॥ श्रीमद् भागवत महात्म्य ॥

Parent Category: मराठी संस्कृती Category: भक्तिपरंपरा Written by सौ. शुभांगी रानडे

॥ श्रीमद् भागवत महात्म्य ॥
श्रीमद् भागवत या ग्रंथाचे नाव घेतले की आपल्या समोर श्रीकॄष्णाचे लिलाचरीत्र डोळ्यासमोर येते. परंतु हा ग्रंथ म्हणजे एव्हढेच नव्हे.यामध्ये भगवंताच्या इतर अवतारांची लिलावर्णनेसुद्धा विस्त्रुतपणे वर्णन केलेली आहेत. भगवंताचे अवताराला अनुलक्षुन त्याची स्तुति केली आहे. या स्तुति स्तोत्रामुळे भक्तांच्या ह्रदयामध्ये भक्तिनिर्झर वाहण्यास मदत होते. तसेच त्या त्या अवतारांचे प्रयोजन व त्यांचे मूळ स्वरुप समजण्यास मदत होते.
खरे तर परमात्म्याच्या निर्गुण निराकार स्वरुपाचे हे भगवंताचे अवतार म्हणजे सगुण् साकार रुपे आहेत. तेच " सत्य " शरीर धारण करुन जगाचे हितासाठी अवतरीत होत असते. श्रीमद् भागवताचे महात्म्य जाणणेसाठी २ मार्ग आहेत.
१. पद्म पुराण (६ अध्याय ). २. स्कंद पुराण ( १८ अध्याय )

  • श्रीमद् भागवताचे महात्म्य वर्णन करणारा श्लोक --

निगम कल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद् अमॄतद्रवसंयुतम् ।
पिबत भागवतम् रसमालयं मुहुरहो रसिका भूवि भावुकम् ।
( पद्म पुराण -- महात्म्य ६-८०)
हे रसिक, भावूक जनहो ! हे भागवत, वेदरुपी कल्पवॄक्षाचे परीपक्व फळ आहे.श्री शुकदेवरुपी शुकाच्या मुखातून पडल्यामुळे ते अमॄतरसांनी परीपूर्ण भरले आहे. यात नुसता रसच भरलेला आहे. साली, कोय कांही नाही.

  • श्रीमद् भागवत हे महापुराण आहे.

“श्रुति, स्मॄति, पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम् ! “ - हे संकल्प वाक्य आपल्या परीवारात होणार्‍या सर्व प्रकारच्या धार्मिक कॄत्यात उच्चारतो. याचा अर्थ -- श्रुति ( वेद ), स्मृति -मनु , याज्ञवल्क्य इ. धर्मशास्त्र विषयक प्रमाणभूत ग्रंथ आणि पुराणे यामध्ये धार्मिक कार्याचे जे फल सांगितले आहे, ते मिळावे यासाठी मी प्रस्तुत धर्मकार्य करीत आहे.
ते फळ कोणते ? - मोक्षप्राप्ति. मोक्षप्राप्तिकडे वाटचाल होवू दे.
यासाठी आवश्यक गुण कोणते आहेत ?
सदाचार, नीति,परोपकार,भक्ति,भूतदया,व्रतनिष्टा,सेवाभाव इ.
या गुणांचा,तत्वांचा उपदेश प्राचिन पुराण ग्रंथानी रोचक,बोधक व सुरस शैलीत भरपूर प्रमाणात केला आहे.
म्हणून वैदिक वाङ्मयाप्रमाणे पुराण वाङ्मयाचीही भरपूर ऒळख असणे आवश्यक आहे.
( पुराण = पुरा नवं भवती ) - जे प्राचिन असुनही नविन असते.
नविन पिढीला पुराणातील कथा आवडतात. श्रीराम,श्रीकॄष्ण यांच्या जीवनावरील दूरदर्शनवरील मालिका लोकप्रीय आहेत.
१८ पुराणे व १८ उपपुराणे हा भारतीय सनातन वाङ्मयीन ठेवा आहे. हे नीतिकथांचे कोश आहेत.

  • पुराण वाङ्मयाचे लक्षण कोणते ?

सर्गश्र्च प्रतिसर्गश्र्च वंशो मन्वंतराणीच ।
वंशानुचरीतं चेती पुराणं पंचलक्षण्म् ।
सर्ग - विश्वाची उत्पत्ती, प्रतिसर्ग - विश्वाचा प्रलय, वंश - निरनिराळे वंश, मन्वंतर - कालानुसार होणारी स्थित्तंतरे
वंशानुचरीतं - श्रेष्ठ राजांच्या जीवनातील घटना हे ५ विषय.

  • १८ पुराणे ---

सात्विक पुराणे - विष्णु,नारद, भागवत, गरुड,पद्म,वराह --६
राजस पुराणे - ब्रह्म, ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्त, मार्कंडेय, भविष्य, वामन --६
तामस पुराणे - मत्स्य, कूर्म, लिंग, वायू, स्कंद, अग्नी ----६
श्रीमद् भागवतात एकूण पुराणांची श्र्लोकसंख्या - ४० लक्ष २० हजार
श्रीमद् भागवत महापुराण् आहे.

