मुरुड- जंजिरा

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: किल्ले
Written by सौ. शुभांगी रानडे

Image Source : Google

  

रायगड जिल्ह्यातील हा आणखी एक इतिहासप्रसिद्ध किल्ला होय. पण हा किल्ला भर समुद्रात बांधण्यात आला असून मराठी दौलतीच्या इतिहासात या किल्ल्याचा उल्लेख अनेकवार केलेला दिसतो. कोकण किनाऱ्याला लागूनच अलिबागच्या दक्षिणेकडे, अलिबागपासून जवळपास ५० कि.मी. अंतरावर मुरूड हे एक तालुक्याचे गाव असून ते इतिहास प्रसिद्ध आहे. या गावाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. नारळी-पोफळीच्या बागांनी या गावाचा आसमंत हिरवागार आहे. मुरूडच्या परिसरात काही इतिहासकालीन वास्तूंचे अवशेष अजूनही पहायला मिळतात. या गावात असलेला इतिहासकालीन राजवाडा `नबावाचा राजवाडा' म्हणून प्रसिद्ध आहे. हा वाडा तसा जुनाट असला तरी भग्नावस्थेतही त्याची भव्यता, बांधकामातील सौंदर्य आजही आपल्याला थक्क करते.

मुरूड पासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर भर समुद्रातील बेटावर जंजिरा किल्ला उभा आहे. मुळातच मुरूडचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. किनाऱ्यावरून दिसणारा हा भव्य किल्ला तर सौंदर्यात आणखीनच भर टाकतो.

मुरूडचा जंजिरा किल्ला चहू बांजूनी पाण्याने वेढला आहे. या किल्ल्यात जाण्यासाठी नावेने प्रवास करावा लागतो. किल्ल्यातील अंतर्भाग अजूनही चांगल्या स्थितीत आहे. पीर पंचायतन, सुरूलखानाचा वाडा, किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि या तटबंदीवर उभारण्यात आलेले अनेक भक्कम बुरूज आजही काळाशी टक्कर देत आहेत. किल्ल्यातील या बुरूजावरून बसविलेल्या काही तोफा आजही इतिहासाची साक्ष देत आहेत.

३५० वर्षापूर्वी अहमदनगरचा राजा मलिक अंबरने या अभेद्य जलदुर्गाची उभारणी केली, असा इतिहासाचा दाखला आहे. कोकण किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्व जलदुर्गात हा किल्ला अतिशय भक्कम आणि अभेद्य असल्याने तो सदैव अजिंक्य राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तसेच त्यानंतरही मराठ्यांनी हा किल्ला सर करण्याचे अनेकदा प्रयत्न केले, पण ते असफल झाले. या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी य किल्ल्यानजिक पाच सहा कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही जंजिरा जिंकणं महाराजांना शक्य होऊ शकलं नाही.

पन्हाळा

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: किल्ले
Written by सौ. शुभांगी रानडे

Image Source : Google

    कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला शिव छत्रपतींचा आणि संभाजीराजांचा आवडता किल्ला. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना येतात.

आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.

हा किल्ला छत्रपती शिवरायांनी प्रथम तारीख २८ नोव्हेंबर १६५९ रोजी घेतला. नंतर पुन्हा विजापूर अदिलशहाच्या ताब्यात गेला. पण लगेच २ मार्च १६६४ रोजी शिवरायांनी घेतला. याचवेळी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता. याचवेळी शिवराय जोहरच्या हातावर तुरी देऊन विशाळगडी राजदिंडीतून गेले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. पुढे इ. स. १७१० मध्ये पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली ती १७७२ पर्यंत येथेच होती.

कविवर्य मोरोपंतांचा जन्म येथेच झाला.

रायगड

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: किल्ले
Written by सौ. शुभांगी रानडे

Image Source : Google

    

छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा डोंगरी किल्ला इतिहासकाळातच नव्हे तर आजही प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. एप्रिल, १६८० मध्ये त्यांचे अकाली निधन झाले तेसुद्धा याच गडावर! अखेरची सात वर्षे त्यांनी या गडावरूनच स्वराज्याचा कारभार पाहिला. तत्पूर्वीच्या इतिहासकाळात हा गड `रायरी' या नावाने ओळखला जात असे.

