कारखानदार कसा झालो? - उद्योगरत्न वि. रा. वेलणकर
- उद्योगरत्न वि. रा. वेलणकर
कारखानदार कसा झालो? या पुस्तकाची प्रस्तावना>
आपल्या करकमलामध्ये माझ्या जीवनवृत्तांताचे हे पुस्तक ठेवताना मला अत्यानंद होत आहे. या वृत्तांताच्या कल्पनेला प्रारंभ कधीपासुन झाला तेहि पाहण्याजोगे आहे. १९०८ साली अवघ्या ५०० रु. भांडवलवर तीन लाकडी हातमागांचे स्वरूपात श्री गजानन मिलचा जन्म झाला. त्यानंतर अनेक संकटांना तोंड देत देत यशाचे मार्गाला लागून २० यांत्रिक मागापर्यंत ही गिरणी वाढून स्वतःच्या इमारतीत १९२५ साली स्थानापन्न झाली व मला त्याकामी यश मिळाले.
त्यावेळेपासून माझे अनेक स्नेही माझे आत्मवृत्त मी लिहावे असे सुचवू लागले. आपला वृत्तांत स्वतः लिहिणे म्हणजे आत्मश्लाघेचे पातक करणे असे त्यावेळी मला वाटे. मनुष्य जर उत्तम असेल तर त्याच्या मृत्यू नंतर लोक आपोआपच त्याचे चरित्र लिहितात व हाच खरा मार्ग, अशी माझी समजूत त्यावेळी होती. पण त्यानंतर अनेकांचे जीवन-वृत्तांत प्रसिद्ध झाले. आपल्या जीवनात ज्या इष्टानिष्ट गोष्टी घडल्या, त्यावेळी आपण कसे वागलो, ते तरुणांनी वाचल्यामुळे त्यांचे ज्ञानात भरीव भर पडते; तेव्हा हे परोपकाराचे काम आहे व आपल्या जन्मात आपणास आलेले अमोल अनुभव अगर आपणास माहीत असलेली उत्तमोत्तम गुणकारी औषधे लोकांना ज्ञात न करता मरणे, म्हणजे जनतेचे अज्ञान वाढविण्याचे पाप करण्याजोगी गोष्ट आहे. अशाच गोष्टी आजवर आपल्या पूर्वजांचे हातून घडल्यामुळे भारत मागे पडला; पण या उलट पाश्चिमात्यांनी आपले अनुभव आत्मवृत्तद्वारा जनतेला सांगितल्यामुळे ते लोक पुढे गेले. याहि गोष्टी हळू हळू मला पटू लागल्या.
आत्मवृत्त लिहावे हे तत्त्व जरी पटले, तरी तसे करण्याला माझी योग्यता आहे, असे मला वाटेना. याचे कारण माझ्या व्यक्तिपुरता मी यशस्वी असलो तरी कारखान्याला ‘मिल’ हे मोठे नांव प्रथमपासून असल्याने व भारतातल्या प्रचंड गिरण्यांच्या वर्गात मी बसलो असल्याने, त्यांचा प्रचंड व्याप, त्यांचे प्रचंड साहस व त्यांनी मिळविलेले प्रचंड यश पाहिले म्हणजे आपली ४०-५० मागांची गिरणी, मोठ्या गिरण्यांचे कडोसरीला बसेल येवढी बारकी असल्याने, या बाहुलीच्या लग्नाची वरात, आपण गावातील मोठ्या सडकेने काढू लागलो तर ते कसे शोभेल? निव्वळ वृत्तांताच्या खर्चापुरते पैसे खिशात असणाऱ्या प्रत्येकाने तो लिहिणे हे न्यायाचे ठरेल का? हाच प्रश्न मनात येऊन वृत्तांत लिहिण्याकडे हात वळेना.
पुढे १९३५ साली जपानचा प्रवास झाला; त्यानंतर मागांची संख्याहि वाढत वाढत ३०० वर गेली. १९४० साली सूतकताईचे खाते सुरू होऊन कापसापासून कापडाच्या गाठी बांधीपर्यंत सर्व कामे गिरणीत होऊ लागल्यामुळे कारखान्याला मिल हे नांवहि शोभू लागले व पूर्णत्वहि बरेच आले. नंतर १९४७ साली सुवर्णतुलेचे महादान घडले व वयहि ६० चे पुढे गेले व मग आत्मवृत्त लिहावे असा विचार नक्की झाला. पण त्यात किती अडचणी आल्या ते पाहा.मी आजवर जरी ४-५ पुस्तके लिहिली तथापि आत्मवृत्त लिहिण्याची गोष्ट दिसते तशी सोपी तर नाहीच पण उलट फार अवघड आहे. कसे ते पाहा!
