अजंठा

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: प्रेक्षणीय स्थळे
Written by सौ. शुभांगी रानडे
बुद्धकालीन चित्र व शिल्पकला किती कळसाला पोहोचली होती याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर अजंठा येथील लेण्यातून तो घेता येतो.
अजंठा-वेरूळ लेणी म्हणूनच जगप्रसिद्ध झालेली आहेत. परंतु आश्चर्य असे की, जगविख्यात झालेल्या अजंठा येथील गुंफा गेल्या शतकात योगायोगानेच प्रकाशात आल्या. एरवी त्या शेकडो वर्षे अज्ञातवासातच होत्या आणि पुढेही त्या अंधारातच राहिल्या असत्या.
इ. स. १८१९ मध्ये एक ब्रिटीश क्रॅप्टन जॉन स्मिथ या परिसरातील गर्द जंगलात शिकार खेळण्यासाठी आला असताना जंगलाने व्यापलेल्या या गुंफा अचानक त्याच्या नजरेस आल्या आणि त्यानंतर मात्र तेथील रान मोकळं करून या गुंफाचा शोध घेण्यात आला.
सह्याद्री पर्वताच्या सातमाळा डोंगर रांगेतील नालेचा आकार असलेल्या एका डोंगर उतारावर या गुंफा खोदण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एकूण ३० लेणी असून ती इ. स. पूर्व दुसऱ्या शतकापासून इ. स. नंतरचे पाचवे शतक अशा सुमारे ८०० वर्षांच्या काळात खोदण्यात आली आहेत. या लेण्यांमध्ये मुख्यत: चैत्य, प्रार्थना मंदिरं, सभागार, विहार आणि मठांची व्यवस्था आहे. या ठिकाणी धार्मिक स्वरूपाची नित्यकर्मे व कर्मकांड पार पाडली जात असावीत.
ज्या डोंगरात ही लेणी खोदण्यात आली आहेत. त्यांच्या माथ्यावर एक जलौघ असून त्याचे पाणी एका नैसर्गिक कुंडात साठवले जाते.
     या कुंडास सप्तकुंड असे म्हणतात. क्र. ९ व १० च्या लेण्यात चैत्यगृहे आहेत. ८, १२, १३ व १५ क्रमाकांच्या लेण्यांचाही मठ किंवा प्रवचने यासारख्या धार्मिक कर्मासाठी उपयोग होत असावा. लेणी क्र. १, २, १६, १७, १९ व २६ या सुद्धा अशाच कार्यासाठी तयार करण्यात आली असावीत. या सर्व लेण्यांमध्ये बुद्ध आणि बुद्ध जीवन शिल्प व चित्रकलेद्वारे चितारण्यात आले आहे. लेण्यांमध्ये चितारण्यात आलेली रंगीत चित्रे तर अतिशय अप्रतिम आहेत. शेकडो वर्षे उलटूनही त्यातील रंग मात्र अजूनही उबदार आहेत. बुद्धावतार, जातककथा असे बुद्धजीवनाशी निगडित प्रसंग येथे कलात्मकतेने चित्रित केलेले आहेत. बोधीसत्व पद्मपाणी, आकाशगामी अप्सरा, बुद्धाचे सहस्त्रावतार, नृत्यगायन करणाऱ्या अप्सरा, पत्नीकडे भिक्षेची याचना करणारा बुद्ध, राजसभा आदि चित्रे खरोखरीज अद्वितीय आहेत. गुंफांमध्ये चितारलेली रंगीत चित्रे आणि शिल्पचित्रे भव्य तर आहेतच पण त्यातील भाव, नाट्य, बांधेसूदपणा, लय आणि गति यामुळे सर्व कलाकृतींना कमालीचा जिवंतपणा आलेला आहे.

बत्तीस शिराळा

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: प्रेक्षणीय स्थळे
Written by सौ. शुभांगी रानडे

       सांगली जिल्ह्यातील हे स्थान नागमहोत्सवासाठी संपूर्ण जगात मशहूर आहे. हे लहानसं गाव असलं तरी नागपंचमीला या गावात सार्वत्रिक नागपूजा होते व ती जगावेगळी असते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी येथील आबालवृद्ध गावाच्या परिसरात असलेले नाग सहजपणे मडक्यात पकडतात. अति विषारी नाग असूनही तेथील लोकांना ते दंश करीत नाहीत हे विशेष!