मराठी दौलतीतील अत्यंत अवघड आणि म्हणूनच सुरक्षित असलेला हा किल्ला होय. संपर्काच्या दृष्टीने व कारभाराच्या दृष्टीने तो शिवरायांना इतर किल्ल्यांपेक्षा अधिक सोयीचा वाटला. रायगड येथे राजधानी असल्याने या किल्ल्यात सर्व सोयीसुविधा होत्या. एक नगरीच तेथे वसवण्यात आली होती. समुद्र सपाटीपासून जवळजवळ ८५५ मीटर उंच असलेल्या रायगडावर जाण्यासाठी पायऱ्या असून त्याशिवाय असलेले अन्य मार्ग अतिशय कठिण आणि अवघड आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड या गावापासून उत्तरेला सुमारे २६ कि. मी. अंतरावर सह्याद्रीच्या माथ्यावर हा किल्ला उभा आहे. सभोवताली पर्वतराई, खोल दऱ्या आणि भुरळ घालणारी निसर्ग यामुळे हा किल्ला शोभिवंत दिसतो. या किल्ल्याचा भक्कमपणा, त्याची उंची, अवघड जागा आणि अजिंक्यतारा पाहून युरोपियन लोक त्यास `पूर्वेकडील जिब्रॉल्टर' म्हणतात.

किल्ल्यावर आजही गंगासागर तलाव, बालेकिल्ला, नगारखाना, राज दरबार, रंगमहाल, जगदीश्वर मंदिर या वास्तू आपल्याला पहायला मिळतात. महाराजांचे समाधीस्थळ ही तर रायगडावरील एक पवित्र निशाणी होय.

पावनखिंड

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: किल्ले
Written by सौ. शुभांगी रानडे

Image Source : Google

      कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाच्या पूर्वेला ९ ते १० कि.मी. अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंची ठिकाणी म्हणजे १७११ फुटावर पावनखिंड आहे. पावनखिंड ज्या दोन डोंगरांच्या दरीत येते ती दरी दक्षिणोत्तर असून सात मैल लांबीची आहे. या दरीतच कासारी नदी उगम पावली आहे. पन्हाळा, म्हाळुंगे, पांडवदरी, धनगरवाडा, पांढरपाणी, घोडखिंड असा हा मार्ग आहे.
शिवरायांचे विश्वासू सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांनी मावळयांच्या मदतीने सिद्दी मसूदच्या सैन्याला या खिंडीतच थोपवून धरले आणि राजांना विशाळगडी जाण्याची संधी मिळाली. पावनखिंडीतील संग्रामाचे मूळ कारण पन्हाळगड ! सिद्दी जौहरने पन्हाळयाला करकचून वेढा घातलेला. महाराज किल्ल्यावर अडकलेले. अखेर एक योजना आखून राजे शरण येत असल्याचे सांगण्यात आले. सिद्दीची छावणी आनंदात मशगूल झाली आणि वेढा ढिला पडला.
   

इकडे शिवराजांनी पन्हाळा सोडण्याचे ठरविले आणि बरोबर ६०० हत्यारबंद पायदळ, बाजीप्रभूंसह महाराज हेरांनी योजलेल्या मार्गाने पन्हाळयावरून निसटले. १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा, गुरूवार, रात्रीचे सुमारे १० ची वेळ. विजा चमकत होत्या पाऊस कोसळत होता आणि एवढ्यात सिद्दीच्या एका पहारेकऱ्याने हे पाहिले आणि तो ओरडला, `दगा दगा!' ही चाहूल लागताच राजांनी दोन पालख्या केल्या. एका पालखीत ते स्वत: तर दुसऱ्या पालखीत शिवरायांसारखा दिसणारा, त्यांच्यासारखाच पेहराव केलेला प्रति शिवाजी (शिवा काशीद) बसला. महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले. हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्दी जौहरकडे पोहोचविली. जौहरने मसूदला पाठलाग करावयास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले. पण ते खरे शिवाजी नाहीत हे कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेल्या शिवा काशीदचा शिरच्छेद करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवराजासाठी शिवा काशीदने समर्पण केले.

