आंबोली

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: निसर्गरम्य स्थळे
Written by सौ. शुभांगी रानडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या प्रसिद्ध शहरापासून हे ठिकाण अवघ्या ३५ कि. मी. अंतरावर आहे. सह्याद्रीच्या कुशीतच समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असलेले हे स्थान निसर्ग रम्यता आणि हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदऱ्या, अप्रतिम सृष्टी सौंदर्य हे या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. येथील नजिकच्या परिसरात सावंतवाडीच्या राजांचा राजवाडा व देवीचे मंदिर आहे. हिरण्यकेशी नदीत डुबक्या घेणे किंवा तिच्या काठाकाठाने भटकंती करणे मोठे आनंददायी वाटते. येथील हिरण्यकेशी मंदिरातून या नदीचा उगम होतो. जवळच १० कि. मी. अंतरावर नागरतास धबधबा आहे. महादेवगड, मनोहरगड आदि जुने किल्लेही नजिकच्या अंतरावर आहेत.
आंबोलीचं जंगल दाट असल्याने सभोवतालच्या परिसरात अनेकदा रानडुक्कर, ससे, गवे, बिबटे, चितळ आदि आणि वन्यप्राणी आढळतात. सहसा न दिसणाऱ्या पक्षांचेही येथे दर्शन होते.

लोणावळा-खंडाळा

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: निसर्गरम्य स्थळे
Written by सौ. शुभांगी रानडे

       मुंबई-पुणे महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील ही दोन्ही ठिकाणे थंड हवेसाठी प्रसिद्ध आहेत. या दोहोत केवळ पाच कि.मी. इतकेच अंतर आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटतं. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुकं लपेटूनच फिरावं लागतं. उन्हाळयात जांभळं आणि करवंदीची लयलूट असते.
या दोन्ही ठिकाणांपासून जवळच पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. राजमाची पॉइंर्ट, वळवळ धरण, टायगर्स लिप, ड्युक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.

माथेरान

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: निसर्गरम्य स्थळे
Written by सौ. शुभांगी रानडे

 


      मुंबईनजिक असलेले हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीत ८०० मीटर उंचीवर ते असल्याने येथील वातावरण व परिसर निसर्गरम्य आहेच आणि हवाही निर्मळ आहे.

माथेरानचा शोध १८५० मध्ये ब्रिटीश पर्यटकांनी लावला. त्यानंतर या ठिकाणी ब्रिटीशांनी व पारशी धनवंतांनी बंगले बांधून गाव वसवलं. अश्वारोहण, गिरिकंदरातील मनमुराद भटकंती, गिर्यारोहण तसेच खरेदी अशा हेतूने पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. दृष्टीसुख देणारे ३३ पाइंर्टस् माथेरानच्या परिसरात आहेत. हार्ट पॉइंर्ट, पे मास्टर पार्क, पॅनोरमा, एकोहार्ट, वन ट्नी हिल, मंकी हिल असे काही पॉइंर्टस् प्रसिद्ध आहेत.

महाबळेश्वर

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: निसर्गरम्य स्थळे
Written by सौ. शुभांगी रानडे

    सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.
महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील सदाबहार निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरान प्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंर्टस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंर्ट, आर्थर सीट पॉइंर्ट, लॉडनिग पॉइंर्ट हे त्यापैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.
महाबळेश्वराच्या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.
येथील स्टॅनबेरीज, रासबेरीज, जांभळं, लाल रंगाची मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.

पाचगणी

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: निसर्गरम्य स्थळे
Written by सौ. शुभांगी रानडे

      जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक खंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि. मी. अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्याजेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वत:चं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत.
X

Right Click

No right click