रमुख बिल्डर्स व कंत्राटदार यांची नावे डोळयापुढे येतात, ती अशी ..


१) भाटे बिल्डर्स २) एस्. पी. कौलगुड ३) जिजा कंस्ट्रक्शन ४) वालचंद कंस्ट्रक्शन ५) मोहिते अँड सन्स ६) मोहन अंबोळे ७) मेहता असोशिएटस् ८) जे. बी. शिंदे कंस्ट्रक्शन ९) शहा कंस्ट्रक्शन.


केवळ बिल्डर्स असणार्‍यांमध्ये कोटिभास्कर अँड असोशिएटस्, कोकितकर ब्रदर्स, व्यंकटेश्वर कंस्ट्रक्शन व के. के. शहा कंस्ट्रक्शन यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. कंत्राटदारांनी बांधलेल्या प्रमुख व भव्य इमारतींमध्ये भारती विद्यापीठ, टेलिफोन भवन, उद्योग भवन, सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल यांचा समावेश करावा लागेल.

---लेखक -  'प्रा. एच्. यु. कुलकर्णी' Hits: 219
X

Right Click

No right click