अरे, संसार संसार - बहिणाबाई चौधरी
अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे
ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन् दुःखाले होकार
देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !
अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार
असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
Hits: 562