  • महापुराणाचे लक्षण --

अत्र सर्गो विसर्गश्र्च स्थानं पोषणभूतयाः।
मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः ।
सर्ग= ५ महाभूते, ११ इंद्रिये, अहंकार,महतत्व यांची उत्पत्ती --मूळ् प्रकृतिपासुन
विसर्ग= विविध प्रकारच्या चराचर सृष्टीची उत्पत्ती - ब्रह्मदेवाकडून
स्थानं= सृष्टीला स्थिर ठेवण्याचे कार्य - भगवान विष्णुचे
पोषण=भक्तजनावर विष्णुची कृपा
ऊतयः=रागद्वेषात्मक वासना-जीवाला जन्ममरणरुपी संसारात गुंतवितात
मन्वंतर=मनूंच्या अधिपत्याचा कालखंड
ईशानुकथा=परमेश्वराचे अवतार व त्यांचे भक्त यांच्या कथा
निरोध= सृष्टीच्या प्रलयकाळी जीवांचे आपल्या उपाधीसहीत इश्वरात विलिनीकरण
मुक्ति= जीवाचा परमात्मा स्वरुपात प्रवेश - ब्रह्मपदाची प्राप्ती

आश्रय= चिन्मय परब्रह्म हेच विश्वाचा आश्रय. याच ब्रह्मतत्वापासून ब्रह्मांडाची उत्पत्ती होते.
त्याच्याच प्रकाशाने हे विश्व प्रकाशीत होते.
श्रीमद् भागवताच्या १२ स्कंदात (३५० अध्याय व १८००० श्र्लोक ) हि महापुराणाची लक्षणे पूर्णतया व्यक्त झाली आहेत. हे महापुराण श्री व्यासानी लिहले व पुत्र शुकाला शिकविले.

  • या महापुराणाचे महत्व खालील गोष्टीनी व्यक्त होते :

१. भागवत धर्म - या महापुराणात " भक्तियोगप्रधान वेदान्त धर्म " पुरस्कृत केलाआहे. यालाच भागवत धर्म म्हणतात.
हा धर्म सर्वाना ग्राह्य व सर्व मानवमात्राना पावन करणारा आहे.
२. भागवत दर्शन - हे सर्व वेदांताचे सार आहे. कठीण असा वेदान्त कथानकानी, र्म्य रुपकानी, सुलभ व तितकाच मनोरम केला आहे.
३. भागवताचा नायक - भगवान श्रीकॄष्ण जो षडगुणैश्र्वर्य संपन्न, समस्त ब्रह्मांड नायक, अघटीत घटनापटू हा नायक.
४. भागवतातील रसाळ काव्य - एक रसज्ञ मनोज्ञ काव्य - रसमालयम् आहे.
वेद,राजा -आज्ञा करतात, पुराणे, मित्र - उपदेश करतात, कविता, प्रिया -मुग्ध करतात । पण एकटे भागवत या स्र्व गोष्टी करते. निसर्गाची, नगरांची, युध्दांची, स्वर्ग, नरक लोकांची अनेक वर्णने अत्यंत प्रदिर्घ पण ह्रुदयंगम आहेत. १० व्या स्कंदातील वेणू गीत, गोपीगीत, युगलगीत, संपूर्ण रास पंचाध्यायी इतकी अप्रतिम रसात्मकता प्रकट झाली आहे की तशी दुसरीकडे कोठेही नाहि. पराकोटीचे रसमाधूर्य आहे.
५. भागवतावरील टिका - यात पांडित्याचा अंश इतक्या प्रकर्षाने व्यक्त झाला आहे,ग्रंथ इतका गहन आहे की उत्तम संस्कॄतज्ञानासुध्दा अनुवादाचे सहाय्य घ्यावे लागते. " विद्यावतां भागवते परीक्षा ". अनेकानी टिका लिहील्या.
श्रीधर,चित्सुखाचार्य,सुदर्शन,वीरराघव, वल्लभाचार्य, श्रीहरी,कृष्णदयार्णव (१० वा स्कंद),एकनाथ (११ वा स्कंद)
या सर्वामध्ये श्रीधरांची " भावार्थ दीपिका " हि अद्वैत मतवादची टिका सर्वानुमते उत्तम मानण्यात येते.
चैतन्य महाप्रभु व त्यांचे शिष्य यानीसुध्दा श्रीधरांचा मोठा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

  • श्रीधर चरीत्र ---

गुजराथमध्ये जन्म - पूर्वाश्रमी धनवान गृहस्थ होते - परमानंदस्वामिकडून संन्यासदिक्षा व श्रीधरस्वामी असे नामकरण - काशीक्षेत्री बिंदूमाधवाच्या मंदिरात लेखन केले -
उपास्य दैवत भगवान नृसिंह.
" व्यासो वेत्ती,शुको वेत्ती,राजावेत्ती न वेत्तीवा । श्रीधरा सकलं वेत्ती श्रीनृसिंह प्रसादातः ।"
श्रीमद् भागवताच्या प्रत्येक अध्यायाचे शेवटी पुष्पिकेत " पारमहस्यां संहितायां " या शब्दात या पुराणाचे वैशिष्ट्य सांगितले आहे. हि पुराण संहिता " पारमहस्य " म्हणजे परमहम्स कोटीचे जे श्रेष्ठ परमार्थी सम्त सज्जनांच्या श्रवण, मननासाठी अवतीर्ण झाली आहे. हिचे उद्गात भ. वेदव्यास व प्रवक्ते श्रीशुकाचार्य हे परमहम्स होते. श्रोता होता राजा परीक्षित -जो ऎहीक जीवनापासुन पराङमुख होवुन ७ व्या दिवशी देहबंधनातुन मुक्त होण्यची प्रतिक्षा करीत होता.
भगवत् भक्ति हा परम धर्म आहे. त्याची स्थापना माया मोहग्रस्त जीवांच्या अंतःकरणात करण्याचे महान कार्य हे महापुराण करते. श्रीमद् भागवताची कथा अमर आहे.
भागवत शास्त्र हे योग व तपाशिवाय भगवंताला भेटण्याचा मार्ग आहे.
भागवतात जे नाही ते कोणत्याही ग्रंथात नाही व जे भागवतात आहे तेव्हढेच अन्य ग्रंथात आहे.

Hits: 665
X

Right Click

No right click