भाषांतर व्यवसायाच्या नव्या संधी
नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण घेण्याची तसेच पुढील शिक्षणासाठीही मातृभाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याची सोय सर्व शिक्षणसंस्थांना करावी लागणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या विकासासाठी आणि समाजाच्या तळागाळात शिक्षणाची गंगा पोहोचण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण अपरिहार्य आहे.
ज्ञानदीपचे योगदान
ज्ञानदीपने इ. स. २००० पासूनच यासाठी प्रयत्न सुरू केले. मराठी तसेच संस्कृत भाषेतील वेबसाईट, सॉफ्टवेअर आणि मोबाईल सुविधा निर्माण केल्या. भाषा, स्थानिक माहिती याबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान यातही मराठीचा आवर्जून वापर केला.
मराठीला शिक्षणक्षेत्रात गौण स्थान
मात्र अजूनही महाराष्ट्रात मराठीला शिक्षणक्षेत्रात गौण स्थान राहिले आहे.मराठीत शिकलेल्या विद्यार्थ्यांना कमीपणाची वागणूक समाजाकडून दिली जाते. भारतात अजून साहित्य लेखनाला फारसे महत्व दिले जात नाही. नवोदित लेखकाला चांगली कथा, कविता वा अन्य लेखाच्या प्रसिद्धीसाठी प्रकाशकांची मनधरणी करावी लागते. सर्व हक्क विकूनदेखील लेखकाच्या हातात पानाला ३० ते ५० रुपये एवढे कमी मानधन मिळते. हौसेपोटी स्वत:ची पदरमोड करून एखाद्या लेखकाने स्वखर्चाने पुस्तक प्रसिद्ध केले तरी त्याला ते पुस्तक विकणे दुरापास्त होते. भेटीदाखल पुस्तके वाटून लेखकाला आपली हौस भागवावी लागते. त्यामुळे लेखन हा व्यवसाय म्हणून कोणी स्वीकारू शकत नाही.
मराठी भाषेवरून राजकारण आणि सत्ता संघर्ष होत असला तरी आज महाराष्ट्रात कोणत्याही शहराची वा गावाची सर्व माहिती मराठीत उपलब्ध नाही ही खेदाची गोष्ट आहे.
भाषांतर व्यवसायाच्या नव्या संधी
मराठी भाषेत असलेले ज्ञानभांडार इतर भाषांत भाषांतर करून ते देशभरात व सर्व जगभर पोहोचविणे आणि इंग्रजी भाषेतील ज्ञान मराठीत आणणे या दोन्ही क्षेत्रात सर्वसामान्य जनतेलाही घरबसल्या व्यवसायाची आणि पैसे मिळविण्याची फार मोठी संधी या धोरणामुळे निर्माण झाली आहे. भाषांतराचा हा व्यवसाय भविष्यात फार मोठ्या प्रमाणावर वाढणार असून ज्ञानदीप फौंडेशन यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार करून याचा प्रसार करणार आहे.
मराठीतील अपार साहित्यसंपदा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी त्याचे अन्य भाषांत भाषांतर वा रुपांतर होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर राहणारे मराठी बांधव हे कार्य अधिक सुलभतेने करू शकतील कारण त्यांना मराठी साहित्याची जाण असतेच शिवाय स्थानिक भाषा व तिची वैशिष्ठ्ये माहीत असतात. असे भाषांतर मोठ्या प्रमाणावर झाले तर मराठी साहित्य सर्वदूर पोहोचेल व त्याचा येथील साहित्यिकांना फायदा होईल.
मराठी साहित्य अधिक समृद्ध होण्यासाठी इतर भाषांतील साहित्याचे मराठीत भाषांतर वा रुपांतर करणे तर महाराष्ट्राबाहेर राहणार्या मराठी बांधवांना अधिक सोपे जाईल. युनिकोड अक्षरसंच वापरून संगणकावर मराठी मजकूर लिहिणे सोपे झाल्याने आज इंटरनेटवर फार मोठ्या प्रमाणावर लोक आपले विचार मराठीतून व्यक्त करू लागले आहेत. निश्चित योजना व योग्य व्यासपीठ मिळाले तर केवळ अभिप्राय, गप्पा वा चर्चा एवढ्यापुरताच याचा उपयोग न राहता त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर पडू शकेल. मायमराठी या संकेतस्थळावर या उद्देशाने स्वतंत्र भाषांतर विभाग सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्राबाहेर राहणार्या मराठी लोकांचे सक्रीय सहकार्य मिळाले तर ते त्यांच्यासकट सर्वांनाच लाभदायक ठरेल.
या कार्याला व्यावसायिक संदर्भही आहे. आज जागतिकीकरणामुळे जाहिरात व प्रसारमाध्यमांसाठी मराठीत लेखन व भाषांतर करण्याची गरज वाढली आहे. महिला, विद्यार्थी व शिक्षकांना याद्वारे आर्थिक लाभ मिळविण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.