सागरेश्वर

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: प्रेक्षणीय स्थळे
Written by सौ. शुभांगी रानडे
     

कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे ठिकाण आहे. याठिकाणी सुमारे सात-आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. त्यात अदमासे ५१ मंदिरं असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे. याशिवाय इतरही अन्य देवदवतांची मंदिरं आहेत.

सागरेश्वराच्या या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. या अभयारण्याचा विस्तार अवघा ५-६ चौ. कि. मी. इतकाच असला तरी हे अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे हे विशेष होय. एकीकडे माणूस स्वार्थापोटी क्रूर जंगलतोड करीत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे परिश्रमपूर्वक जंगलाची लागवड करणारे मानवी हात पाहिले की अचंबा वाटते. या परिश्रमांमागे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळेच उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे.

सागरेश्वराच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे. वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.

पेच प्रकल्प

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: प्रेक्षणीय स्थळे
Written by सौ. शुभांगी रानडे
    

नागपूर जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी जणू आनंदाची पर्वणीच आहे. पेच नदीच्या दुतर्फा पसरलेले हे अभयारण्य म्हणजे मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील अभयारण्याचे क्षेत्र २५८ चौ. कि. मी. आहे तर संयुक्त प्रकल्पाचे क्षेत्र मात्र खूपच विस्तृत म्हणजे सुमारे १००० चौ. कि. मी. आहे.

पेच अभायरण्याचा विस्तार प्रचंड असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांची संख्याही मोठी असून त्यांच्या संचारक्षेत्राची व्याप्तीही मोठी आहे. या अभयारण्यातील तोतला डोह, राणी डोह, सिल्लारी याठिकाणी वनखात्याचे विश्रामधाम आहेत. प्रवासाठी पक्के रस्ते आहेत. अभयारण्यातील प्रदेश पहाडी आहे. सातपुडा पर्वताचे डोंगर या अभयारण्यात येतात. नयनरम्य निसर्ग, विपुल वृक्षसंपदा मुबलक वन्यप्राणी व पर्यटकांना फेरफटका मारण्यासाठी उत्तम रस्ते हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. वाघ, बिबटे, गवे, सांबर, चितळ आदि वन्य प्राण्यांचे सहज दर्शन या ठिकाणी जागोजाग असलेल्या पाणवठ्यांच्या काठी होते.

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरपासून सुमारे ६० कि. मी. अंतरावर या अभयारण्याची हद्द सुरू होते.

ताडोबा

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: प्रेक्षणीय स्थळे
Written by सौ. शुभांगी रानडे
      

विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील हे अतिशय मशहूर पर्यटन स्थळ आहे. राज्यातील हे सर्वात जुने अभयारण्य असून त्याचा विस्तार सुमारे ११६ चौ. कि. मी. जंगलात आहे. हे जंगल पुन्हा अतिशय विस्तृत अशा अंधारी या सुमारे ५०० चौ. कि. मी. क्षेत्र असलेल्या या अभयारण्यास जोडलेले आहे.

या अभयारण्याच्या मधोमध अतिशय सुंदर भव्य तलाव आहे. या तलावाभोवती लहानमोठ्या टेकड्या असून त्यावर घनदाट जंगल आहे. गवा आणि मगर हे या अभयारण्याचे मुख्य आकर्षण आहे. उन्हाळयाच्या दिवसात मध्यवर्ती तलावाभोवती रान गव्यांचे कळप जमा झालेले दिसतात. त्याखेरीज वाघ, बिबटे, चितळ, सांबर, कोल्हे, अस्वल, रानडुक्करं आदि वन्यप्राणीही या जंगलात आढळतात. माकडं, रानमांजरं, नीलगाय आदि प्राणीही येथे मुक्तपणे संचार करतात.
वन्यप्राणी जवळून पाहता यावेत म्हणून अभयारण्यात जागोजाग उंच मचाण बांधण्यात आले आहेत. विविध जातीचे पक्षी आणि वृक्षांची येथे रेलचेल आहे.

X

Right Click

No right click