अकौंटिंग भाग ५ - व्हाउचर्सचे प्रकार

Parent Category: मराठी उद्योग Category: उद्योग Written by सौ. शुभांगी रानडे

कोणताही आर्थिक व्यवहार करताना त्याची माहिती जेथे लिहिली जाते त्याला व्हाउचर असे म्हणतात.
व्हाउचर्सचे प्रकार -
१. कॉन्ट्रा  (Contra)
२. रिसिट ( Receipt)
३. पेमेंट (Payment)
४. जर्नल (Journal)
५. सेल (Sale)
६. पर्चेस ( Purchase)

१. कॉन्ट्रा -
उद्योग वा व्यवसायाकडे असणारी रोख रक्कम व त्याच्याच बँकेतील खात्यावरील रक्कम यात देवघेव झाली तर त्या नोंदीना कॉन्ट्रा व्हाउचर्स म्हटले जाते. उदाहरणार्थ  बँकेतून रोख रक्कम काढली तर कॅशला डेबिट आणि बँक खात्याला क्रेडिट असे  कॉन्ट्रा व्हाउचर करण्यात येते. याउलट  रोख रक्कम आपल्याच बँक खात्यावर भरली तर  कॅशला क्रेडिट  आणि बँक खात्याला डेबिट असे  कॉन्ट्रा व्हाउचर करण्यात येते. अशा व्यवहारांचा उद्योगाच्या मालमत्तेवर काहीही परिणाम हॊत नाही हे लक्षात येण्यासाठी कॉन्ट्रा हा वेगळा  व्हाउचर प्रकार केला जातो.
 
२. रिसिट - रिसिट म्हणजे रोख पैसे ( किंवा चेक) मिळाल्याची पावती. ज्या ज्या वेळी पैसे बाहेरून व्यवसायात येतात. त्यावेळी रिसिट व्हाउचर करावे लागते. याची नोंद कॅशला डेबिट व ज्या कारणासाठी वा ज्याच्याकडून पैसे आले त्याच्या क्रेडिटला केली जाते.

३. पेमेंट - पेमेंट म्हणजे रोख पैसे ( किंवा चेक) दिल्यावर करावयाची नोंद .  ही नोंद कॅशला क्रेडिट व ज्या कारणासाठी वा ज्या्ला पैसे दिले त्याच्या डेबिटला केली जाते.

४. जर्नल -  जर व्यवसायातील कॅश व बँक अकौंटमध्ये कोणताही बदल न करता काही आर्थिक व्यवहारांची दुरुस्ती नोंद (Adjustment) करावयाची असेल जर्नल प्रकारच्या व्हाउचरचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ जेव्हा विकत घेतलेला माल काही कारणास्तव आपण विक्रेत्याकडे परत करतो त्यावेळी दिलेली रक्कम परत मिळण्यासाठी त्याला डेबिट नोट व्हाउचर दिले जाते व विक्रेता आपल्याला ती रक्कम वा त्यारकमेची क्रेडिट नोट व्हाउचर देतो.
  याउलट कृती आपण विकलेला माल प्रत आला तर घडू शकते. या डेबिट नोट  व क्रेडिट नोट व्हाउचर्सचा समावेश जर्नल व्हाउचर प्रकारात केला जातो.  तसेच उधारीवरील रकमेवर लागू होणा‍र्‍या व्याजाची नोंद करण्यासाठी जर्नल व्हाउचरचा वापर केला जातो.

५. सेल व्हाउचर - क्रेडिट(उधारी)वर माल विकला असेल तर सेल व्हाउचरमध्ये व्यवहाराची नोंद केली जाते. यात ज्याला माल विकला त्याच्या नावे डेबिट तर सेल खात्याला क्रेडिटला रक्कम लिहिली जाते.

६. पर्चेस व्हाउचर - क्रेडिट(उधारी)वर माल घेतला असेल तर पर्चेस व्हाउचरमध्ये व्यवहाराची नोंद केली जाते. यात ज्याच्याकडून माल घेतला त्याच्या नावे क्रेडिटला तर पर्चेस खात्याला डेबिटला रक्कम लिहिली जाते.

बाहेरून दुकानातून आपण वस्तू विकत घेतली की आपल्याला त्याचे बिल  मिळते.  त्यावर कॅश / क्रेडिट असे दोन पर्याय असतात. कॅश देऊन वा रोखीने खरेदी केल्यास क्रेडिट पर्याय खोडून मालक त्यावरच पैसे वा चेक मिळाल्याची पावती देतो. त्याच्याकडेही बिल/पावतीची एक प्रत असते. या पावतीचा संदर्भ देऊन दुकानदार त्याच्या रोजकीर्दीत रोख पैसे मिळाल्याची ( कॅश ला डेबिट) व विक्री ( सेलला क्रेडिट) झाल्याची नोंद करतो.

मात्र जर आपण   क्रेडिट(उधारी)वर माल घेतला असेल तर दुकानदार  आपल्याला बिलावरील कॅश पर्याय खोडून क्रेडिट या नावाने बिल देतो व बिलाचा संदर्भ देऊन तो त्याच्या रोजकीर्दीत आपल्या नावावर बिलाची रक्कम येणे असलेची (डेबिट) व विक्री ( सेलला क्रेडिट) झाल्याची नोंद करतो. याठिकाणी बिल व पावती  एकाच कागदावर असले तरी व्हाउचर प्रकारामध्ये रोखीने व्यवहार झाल्यास त्याला रिसिट व्हाउचर व उधारीवर व्यवहार झाल्यास सेल व्हाउचर म्हटले जाते.

आता वरील व्यवहार आपण आपल्या अकौंटिंगसाठी लिहायचे ठरविले तर  दुकानातून आपण रोखीने वस्तू विकत घेतली तर आपल्या अकौंटमध्ये कॅशला डेबिट व पर्चेसला क्रेडिट अशी नोंद करावी लागेल. मात्र जर आपण   क्रेडिट(उधारी)वर माल घेतला असेल तर आपल्या अकौंटमध्ये ज्याच्याकडून माल घेतला त्याच्या नावे क्रेडिट व पर्चेसला डेबिट अशी नोंद करावी लागेल.

म्हणजे डेबिट व क्रेडिट या संज्ञा व्यवहाराशी संबंधित दोन्ही पार्ट्या परस्परविरुद्ध अर्थाने वापरतात. याचे कारण स्पष्ट आहे. एकाकडून दुसर्‍याकडे पैसे गेले तर पहिल्यासाठी ते क्रेडिट तर दुसर्‍यासाठी ते डेबिट ठरतील. एकाने दुसर्‍याला वस्तू विकली तर त्याच्या दृष्टीने ती विक्री तर दुसर्‍याच्या दृष्टीने ती खरेदी असते.

Hits: 167
X

Right Click

No right click