इंग्रजीचे महत्व
सध्या इंग्रजी शिक्षण पहिलीपासून देण्यास सुरुवात झाली आहे. इंग्रजीत प्राविण्य मिळविल्यास आज इंजिनिअर वा वैद्यकीय पदवीधारकांना जे महत्व आहे तेवढेच महत्व इंग्रजीत लेखन व्यवसाय करणार्यास मिळू शकेल. मग अशा विद्यार्थ्यांनाही परदेशात मागणी येईल. भारतात इंग्रजी साहित्याचे भारतीय भाषेत भाषांतर करण्यास भरपूर वाव आहे. कारण बहुराष्ट्रीय व भारतातील मोठ्य़ा उद्योगांना त्यांच्या उत्पादनांची स्थानिक भाषेत जाहिरात करण्यास, माहितीपत्रके व नियमपुस्तके बनविण्यासाठी भाषांतरकारांची गरज लागते.
भारतातील जे उद्योग व व्यवसाय आतापर्यंत स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून होते त्यांना या श्रीमंत स्पर्धकांपासून धोका निर्माण झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी त्यांना आपल्या उत्पादनांच्या दर्जात व सेवेत सुधारणा कराव्या लागतील. पण त्याबरोबरच परराज्यातील व परदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी इंग्रजीचा आधार घेण्याची आवश्यकता आहे. स्थानिक उत्पादने व व्यवसाय यांच्या माहितीचे इंग्रजीत भाषांतर करण्यास यामुळे प्रोत्साहन मिळून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळविणे येथील उद्योगांना शक्य होईल. आज भारतीय भाषेतील लेखक अनेक असले तरी इंग्रजीत लेखन करणार्या व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कमी आहेत. ही स्थिती बदलणे जरूर आहे.
आंतरराष्ट्रीय स्थिती आणि संधी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठॆत मात्र लेखनाला फार महत्व आहे व चांगल्या लेखकाला आपल्याकडल्यासारखी केवळ प्रसिद्धी व मान न मिळता उत्तम धनप्राप्ती होऊ शकते.
हे आपणास माहित आहे का ?
१. भाषांतराचा दर आंतराष्ट्रीय बाजारपेठेत शब्दाला ३ ते ५ रुपये आहे.
२. व्यावसायिक लेखक व भाषांतरकार तासाला ३० ते ६५ डॉलर (सुमारे १२०० ते २५०० रु.) एवढी फी आकारतात.
३. एका फुलस्केप पानातील मजकुराचे भाषांतर करण्यास २५० डॉलर फी आकारली जाते.
४. जाहिरातीतील मजकुरासाठी यापेक्षा कितीतरी जास्त पैसे देण्यास व्यावसायिक तयार असतात.
५. ’घोष्ट रायटींग’ म्हणजे दुसर्याच्या ( नेते, उद्योगपती इत्यादी ) नावावर लिहिणे, यामध्येही मानधन खूप जास्त असते.
५. वर्तमानपत्रे, मासिके, वेबसाईट, पुस्तके प्रकाशित करणार्या व्यावसायिकांना भाषांतरकारांची गरज लागते.
मराठी डिजिटल माध्यम वापरून व्यावसायिक बना
नव्या माहिती विश्वात मराठीतील आपल्या ज्ञानाचा व अनुभवाच्या जोरावर व्यवसाय सुरू करण्याची संधी ज्ञानदीप फौंडेशन आपणांस मायमराठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहे. मराठी साहित्य, विज्ञान तंत्रज्ञान, आरोग्य, कला, मनोरंजन अशा कोणत्याही क्षेत्रात लेखन, प्रकाशन, अन्य भाषांत भाषांतर वा रुपांतर करण्यासाठी ज्ञानदीप फौंडेशन माय मराठी या वेबसाईटवरून सर्वतोपरी साहाय्य करेल.सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात मराठी साहित्य व उद्योग यांच्या प्रगतीसाठी मराठीचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचा व्यवसाय वृद्धींगत होण्याची गरज आहे. ज्ञानदीप आपल्या मायमराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर असा विभाग सुरू करीत आहे. असे कार्य व्यवसाय म्हणून करणार्या परदेशातील काही मराठी व्यक्तींनी यात सहभागी होण्याचे व नवोदितांना सर्व ते मार्गदर्शन करण्याचे मान्य केले आहे.
स्थानिक उद्योगांचा विकास आणि मराठी भाषिकांना घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याची संधी व समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणसंस्थांनी यात पुढाकार घेऊन ज्ञानदीपच्या या अभियानात सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन मी करीत आहे.
--- सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.