(१) आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी नानाक्षेत्रात घडतात, व अनेक व्यक्तींचे बरे वाईट संबंध येतात, त्याकडे सरन्यायाधीशाच्या निःपक्षपाती वृत्तीने पाहाण्याची कला साधली पाहिजे व सत्य तेच दिले पाहिजे. तसे नसेल तर अपराध एकाचा असून त्याचा दोष दुसऱ्याला देण्याची वेळ यावयाची.
(२) सरन्यायाधीशाकडे भक्कम पुरावा असतो म्हणून त्यांना नागडे सत्य दाखविणे सोपे जाते पण आत्मवृत्तवाल्याला नागडे सत्यहि दाखविता येत नाही कारण तसे दाखविले तर कोर्ट कचेऱ्या होण्याची वेळ यावयाची म्हणून सावरून सावरून लिहावे लागते. आणि अशा कचाट्यात सापडल्याने लेखन अवघड होऊन बसते. कामाचा व्याप फार झाल्याने फार पूर्वीच्या आठवणी शोधून काढणे म्हणजे जमीन खोदून वस्तू प्राप्त करून घेण्यासारखे अवघड काम आहे.
(४) गत गोष्टी आठवल्या व त्या अगदी सत्य असल्या तरी तरुण वाचकांना हितकर कोणत्या त्याच दिल्या पाहिजेत, व तसे झाले तरच पुस्तकास उपयुक्तता प्राप्त होईल.
(५) वृत्तांत वाचताना वाचकांना शीण न यावा, उलट वाचताना उत्साह वाटावा यासाठी, तो अनेक छोट्या छोट्या १९५ भागामध्ये दिला असून त्यातील कोणताहि अंक वाचला की एक पुरी कल्पना वाचकाचे पदरी पडावी असे केले पाहिजे.
(६) शास्त्रीय विषय पुष्कळ द्यावा तर वाचक कंटाळतील. बरे अजिबात न दिला तर मग वृत्तांताचे वैशिष्ट्यच नाहीसे होईल यासाठी लोकांना सहज समजावा असा सोपा व थोडा व तोहि जागोजागी असा दिला तरच बरे म्हणून तसाच देणेचे ठरून लेखन केले पाहिजे.
(७) वृत्तांताला मोठ्या निबंधाचे स्वरूप दिल्यास कंटाळवाणे वाटते. तो सुरस व्हावा यासाठी वक्ता व श्रोत्याची जोडणी केली पाहिजे.
(८) शास्त्रीय ज्ञान देताना आमचा मनोदय वाचकांना कळावा म्हणून बोधचित्रे देण्याचे ठरले, व मग सर्वच व्यक्तींची चित्रे देऊन सौंदर्य वाढवावे व अनेक अनुभवहि द्यावेत असे ठरवले.
(९) वृत्तांत किती पृष्ठांचा व्हावा? १००-२०० पृष्ठांचा केल्यास जमेल का? याची शहानिशा फार झाली व अखेर चित्रांचे ठसे व माहिती बरीच असल्याने ७०० पानापर्यंत गेला तरी करावा असे ठरून तसे लेखन करीत जावे असे ठरले.
(१०) या पुस्तकाला नांव काय द्यावे? असा प्रश्न निर्माण झाला तेव्हां मुळची व्यापारी परंपरा नसताना टक्के टोणपे खाऊन व धके चपेटे सोसून “कारखानदार कसा झालो?” हेच नाव सर्वांना आवडले. शिवाय ते जगात वागावे कसे? यासारखे प्रश्नार्थक व तीन शब्दाचे असल्याने तेच ठेवावे असे ठरले.
(११) इतर भाषिकांना मराठी भाषा सोपी वाटावी यासाठी अनुच्चारित अनुस्वाराचे लोढणे जर मराठी भाषेच्या गळ्यातील काढले तर पुष्कळ आराम होईल ही आमची कल्पना असल्याने या सबंध ग्रंथात अनुच्चारित अनुस्वार टाळले आहेत. या बद्दल दुमत असलेल्या वाचकांनी क्षमा करावी असे मी विनवितो. Hits: 244