कोबीच्या वड्या

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
कोबी, कांदा, चण्याचे पीठ, खसखस, बडीशेप, लवंग, दालचिनी, सुके खोबरे, मिरे, तीळ शहाजिरे, धने, तिखट, मीठ, साखर, पाव चमचा सोडा, पाव वाटी ताक, फोडणीचे साहित्य.

कृती :
कोबी जाडसर किसून घ्यावा. कांदा बारीक चिरून घ्यावा तीन वाट्या कोबीच्या किसात एक वाटी चण्याचे पीठ घ्यावे. तसेच या प्रमाणाच्या मानाने दोन चमचे खसखस, एक चमचा बडीशेप, पाव वाटी खोबऱ्याचा कीस, दोन लवंगा, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, दोन मिरे, पाव चमचा जिरे, पाव चमचा शहाजिरे, पाव चमचा धने, तीन चमचे तीळ हे सर्व जिन्नस भाजून घेऊन, बारीक वाटावे. फोडणी करून त्यात कांदा टाकावा. फोडणीकरिता तेल जरा जास्तच घ्यावे. कांद्याला एक वाफ आल्यावर त्यावर कोबीचा कीस घालावा व दोन्हीला मिळून एक वाफ द्यावी व खाली उतरवून त्यात डाळीचे पीठ, वरील वाटलेला मसाला, चवीप्रमाणे तिखट, मीठ व साखर आणि ताक व सोडा घालून सर्व चांगले कालवावे. कालवून पंधरा मिनिटे ठेवून द्यावे. नंतर एका थाळीला तेल लावून, त्यात वरील मिश्रण ओतून, वर झाकण ठेवावे आणि खालीवर निखारे ठेवून मंद विस्तावावर भाजावे. नंतर वड्या कापाव्या. ह्या वड्या चांगल्या फुगतात.
Hits: 399
X

Right Click

No right click