इकडे मसूद एक हजार पायदळासह घोडखिंडीच्या दिशेने दौडत होता. १३ जुलैची ती पहाट! राजे आणि बाजी खिंडीशी आले आणि मसूदच्या सैन्याची आरोळी ऐकू आली. प्रसंग मोठा बाका. बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितले, विशाळगडी जावे, गनीम अफाट आहे, गनीम दावा साधील, मी इथे खिंड रोखून धरतो. एकालाही खिंड चढून देत नाही. मात्र गडावर पोहचल्याची खूण म्हणून तोफांचे आवाज द्या.

बाजींनी गनिमीकावा साधला. आपली मोजकी माणसे झाडांवर बसवून मसूदचे हशम येताच त्यांच्यावर दगडांचा मारा सुरू केला. नारळ फुटावा तशी हशमांची डोकी फुटू लागली. खिंडीच्या तोंडाशी अडसरासारखे राहून बाजींनी दिवसभर त्वेषाने खिंड लढविली. अनेक घाव बसले, देह घायाळ झाला, मावळे मरून पडले. बाजींचे लक्ष होते विशाळगडाकडे ! अखेर सायंकाळी सहा वाजता तोफांचे आवाज आले. याचवेळी बाजींच्या वर्मी घाव बसला आणि ते कोसळले. शेवटच्या क्षणी ते म्हणाले, `महाराज माझे काम मी केले, येतो.'

विशाळगडावर महाराज वाट पहात होते, जिवंत बाजीची. पण महत्प्रयासाने मावळयांनी बाजींचे प्रेत गडावर नेले. महाराज अत्यंत कष्टी झाले. रायाजी नाईक, बादल यांनी राजांच्या आज्ञेने बाजींच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले. ती समाधी दुर्लक्षित आहे. आजही या खिंडीत पोहोचताच १३ जुलै १६६० च्या रणसंग्रामाची आठवण होते. खिंडीचाही गळा दाटून येतो. रक्ताचा सडा शिंपून स्वामीनिष्ठेपायी, स्वराज्यासाठी बाजीने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी, पुरोगामी व इतिहासभिमानी म्हणवणाऱ्या शासनाने त्यांच्या समाधीची देखरेख ठेवली तरच आपला इतिहासभिमान सार्थ ठरणार आहे.

सज्जनगड

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: किल्ले
Written by सौ. शुभांगी रानडे

Image Source : Google

     

परळीचा किल्ला' म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला समर्थ रामदास यांच्या वास्तव्यानंतर `सज्जनगड' या नावाने ओळखला जाऊ लागला. शिवाजी महाराजांनी इ.स. १६७३ च्या सुमारास तो विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला. आयुष्याच्या अखेरपावेतो समर्थ रामदास स्वामी याच गडावर निवास करीत. इ.स. १६८२ मध्ये ते या ठिकाणी समाधिस्त झाले.

साताऱ्यापासून हा किल्ला अवघ्या १५ कि. मी. अंतरावर आहे. पूर्वी हा किल्ला चढून जावे लागत असे. पण अलिकडे अगदी थेटपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. किल्ल्याला दोन भव्य प्रवेशद्वार आहेत. अंतर्भागात श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिराखाली श्री समर्थांची समाधी आहे. मंदिरानजिकच समर्थांचा मठ आहे. मठात समर्थ ज्या वस्तूंचा दैनंदिन वापर करीत त्या सर्व वस्तू उदा. पलंग, पिण्याच्या पाण्याच्या तांब्या, पिकदान, कुबड्या या वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत. शिवाजी महाराजांनी समर्थांना या वस्तू भेटीदाखल दिल्या होत्या. गडाच्या एका टोकाला एक मारूतीचे मंदिरही आहे. मंदिराजवळच एक तलाव आहे.

सज्जनगड समुद्रसपाटीपासून सुमारे ९०९ मीटर उंचीवर आहे.

X

Right Click

No right click