आषाढ

Parent Category: मराठी संस्कृती Category: मराठी सण Written by सौ. शुभांगी रानडे
आषाढी एकादशी
हा दिवस महाराष्ट्नत अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्नच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून ,एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
आषाढ शुध्द एकादशीला महाएकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू सागरात शेषावर शयन करतात. म्हणून त्याला शयनी एकादशीही म्हणतात. आषाढी एकादशीला सोहळा पंढरपुरास पाहावयास मिळतो. चंद्रभागेच्या वाळवंटात लाखो भक्तांचा मेळा येथे जमला असतो. विठ्ठल नामाचा प्रचंड गजर येथे होत असतो. आषाढीची कथा अशी आहे.

आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.
पौराणिक काळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून ''तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल'' असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्याचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला.
परस्परावर प्रेम करणे, प्राणीमात्र, अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.
सर्वेपि सुखिन: सन्तु ।
सर्वे सन्तु निरामया ।
सर्वे म्रदाणि पश्यन्तु ।
मा कश्चिद दु:खमाप्नुयात ।।
गुरूपौर्णिमा

आषाढी पौर्णिमेला गुरू पौर्णिमा म्हणतात. आपल्या हिंदू संस्कृतीत गुरूचे फार मोठे स्थान आहे. गुरू हा परमेश्वर, परब्रम्ह आहे असे म्हटले आहे. आपल्याला जो विद्यादान देतो, ज्याच्या भरवशावर आपण आपल्या कुटुंबाचा, समाजाचा व राष्ट्नचा उध्दार करतो अशा गुरूचा आदर करणे, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. सर्व ज्ञानाचा उगम व्यासमुनी पासून होतो अशी धारणा असल्यामुळे गुरू परंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे. हा सण महर्षी व्यासांच्या काळापासून सुरू झाला म्हणून याला व्यासपौर्णिमाही म्हणतात. आद्य शंकराचार्य हे व्यास मुनींचे अवतार आहेत. या श्रध्देने संन्यासी मंडळी शंकराचार्यांचाही या दिवशी पूजा करतात. याच दिवशी दिक्षागुरू, माता, पित्याचीही पूजा करण्याची पध्दत आहे.

या दिवशी गुरूकडे जाऊन त्यांना वंदन करावे. त्यांची पूजा करावी व त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांचे सव्दिचार श्रवण करावे व आपल्या जीवनामध्ये मदत कार्य करण्याची प्रतिज्ञा करावी. ज्याप्रमाणे मुलगा अथवा मुलगी कर्तबगार निघाल्यावर आईबाबांना आनंद होतो. त्याप्रमाणे आपल्या शिष्याचे कर्तृत्व ऐकून गुरूला परमानंद होतो. ज्यांचे गुरू हयात नाहीत त्यांनी गुरूच्या तसबिरीला हार घालून त्यांचे स्मरण करावे. गुरू आपल्याला ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो व ज्ञानाशी एकरूप करून टाकतो असे पूज्य साने गुरूजी म्हणतात. गुरू म्हणजे ज्ञानी. गुरू म्हणजे दयेचा सागर. प्रेमाची, वात्सल्याची मूर्ती अशा या गुरूचे पूजन म्हणजे सत्याचे, ज्ञानाचे पूजन होय.

Hits: 563
X

Right Click

No right click